घरफिचर्सविवाहानंतर वर्षभराच्या आतच का निर्माण होते फारकतीची परिस्थिती

विवाहानंतर वर्षभराच्या आतच का निर्माण होते फारकतीची परिस्थिती

Subscribe

नात्यांंमध्ये ठरतोय जनरेशन गॅपचा अडथळा !

समुपदेशनला आलेल्या बहुतांश प्रकरणात फरकती पर्यंत पोहचलेली पती व पत्नी संपर्कात येतात, हे तर सर्वश्रुत आहे. मात्र, जर एकंदरीत आढावा घेतला तर, ताबडतोब वेगळे व्हायचे आहे, मोकळे व्हायचे आहे, अशा निर्णयासाठी ठाम असलेले पती पत्नी हे नुकतेच लग्न झालेले नवं विवाहित जोडपेच असतात.

विशेष म्हणजे, दोघेही उच्च शिक्षित आणि बर्‍यापैकी नौकरी व्यवसाय करणारे अथवा तशी पात्रता अंगात असणारे असतात. अनेक प्रकारचे छंद, आवडी निवडी जोपासत व्यक्तिमत्व सर्वांगीण विकसित केलेले, बाहेरील जगात वावरलेले, सोशल मीडियामुळे स्मार्ट बनलेले, स्वतःचे विचार, तत्व विकसित असलेले असतात. मूल असेच मुलीही अनेक उत्तम ठिकाणी उत्कृष्ट पॅकेजवर जबाबदारीची पोस्ट लीलया सांभाळत असतात. व्यवस्थित समजूतदार पणाच्या वयात लग्न झालेले असते, बर्‍यापैकी परिपक्व झाल्यावर सर्व विचारांती लग्न ठरवून केले जाते. लग्न जमल्यावर एकमेकांशी भेटणे, बोलणे, एकमेकांच्या घरी जाणे येणे, एकमेकांच्या विचार आणि अपेक्षा जाणून घेणे आणि रितसर सर्व विधीनुसार लग्न करणे या सर्व प्रक्रिया यथासांग पार पडलेल्या असतात. आजकाल लग्नदेखील आलिशान स्वरूपात, उत्तम पद्धतीने, मनसोक्त पैसे खर्चून, सर्व हौस मौज करून लावली जातात. त्यामुळे त्यावर भरपूर आर्थिक भार देखील दोन्ही बाजू कडून घेतला जातो. मग तरीही लग्नानंतर महिन्या एक दोन महिन्यातच दोन कुटुंबात आणि पती पत्नी मध्ये खटके उडायला, वाद व्हायला सुरुवात का होते? चार, सहा महिनेच कस बस नांदून मुली माहेरची वाट का धरतात, तेही ताबडतोब वेगळे च व्हायचं आहे हा निर्णय घेऊनच. अशा नवविवाहित दाम्पत्यांची प्रकरणे हाताळतांना दोन्ही बाजूच्या नातेवाईक तसेच पती पत्नीशी चर्चा केली असता यामागे काही ठराविक आणि सारखी कारणेच सर्वत्र पाहायला मिळतात.

- Advertisement -

प्रथम आपण नवविवाहित मूल आणि त्यांचे आई वडील अथवा जवळचे नातेवाईक कोणत्या गोष्टीवरून दुखावले जातात, यावर दृष्टीक्षेप टाकुयात. मुलगी लग्न होऊन सासरी आल्यापासून ते फरकती च्या निर्णयापर्यंत असे काय काय घडले, ज्यामुळे नात्यात इतकी कटुता आली यावर चर्चा केली असता किरकोळ आणि छोटी मोठी कारणे सांगितली जातात. मुलीला व्यवस्थित अथवा सासरच्या पद्धतीने स्वयंपाक करता न येणे, मुलीकडून स्वयंपाक घरात, घरगुती कामात काही चुका होणे, मुलीने सतत वेळी अवेळी माहेरी फोन वर बोलणे, जुन्या मित्रमैत्रिणीच्या संपर्कात राहून स्वतःच्या वैवाहिक आयुष्याबद्दल चर्चा करणे, मुलीचे रंगरूप, सवयी, संस्कार लग्ना या आधी जसे सांगितले किंवा समजले तसें नसणे, मुलीला आरोग्याची एखादी समस्या असणे, मुलीचे शिक्षण आणि त्याबद्दलची खरी माहिती लपवलेली असणे.

मुलीने लग्न झाल्यावर ताबडतोब नवर्‍यासोबत वेगळे राहण्यासाठी हट्ट करणे हाही एक महत्वाचा मुद्दा फारकत घेण्यासाठी कारणीभूत ठरतो. याठिकाणी मुलांची अपेक्षा असते की तो जर कामानिमित्त वेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असेल तरी पत्नीने काही वर्षे त्याच्या आई वडिलांसोबत ते जिथे राहतात तिथे राहावे, त्यांची सेवा करावी, आपल्या घरातील चालीरीती समजावून घ्याव्यात. अनेकदा मुलांचे मूळ घर गावच्या, तालुक्यातील ठिकाणी असते. लग्नानंतर अश्या ठिकाणी राहण्याची आजकाल मुलींची तयारी नसते. तसेच मुलीचे म्हणणे असते की नवीन लग्न झाले आहे, याच दिवसात एकमेकांना वेळ देणे, समजून घेणे आवश्यक आहे, ज्या अर्थी नवरा मला त्याच्या सोबत राहायला नेत नाही त्या अर्थी त्याचे काहीतरी लफडंच असणार. अशा प्रकारे नवरा दूर असताना सासरी नांदावं लागत असेल तर मुली सतत माहेरी जाऊन राहणे पसंद करतात. ही बाब सासरी स्वीकारली जात नाही. तर काही ठिकाणी लग्नानंतर मुलीला सतत माहेरी पाठवणे, तिला वेळेत आणायला न जाणे, अथवा येऊ न देणे यामुळे मुलींच्या मनात शंका निर्माण होते.

- Advertisement -

मुलांना अपेक्षा असते की आपण घरच्यांचं मन धरण आवश्यक आहे असे ताबडतोब वेगळं होणं, वेगळं राहणं योग्य दिसत नाही. मुलीने लग्नानंतर नौकरी करण्यासाठी तयार असणे अथवा नसणे यावर देखील मतभेद आढळतात. आधी ठरलेलं एक असत आणि नंतर समोर वेगळंच येत, मुलीला लग्नानंतर पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असणे परंतु सासरी हे मान्य नसणे अथवा सासरचे शिकवायला तयार असणं पण मुलीलाच त्यात अभिरुची नसणे या बाबी देखील प्रकर्षाने जाणवतात.

नात्यांंमध्ये ठरतोय जनरेशन गॅपचा अडथळा

जरी तिला लग्नानंतर शिक्षण व नोकरीची परवानगी असेल तरी नवीन संसार सांभाळून हे सर्व हाताळतांना तिची धांदल होतेच. नवीन लग्न होऊन आलेली मुलगी जर मुलावर कोणत्याही कारणाने संशय घेत असेल, त्यावरून त्याला काही टोचेल असे बोलत असेल, सतत खोदून खोदून प्रश्न विचारत असेल तरी मुलांचे बिनसतं. मुलाचा मोबाईल बघायला जर नवीन लग्न झालेली मुलगी मागत असेल तरीही मुलाला याचा ताबडतोब राग येतो. मुलगी जरी तिचा मोबाईल नवर्‍याच्या हातात लागू देत नसेल, किंवा काहीतरी लपवते, चोरून मेसेज अथवा फोन करते असे लक्षात येत असेल तरीही मुलाकडून लगेच संशय घेतला जातो. अशा प्रकारे नवं विवाहित दाम्पत्यांचे वाद होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यांचे मोबाईल.

नवीन लग्न झालेल्या मुलीने सासरच्यांचा मानपान अपेक्षे नुसार न ठेवणे, तिचे राहणीमान, भाषाशैली, दैनंदिन सवयी यामध्ये काही त्रुटी असणे यावर देखील फारकतीचा निर्णय घेतला जातो. दोघेही एकमेकांना समजून उमजून घ्यायला वेळच देत नाहीत. नवविवाहित सुशिक्षित मुले आपल्या आई वडिलांच्या अपमानाबद्दल, बायकोकडून त्यांना मिळणार्‍या वागणुकीबद्दल अतिशय भावनात्मक असल्याचे जाणवते. वास्तविक, मुलेमुली दोघांच्याही आईवडिलांनी त्यांना कष्ट करून, संस्कार करूनच लहानच मोठे केलेले असते. चांगले शिक्षण दिल्यामुळे दोघेही आपल्या आईवडिलांचा अपमान सहन करण्यास तयार नसतात. यामध्ये एकमेकांना समजून घेण्यासाठी नवविवाहित जोडपे कमी पडल्यास लगेच त्यांचे मन दुखावले जाते. याही पलीकडे मुलगा अथवा मुलाकडचे मुलीला तुम्ही लग्न लावून देताना काय कमतरता होती, मुलीचे नातेवाईक कुठे कुठे चुकले, कुठे काय उणीव राहिली यावर तिला जर बोलले तर ती देखील शिकलेली, स्वाभिमानी, तिला आईवडिलांच्या लग्न खर्चाची जाणीव असल्याने ताबडतोब उत्तर देऊन मोकळी होते. अशी वेळी ही आत्ताच अशी वागते, आताच इतकं उर्मट बोलते, माहेरचा मोठेपणा सांगते, यावरून वादाला वाचा फुटते. सासू, नणंद, जावा जर जुन्या पिढीतील किंवा जुन्या विचाराच्या असतील तर स्वतःच्या वेळी त्यांनी काय काय सोसलं, किती तडजोड केली, किती त्रास सहन केला, किती कष्टाने संसार केला, कशी काटकसर केली यावरून नवविवाहित मुलीच्या वागणुकीची तुलना करायला सुरुवात करतात. वास्तविक, हा जनरेशन गॅप घराघरात अतिशय कॉमन आहे आणि ही वैचारिक तफावत न सांधता येणारी आहे. तरीही, जो त्रास आपण काढला तोच आपल्या नवंविवाहित सुशिक्षित सुनेने काढावा ही अपेक्षा तिच्याकडून ठेवली जाते.

नवीन लग्न झालेल्या मुलीशी आणि तिच्या घरच्यांशी चर्चा केल्यावर लक्षात येते की, त्यांनी पण अगदीच साध्या साध्या गोष्टीना खूप महत्व देऊन मुलीचे वैवाहिक आयुष्य सुरु होण्याआधीच संपवले आहे. अनेक ठिकाणी मुलीने साध्या साध्या गोष्टी माहेरी कळविणे आणि त्यावर मुलीच्या माहेरच्यांनी ताबडतोब प्रतिक्रिया देणे, लगेच चांगल वाईट चूक बरोबर ठरवून त्या बाबतीत सगळीकडे चर्चा सुरु करणे यावरून मुलाकडील लोक दुखावले गेलेत. बर्‍याचदा बैठका बसवून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण त्यातून नाते संबंध अधिकच ताणले गेल्याचे लक्षात येते.

जास्तीत जास्त प्रकरणात मुलीची आई ही मुलाकडच्यांसाठी जणू खलनायिकाच असते, असे जाणवते. मुलीच्या आईने सासरकडील लोकांना घालून पाडून बोलणे, त्यांना कमी लेखणे, चारचौघात त्यांना अपमानित करणे, मुलीच्या संसारात वाजवीपेक्षा जास्त लक्ष घालणे, मुलीच्या पूर्वीच्या आयुष्यात सगळे कसे उत्तम उत्कृष्ट होते आणि आता तिच्यावर काय दिवस आलेत या अविर्भावात तुलना करून सासरी ऐकवणूक करणे याचा मुलाकडील लोकांना राग येतो. अनेक ठिकाणी मुलीच्या आईचा आततायी पणा, मर्यादा सोडून बोलणे, मुली पेक्षा फारकत घेण्याची तिच्या आईलाच घाई असणे असे प्रकार निदर्शनास येतात. नुकतेच नवीन लग्न होऊन गेलेल्या मुलींच्या आयांनी खरंच काही पथ्ये पाळावीत असे वाटते.

मुलगा व्यसन करतो हे लग्नानंतर समजले, मुलाचे स्वतःच घर नाही हे लपवले होते, नवीन घर बुकिंग केलेय असे सांगितले होते, वास्तविक, त्यांना फक्त भाड्याचे घर आहे, मुलगामुलगी लग्नानंतर वेगळे राहणार असे सांगितले होते, मुलगी एकत्र कुटुंबात नांदू शकत नाही, मुलीला नोकरी करु देणार असे ठरले होते, आता ते नाही म्हणतात. मुलगा लग्न झालेय तरी इतर मुलींशी, महिलांशी मोबाईलवर बोलतो, त्याला मैत्रिणी आहेत. आपण आयुष्यात आल्यावर नवरा त्याचे जुने संबंध कमी करत नाही ही खंत मुलींना जाणवते. नवरा त्याचा मोबाईल बायकोला तपासायला देत नाही, घरी उशिरा येतो, बायकोची बाजू घेऊन घरच्यांना समजावत नाही, आर्थिक स्वतंत्र मुलीला नाही, कोणताही निर्णय नवराच घेतो मुलीला सहभागी करीत नाही, घरातील सून म्हणून कोणत्याही महत्वाचे निर्णय तिला कळवले देखील जात नाही, तिला एकटे पाडले जाते.

सासरच्यांकडून विवाहितेकडे अवास्तव अपेक्षा

मुलगा फक्त आईचे, बहिणीचे ऐकतो, मुलाच्या बहिणी संसारात प्रचंड ढवळाढवळ करतात, सारख्या माहेरीच येऊन रहातात, मुद्दाम त्रास देतात, या तक्रारी सर्रास समोर येतात. त्यातून नवर्‍याची एखादी बहीण अविवाहित असेल तर हे प्रश्न खूपच बिकट झालेले दिसतात. लग्न करून आलेल्या मुलींचे म्हणणे असत आम्हाला आमचा संसार आमच्या पद्धतीने करु द्यावा, आमची पण नवर्‍यासोबत काही स्वप्न आहेत. बहिणींनी भावासाठी केलेले त्याग आणि माहात्म्य आम्हाला सांगून फायदा नाही, जर आमच्या संसारात बहिणीचे स्वतःच सगळा कारभार चालवणार असतील तर भावाचे लग्नच कशाला केलंय?

मुलीला घरकाम खूप पडते, लग्न झाल्यावर कामवाली मुद्दाम बंद केली जाते, मुलीकडून घरातील सर्व काम करून घेतली जातात, तिला घरकाम करायला आम्ही इतके शिक्षण शिकवले का, तिची शैक्षणिक पात्रता काय आणि ती करते काय हे देखील प्रामुख्याने शिकलेल्या मुलींना त्रासदायक ठरते. मुलीच्या आणि इतरांच्या खाण्यापिण्यात फरक केला जातोय, मुलीला मोबाईल वापरू दिला जात नाही, वापरू दिला तरी तिच्यावर लक्ष ठेवले जाते, मुलीला एकटे घराबाहेर जाऊ दिल जात नाही, मुलीच्या कामात सतत चुका काढल्या जातात, तिला टॉर्चर केले जाते यासारख्या असंख्य कारणामुळे मुलीकडील लोकपण फरकतीपर्यंत येऊन पोहचतात. मुलाचे लग्नाआधीपासून लफडे असणार असे वाटतेय, जगाला दाखवायला फक्त लग्न केले, आईवडिलांच्या दबावाखाली लग्न केलेय, पण त्याला संसार करायचा नाही, तो संसाराची जबाबदारीच घेत नाही, त्याच मन रमत नाही मुलीत. मुलाची मित्रमंडळी सगळं ठीक नाही, मुलाला लग्नाआधी सांगितला तेवढा पगारच नाही, अथवा सांगितले तेवढे उत्पन्न नाही, तो नोकरीत कायमस्वरुपी नाही, त्याच्या नावावर स्वतः ची प्रॉपर्टी नाही, शेतजमीन आहे पण वाटण्या झालेल्या नाहीत, घरातील आर्थिक व्यवहार, निर्णय त्याच्या हातात नाहीत, सगळे इतरांच्या ताब्यात आहे. मुलगा लग्नातच खूश दिसत नव्हता, यासारखी अनेक कारणे मुलीला आणि तिच्या घरच्यांना त्रासदायक ठरतात.

मुलाला आणि त्याच्याकडील मंडळींना सतत भीती असते की घरात आलेली सून म्हणजे आपल्या प्रॉपर्टीसाठी, आपल्याकडून आर्थिक लाभ घेणेसाठीच आलेलीआहे, तिने पैशाच्या अपेक्षेनेच लग्न केले आहे, तिला ताब्यात ठेवले नाही तर ती आपल्याला लुबाडेल. त्यामुळे अनेक कुटुंबातील सुनांना त्यांच्या हक्क अधिकारापासून लांब ठेवले जाते. अनेक ठिकाणी मुलींना लग्नानंतर कळते की नवरा कर्जबाजारी आहे, किंवा बर्‍याच ठिकाणी उधार उसनवार घेतलेले पैसे देणे लागतो. त्यावेळेस नवीन लग्न होऊन आलेली मुलगी घाबरून जाते.

हुंडा हा शब्द जरी आजकाल इतिहास जमा झाला असला तरी त्या प्रथेचे पूर्ण निर्मूलन मात्र अजिबात झालेले नाही. जर नुकतंच लग्न झाल्यावर मुलीला माहेरून आर्थिक मदत आणण्यासाठी सांगण्यात आले, घर, गाडी असे काही घेऊन द्यायला सांगण्यात आले किंवा तिचे लग्नात मिळालेले दागिने सासरच्यांनी काढून घेतले, गहाण ठेवले, अथवा विकले, तिच्या नावावर कोणतेही कर्ज घेण्यासाठी प्रस्ताव मांडला तर हे सगळं तिला अनपेक्षित असते. नवर्‍याची आर्थिक परिस्थिती बर्‍यापैकी डळमळीत आहे हे समजल्यावर तिचा अपेक्षाभंग होतो आणि ती लग्न करून आपण फसलोय या मानसिकतेमध्ये जाते. याठिकाणी बायकोने नवर्‍याच्या चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये साथ द्यावी ही जरी रीत असली तरी, लग्नाआधीच हे का सांगितलं गेलं नाही, या गोष्टी का लपवल्या, खोटं बोलून लग्न का लावल या प्रश्नाची उत्तर नवंवधूला मिळत नाहीत. अनेक प्रकरणात हे प्रकर्षाने जाणवते की लग्न ठरून ते होईपर्यंत कोणत्या न कोणत्या कारणावरून काहींना काही कुरबुरी दोन्ही बाजूने झालेल्या असतात. त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि पुढे जाऊन जेव्हा अडचणी निर्माण होऊ लागतात मग तेव्हाच निर्णय बदलला असता तर असे वाटायला लागते.

नवीन लग्न झाल्यावर पहिले अपत्य कधी होऊ द्यायचे यावरून देखील नवविवाहित पतीपत्नीत मतभेद होतात. लग्नानंतर करियर करु इच्छिणार्‍या मुलींना याबाबत नवर्‍याची, सासरच्या लोकांची अपेक्षापूर्ती ताबडतोब करणे मान्य नसते. अनेक ठिकाणी सासूने सासुरवास काढलेला असतो, तीच अपेक्षा ती नवीन सुनेकडून करते. जास्त मवाळ वागलो तर सून डोक्यावर बसेल, सून मुलगा हाताबाहेर जातील, वेगळे निघतील, सून प्रॉपर्टीमध्ये हक्क सांगेल, आपल्याला म्हातारपणी आधार देणार नाही सगळं स्वतः च्या नावावर करून घेईल, आपल्याला सांभाळणार नाहीत या विचाराने तिच्याशी मुद्दाम कठोर वागले जाते, तिच्या सहनशक्ती आणि संयमाची जणू जाणूनबुजून परीक्षा घेतली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -