घरफिचर्सभारतीय विमान सेवेचे मारेकरी कोण?

भारतीय विमान सेवेचे मारेकरी कोण?

Subscribe

काँग्रेसप्रणीत पुरोगामी आघाडी सरकार टूजी, थ्रीजी, कोळसा घोटाळ्याने अक्षरश: बदनाम झाले. यातील संबंधित खात्यातील मंत्री गजाआडही गेले. या घोटाळ्यांमध्ये नागरी हवाई उड्डान खात्यातील कोट्यवधी रुपयांच्या आणखी एका घोटाळ्याची आता भर पडली आहे. या घोटाळ्यामुळे देशातील नागरी विमान वाहतुकीला अक्षरश: घरघर लागली. या घोटाळ्याची आता ईडीकडून कसून चौकशी केली जात आहे. कालपर्यंत यामध्ये दीपक तलवार हे नाव समोर होते. मात्र तलवार याच्या चौकशीतून एका बड्या नेत्याचे नाव समोर आले. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय नागरी उड्डान मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे. ईडीने पटेल यांची कसून चौकशी सुरू केल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर मागील वर्षी जेवढ्या संख्येने विमान उड्डाणे झाली, ती जगभरातील विमानतळांच्या तुलनेत सर्वाधिक होती. याचाच अर्थ या विमानतळावरून जगाच्या तुलनेत सर्वाधिक ट्रॅफिक हाताळले गेले. मात्र दुर्दैवाने यात भारत सरकारच्या एअर इंडिया किंवा भारतीय हवाई वाहतूक करणार्‍या अन्य कंपन्यांचा सहभाग कमी आणि विदेशी विमान वाहतूक कंपन्यांचा जास्त होता. ही परिस्थिती पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात नागरी विमान उड्डान मंत्रालयाने घेतलेले चुकीचे निर्णय आणि धोरणे यांचा पूर्वलक्षी प्रभाव म्हणावा लागेल. कारण पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील निर्णय आणि धोरणे ही भारतातील विमान वाहतूक कंपन्यांना खाईत लोटणारे ठरली, तर विदेशी विमान वाहतूक कंपन्यांना लाभदायक ठरली. ही धक्कादायक माहिती नुकतेच ईडीच्या तपासातील आहे.

- Advertisement -

पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात विमान वाहतूक क्षेत्रात कोट्यवधींचा घोटाळा झाला. यामागील मुख्य सूत्रधार दीपक तलवार याच्या ईडीने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या चौकशीनंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले, त्यात एक मोठे नाव समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे खास विश्वासू आणि पुरोगामी आघाडी सरकारमधील तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डान मंत्री प्रफुल्ल पटेल. मागील आठवड्यात प्रफुल्ल पटेल यांची तब्बल 8 तास कसून चौकशी करण्यात आली. पटेल यांचे नाव दीपक तलवार याच्या चौकशीतून समोर आले आणि तलवार हा पटेल यांचा अत्यंत विश्वासू आणि जवळचा मित्र आहे. या घोटाळ्यामुळे भारतातील विमान वाहतूक व्यवसायाला अक्षरश: घरघर लागली. त्याचे परिणाम म्हणून किंग फिशर कंपनी बंद पडली. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या दोन सरकारी कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले आणि आता जेट कंपनीला टाळे ठोकण्यात आले.

या महाघोटाळ्याची आजवर चर्चा झाली नव्हती, मात्र ईडीने प्रफुल्ल पटेल यांची 11 जून रोजी कसून चौकशी करताच या घोटाळ्यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ईडीने पटेल यांच्याभोवती फासा आवळल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत. काँग्रेसप्रणीत पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात 2004-2011 दरम्यान प्रफुल्ल पटेल हे नागरी उड्डयन मंत्री असताना त्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला, त्यासंबंधी त्यांची कसून चौकशी सुरू आहे. कॉर्पोरेट लॉबिस्ट दीपक तलवार याच्याकडून ईडीला काही पुरावे मिळाले. त्या आधारावर प्रफुल्ल पटेल यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांची चौकशी प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत सुरू केली आहे. सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने 2017 साली दीपक तलवार याच्या विरोधात केस दाखल केली होती.

- Advertisement -

प्रफुल्ल पटेल यांच्या ते केंद्रीय नागरी उड्डान मंत्री असतानाच्या काळात एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या दोन्ही सरकारी कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले. अमेरिकेची कंपनी बोइंग आणि फ्रान्सची कंपनी एअरबसकडून 67 हजार कोटी रुपयांत 111 विमाने खरेदी करून ती एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स यांच्यावर थोपवली. ज्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. त्याचबरोबर खाडी देशांतील 3 विमान वाहतूक कंपन्यांना फायद्याचे हवाईमार्ग दिले. विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून विमान ट्रेनिंग सेंटर सुरू केले. आता या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी होणार आहे. त्यामध्ये इंडियन एअरलाइन्सने फेब्रुवारी 2006 मध्ये फ्रान्समधील एअरबस कंपनीकडून 43 विमाने खरेदी केली. यावर कॅगने 17 ऑगस्ट 2011 रोजी अहवाल दिला. त्यामध्ये इंडियन एअरलाइन्सने हा व्यवहार सुमारे 8 हजार 399 कोटी रुपयांचा केला होता. याच प्रकारे एअर इंडियाने सुरुवातीला केवळ 24 विमाने खरेदी करण्याचे योजले होते.

अशा प्रकारे इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडिया या दोन्ही कंपन्यांनी 67 विमाने खरेदी केली. त्यानंतर नागरी उड्डान मंत्रालयाच्या काही अधिकार्‍यांनी या ऑर्डरमध्ये बदल केला. त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करत बोईंग आणि एअरबस या दोन कंपन्यांकडून तब्बल 111 विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली. व्याजासहित हा सौदा तब्बल 70 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला. या प्रकरणाची सरकारने चौकशी करण्याचा आदेश दिला. त्यानंतर या सर्व प्रकरणांमध्ये काही अधिकार्‍यांची चौकशीही झाली. त्याचबरोबर या चौकशीदरम्यान एक महत्त्वाचे नाव समोर आले ते नाव होते कॉर्पोरेट लॉबिस्ट दीपक तलवार. दीपक तलवार हे अशा व्यवहारांमध्ये कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी दलालाचे काम करत होते.

त्याचबरोबर दीपक तलवार याने प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून विदेशातील खासगी विमान कंपन्यांना फायद्याचे हवाई मार्ग दिले. तसेच या मार्गांवरून एअर इंडियाच्या विमानांची उड्डाने बंद केली. याकरता दीपक तलवार याला कोट्यवधीचे कमीशन मिळाले. एप्रिल 2008पासून ते फेब्रुवारी 2009 दरम्यान एशिया फिल्ड लिमिटेड आणि गिल्ट असेट्स मॅनेजमेंट लिमिटेड यांना 272 कोटी रुपये भरले. हा पैसा एअरलाइन्स एअर एमीरेट्स, एअर अरेबिया आणि कतार एअरवेज या कंपन्यांकडून देण्यात आला. त्या बदल्यात या तीन कंपन्यांना फायद्याचे हवाईमार्ग देण्यात आले. यातील एशिया फील्ड लिमिटेडची मालकी ही दीपक तलवार याचा मुलगा आदित्य तलवार याच्याकडे आहे. या कंपन्यांना फायद्याचे हवाईमार्ग मिळावेत म्हणून दीपक तलवार लॉबिंग करत होते. त्याने प्रफुल्ल पटेल यांच्याशी असलेल्या घनिष्ट संबंधांचा फायदा घेत विदेशी विमान कंपन्यांना फायदा मिळवून दिला.

दीपक तलवार याने प्रफुल्ल पटेल यांना विदेशी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींचे नाव व पत्ते दिले. तसेच त्यांचा आर्थिक फायदा होण्यासाठी नेते, मंत्री आणि अधिकारी यांच्या लॉबिंग केली. ईडीला या प्रकरणी अनेक ईमेल हाती लागले आहेत. ज्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि दीपक तलवार यांच्यातील संबंध घनिष्ट स्वरूपाचे होते, हे सिद्ध होते. विदेशी विमान कंपन्यांना फायद्याचे हवाईमार्ग मिळावे याकरता भारत सरकारला धोरणांमध्ये बदल करण्यास भाग पाडले. विमान निर्मिती करणार्‍या बोईंग आणि एअरबस या कंपन्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठीही अनेक धोरणांमध्ये बदल करण्यास भाग पाडले. इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडियाकरता जी १११ विमाने खरेदी करण्यासाठी ज्या बोईंग आणि एअरबस या कंपन्यांशी करार केले, त्यातील एअरबस या कंपनीशी दीपक तलवार याच्या कंपनीची पार्टनरशीप घेण्यात आली होती. या सर्व व्यवहारांच्या बदल्यात दीपक तलवार याला मिळालेल्या दलालीच्या रकमेतील काही रक्कम तलवार याच्या खात्यातून नागरी विमान उड्डान मंत्रालयातील काही अधिकार्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली.

ईडीच्या आरोपपत्रानुसार प्रफुल्ल पटेल हे दीपक तलवार यांचे चांगले मित्र आहेत. मंत्रालयातील धोरणांमध्ये सोयीनुसार बदल करण्यामागे या दोघांची महत्त्वाची भूमिका होती. विदेशी विमान कंपन्यांना फायद्याचे हवाई मार्ग कुणाच्या सांगण्यावरून देण्यात आले, याचा शोध ईडी घेत आहे. या सर्व व्यवहारांमध्ये प्रफुल्ल पटेल यांचा प्रमुख सहभाग होता. तसेच एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स यांच्या विलीनीकरणामध्ये पटेल यांची काय भूमिका होती. या सर्व व्यवहारातून मनी लॉन्ड्रिंग करण्यात आले होते का? या दृष्टीकोनातूनच ईडीची चौकशी सुरू आहे. या सर्व प्रकरणी ईडीने विशेष न्यायाधीश अनुराधा शुक्ला-भारद्वाज यांच्या न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला आहे. या अहवालाची दखल घेत न्यायालयाने दीपक तलवारचा मुलगा आदित्य तलवार याच्याविरोधातही अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.

प्रफुल्ल पटेलांना मोदींचा गर्भित इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची झोप उडवणारा कैदी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे, असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 एप्रिल रोजी गोंदिया येथे झालेल्या प्रचारसभेत केला होता. मोदींच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय खळबळ उडाली. विमान घोटाळाप्रकरणी तिहार जेलमध्ये असलेला दीपक तलवार हा आरोपी दिल्ली कोर्टात पोहोचला आणि कोर्टाकडे दिलेला दया अर्ज त्याने मागे घेतला. त्यामुळे मोदींचे तिहार जेलचे भाष्य म्हणजे दीपक तलवार तर नव्हे ना, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

कोण आहे दीपक तलवार
नवी दिल्लीत मंत्री आणि प्रशासकीय अधिकार्‍यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध प्रस्थापित करून खासगी कंपन्यांची कामे करून देणारा आणि त्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचे कमिशन घेणार्‍यांपैकी एक म्हणजे दीपक तलवार. राजधानीत त्याला ‘लॉबिस्ट’ असे म्हटले जाते. तलवारची इंटिग्रल नावाची जनसंपर्क कंपनी असून ‘अ‍ॅडव्हॅण्टेज इंडिया’ नावाच्या एनजीओवरही त्याने मेहरबानी केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. तलवारने तब्बल 90 कोटी रुपये या एनजीओला देऊन ‘पांढरे’ केल्याचा त्याच्यावर आणखी एक आरोप आहे. एवढेच नव्हे तर तत्कालीन सीबीआय संचालक रणजीत सिन्हा यांच्या घरी मध्यरात्री जाऊन त्याने भेटही घेतली होती. तशी सिन्हा यांच्या बंगल्यावरील लॉगबुकमध्ये नोंद आहे, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. दीपक तलवार याने एअर इंडियाचे फायद्यातील विमान मार्ग एअर अरबिया, एमिरेट्स आणि कतार एअरवेज या आखाता देशातील 3 खासगी विमान कंपन्यांना विकले असून या व्यवहारात तलवारच्या मालकीच्या कंपन्यांना 212 कोटींपेक्षा अधिक नफा मिळाला असल्याची माहिती ईडीच्या तपासात उघड झाली. या प्रकरणी दीपक तलवार याला 30 जानेवारी 2019 रोजी दुबईतून ताब्यात घेतले आणि तिहार जेलमध्ये टाकण्यात आले. तलवारला जेव्हा दिल्लीच्या विशेष न्यायालयात कोठडीसाठी हजर करण्यात आले तेव्हा ईडीने त्याच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक घोटाळ्यांची यादी सांगितली.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -