घरफिचर्सगोष्ट छोटी डोंगराएवढी

गोष्ट छोटी डोंगराएवढी

Subscribe

जगात दोन मोठे प्रश्न सद्या महत्वाचे आहेत. यातील पहिला प्रश्न लोकांच्या थेट आरोग्याशी निगडीत आहे तर दुसरा प्रश्न आपल्या देशातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्यांशी संबंधित आहे. पहिला प्रश्न साहाजिकच कोविड 19 विषाणूविरोधातील लढ्याचा आहे. या समस्येवर मात करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ अभ्यास, प्रयोग निष्कर्षात गुंतलेले आहेत. त्यांना त्यात यशही येत आहे. सिरम इन्स्टट्युटची लस येत्या दोन महिन्यात उपलब्ध होणार असल्याची सुखद बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे कोरोनावर विजय मिळवण्याचे मानवाचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. पण, ही जागतिक परिस्थिती झाली. देशातील प्रश्न त्याहूनही जटील आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाने जगाला हे दाखवून दिले आहे की, आपल्या देशात केवळ कोरोनावर मात करण्याचा संकुचित विचार करणारे नागरिक नाहीत. त्यांना माणसाच्या जीवाचे मोल इतर अपरिपक्व देशांच्या तुलनेत खूपच परिपक्वतेने समजते. आमच्या देशात एक देश एक, व्यक्ती, एक मत ही संकल्पना राज्यघटनेने रुजवलेली आहे. त्यामुळे इथे व्यक्तीच्या मृत्यूचा विचार किंवा दखल घेण्याच्या प्रक्रीयेतही समानतेचे आणि समतेचे तत्व लागू असते.

कुणाचाही मृत्यू दुखदच असतो, हे आम्हा देशातील नागरिकांना इतरांच्या तुलनेत अधिकपणे जाणवते. सध्या लाॅकडाऊनमुळे आमच्या देशातील आणि मुंबई ठाण्यातील रेल्वे आणि लोकलसेवा बंद आहेत. त्यामुळे लोकलमधून पडून, रेल्वे रुळ ओलांडताना होणारे रोजचे मृत्यू लाॅकडाऊनसोबत बंद झाल्याने आम्हा सामान्य पामर नागरिकांची मानवी मृत्यूबाबतची संवेदना बोथट झाली होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळे आमच्या मानवी संवेदना एका फटक्यात जाग्या झाल्या. या प्रकरण देशातील नागरिकांसाठी किती महत्वाचे आहे. हे आमच्या देशातील माध्यमांना खूपच आधी समजले होते. त्यामुळेच त्याच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती, अंकिता लोखंडे किंवा सुशांत सिंहशी संबंधितांचे चेहरे छोट्या पडद्यावरील बातमीचा भाग बनवण्याची अहमहमिका लागली होती. हा प्रश्न देशातील कुपोषण, गरीबी, लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेली बेरोजगारी, रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीवर पडत असलेला ताण, दिवाळखोरीच्या दिशेने जाण्याची शक्यता असलेल्या वित्तीय संस्था, रोजच कोट्यवधींचा तोटा सहन करणारी रेल्वे अशा अनेकविध संस्थापुढे निर्माण झाले्ल्या आर्थिक पेचापेक्षा सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचे गांभीर्य मोठे असल्याचे केवळ आणि केवळ आमच्या देशातील सरकारी व्यवस्था आणि माध्यमांच्याच लक्षात आले. देशात शेतक-यांच्या आत्महत्येचा प्रश्न रोजचाच विषय आहे. त्यापेक्षा सुशांत सिंह आत्महत्येचा विषय कितीतरी महत्वाचा असल्याचे आमच्या देशातील माध्यमांनी दाखवून दिले. यात समाजमाध्यमेही आघाडीवर होतीच. समाजमाध्यमांची याबाबतची जाण आणि संवेदनशीलता पाहून लाॅकडाऊनमुळे आत्महत्या केलेल्या आणि कोरोनामध्ये बळी गेलेल्या आत्म्यांनाही एका कलाकाराच्या आत्महत्येचे मोल ध्यानात आलेले असेल.

- Advertisement -

कलाकाराचा मृत्यू निश्चितच वाईट आणि वेदनादायी आहेच. मात्र सुशांतला त्याच्या मृत्यूनंतरही आपल्या वाहिन्यांच्या लोकप्रियतेसाठी रोजच्या रोज मरणयातना देणा-यांनी केलेला प्राईम टाईमचा त्याग या देशातील पामर प्रेक्षकांना समजणाराही नाही. आपली तेवढी बौद्धीक क्षमता नाही. आपल्या मन आणि मेंदूची झेप रस्त्याच्या खड्ड्यात पडून रोज होणारे मृत्यू, कोविड रुग्णांची वाढती संख्या, हेळसांड यापलिकडे जाणारा नाही. सुशांत सिंहच्या मृत्यूचे भांडवल होत असल्याचा आरोप निखालास खोटा आहे. जे हा आरोप करत आहेत त्यांना या मृत्यूत केवळ राजकारण दिसत आहे. मात्र हा प्रश्न इतका गहन आणि भारतीय राज्य तसेच समाजव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करण्याचे असल्याचे या पामरांना ज्ञातच नाही. शेतक-यांच्या आत्महत्या, कामगारांचे मृत्यू रोजच घडत असतात. महिलांवरील अत्याचार, जातीय विद्वेषातून घडणारे अत्याचार, कोरोना काळातही समुदायांनी न सोडलेले गटवादी राजकारण या घटना तेवढ्या महत्वाच्या नसतात. डाॅ. दाभोलकर, काॅम्रेड गोविंद पानसरे, गौरी लंकेश, डाॅ. कलबुर्गी यांच्या हत्यांपेक्षा कलाकाराच्या कथिक आत्महत्येचा प्रश्न केवढा गंभीर आहे. हे देशातील नादान नागरिकांना माहितच नाही. सामाजिक सुधारणेचा वसा घेतलेल्यांच्या हत्येपेक्षा पडद्यावरील कलावंताच्या आत्महत्येचा प्रश्न किती मोलाचा आहे देशातील अलिकडच्या घडामोडींनी दाखवून दिले आहे.

समाज माध्यमांवर एक हजार आठशे रुपयांचा हिशेब मागणा-या मावशींचा प्रश्न जगातील सर्वाधिक मोठा प्रश्न असल्याचे जाणून समाजमाध्यमांवर व्हायरल करणा-या समुदायात कलाकाराच्या मृत्यूला येणारे अचानक महत्व महत्वाचे नसणारच…लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटलेला नाही, लाॅकडाऊनमुळे गेलेल्या नोक-या कशा मिळवायच्या या विवंचनेत लोक आहेत. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात राज्यातून बाहेर गेलेल्या कामगारांनी महाराष्ट्राच्या दरावर दस्तक देणे सुरू केले आहे. त्यांना पुन्हा देशात यायचे आहे.  पण देशातील उद्योगधंदे कोरोनामुळे उद्धवस्त झाले आहेत. बांधकामाच्या साईट्स अजूनही कामगारांअभावी बंद आहेत. नोकरकपात सुरूच आहे. छोटे व्यावसायिक आणि उद्योग संपलेले आहेत. शेती आणि उद्योगांवर कोरोनाचा मोठा नकारात्मक परिणाम झालेला आहे. सेवा आणि निर्मिती उद्योगांना फटका बसलेला असताना केंद्राची वित्तीय यंत्रणा पुन्हा रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीच्या वाटेवर डोळे लावून बसलेली आहे. देशात आर्थिक आणीबाणीसदृश्य स्थिती आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीतून बाहेर पडायला जगाला वेळ लागणार आहे. मात्र आपल्या राज्य आणि देशात सुशांत सिंह प्रकरणातून बाहेर पडायला त्याहून जास्त वेळ लागण्याची स्थिती आहे. राज्य सरकारवर होणारे आरोप, या प्रकरणातून बाहेर पडलेली अंमली पदार्थासारखी इतर गंभीर अशी उपप्रकरणे, राज्यातील पोलिसांवर कलावंत मंडळींकडून होणारे आरोप प्रत्यारोप, या निमित्ताने राज्यातील एका युवा मंत्र्यांवर होणारी चिखलफेक, राजकारणाचे ढासळलेले चित्र हे महाराष्ट्राच्या आत्म्यालाच नव्हे तर या प्रकरणात ज्याच्या नावाने एकमेकांवर चिखलफेक करणारे खालच्या दर्जाचे राजकारण होत आहे त्या सुशांत सिंहच्या आत्म्यालाही वेदना देणारे आहे.

- Advertisement -

देशातील प्रसारमाध्यमे ज्यावेळी बेजबाबदार वागू लागतात तेव्हा तेथील लोकशाहीला मोठा धोका निर्माण होतो. या देशातील लोकशाहीला असाच धोका निर्माण झालेला आहे. माध्यमांना प्रचलित विषयांचे लाॅलीपाॅप चघळायला देवून महत्वाच्या पोटापाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय यावा, इतकी ही स्थिती बिघडली आहे. कोरोनाच्या विषयावरून सुरुवातीच्या काळात सरकारी यंत्रणांना धारेवर धरणारी माध्यमांमध्ये अचानकपणे झालेला हा बदल धोकादायक आहे. सत्ताधा-यांना प्रचलित प्रश्नांबाबत निश्चितच जाब विचारावा, मात्र एकाच प्रश्नाभोवती गुरफटून घेण्यामागे असलेले कारण माध्यमांवरील विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. कोरोनातून सावरण्यासाठी देशाला फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. ही किंमत मोजण्याची पुरेशी क्षमता येण्यासाठी लोकशाही मजबूत होणे गरजेचे आहे. येथील लोकशाही मजबूत करण्याची ही जबाबदारी येथील माध्यमांची आहे. लाॅकडाऊनमुळे गावकुसातील, पाड्यावरील विटभट्टी कामगारांच्या थंड पडलेल्या चुली अद्याप पेटलेल्या नाहीत. पीक कापणी आणि उसतोडणी कामगारांचे हाल आहेत. या कामगारांवर अवलंबून असलेल्या शेतक-यासमोरही डोंगराएवढे आर्थिक आव्हान कोरोनाने उभे केलेले आहे. कारखान्यांची थांबलेली चाके थंडच आहेत. शाळा सुरू झालेल्या नाहीत, रेल्वे, लोकलसेवाही बंद आहेत. अशा परिस्थितीत जनतेला पुन्हा उभे करण्याठी सत्ताधारी आणि विरोधक, केंद्र आणि राज्याने एकदिलाने खांद्याला खांदे भिडवून काम करण्याची गरज आहे. परंतु तुलनेने कमी महत्वाच्या प्रश्नाचे राजकारण करून आणि त्या राजकीय एपिसोड्सना आपल्या छोट्या पडद्यावर दाखवून आणि असे दाखवलेले केवळ राजकीय हेतून प्रेरित असलेले एपिसोड्स पाहून आपल्या थंड एसी खोलीत हतबलतेचे सुस्कारे सोडणारे समान दोषी आहेत.

प्रगल्भ लोकशाहीकडून निर्बुद्ध हुकूमशाहीकडे निघालेला हा जत्था आपल्याच हाताने आपल्या लोकशाहीची हत्या करणारा ठरणार आहे. त्यानंतर लोकशाहीची हत्या झाली की तिने आत्महत्या केली या प्रश्नावर माध्यमांमध्ये, राजकीय वर्तुळात कॅमे-.यासमोर होणा-या चर्चा निव्वळ कुचकामी असतील. एका कलाकाराच्या मृत्यूपेक्षा देशातील लोकशाहीचा होणारा मृत्यू जास्त परिणामकारक आणिि धोकादायक असेल. कोरोनामुळे होणारे मृत्यू त्यावरील लसीमुळे एकवेळ रोखता येतील मात्र लोकांचे प्रश्न सर्वोच्च असलेल्या लोकशाहीचा होणारा मृत्यू रोखण्यासाठी तयार होणारी लस निर्माण करण्याासाठीचा डाॅक्टर आपल्यात पुन्हा येणार नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणा-या माध्यमांनी हे वेळीच ध्यानात घ्यायला हवे. एक छोटी गोष्ट डोंगराएवढी केली जात असताना पाहात राहाणारे आपण बघेही त्याला तेवढेच जबाबदार आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -