Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स जागतिक नेत्रदान दिन

जागतिक नेत्रदान दिन

Related Story

- Advertisement -

डोळे ही सजीवांना मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. मात्र, काही जण त्यापासून वंचित असतात. जन्मजात आंधळे असणे किंवा अपघाताने अंधत्व येणे यामुळे अशा व्यक्ती सृष्टीच्या सौंदर्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. मात्र, आज विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या आधारे आपण एका व्यक्तीची दृष्टी दुसर्‍या एका अंध व्यक्तीला देऊन त्याचे जीवन प्रकाशित करू शकतो. नेत्रदानासाठी जगभरातील विविध सामाजिक, रुग्णालयीन संस्था पुढे येत आहेत. लोकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच नेत्रदानाबद्दल माहिती देण्यासाठी या संस्थांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

१० जून रोजी ‘जागतिक नेत्रदान दिन’ साजरा केला जातो. महाराष्ट्रात प्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेत्रदान दिनाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने नेत्रदानासाठी इच्छुक सर्वांनी जवळील एका नेत्रपेढीत जाऊन नावाची नोंदणी करावी. मृत्यूनंतर नेत्रदान होत असल्याने, आपल्या मृत्यूनंतर अंधाला नेत्रदान करून आपण त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणू शकतो. दृष्टीविकार प्रतिबंधक आणि अंधत्व नियंत्रण कार्यक्रम या पूर्णपणे केंद्र पुरस्कृत कार्यक्रमात अनेक नेत्रपेढ्या आणि फिरती नेत्र पथके यांचा समावेश आहे. त्यामुळे जनसामान्यात दृष्टीदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी केंद्र सरकारसुद्धा प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. राज्यात नऊ लाखांपेक्षा जास्त लोक नेत्रहीन आहेत. राज्यातील अंध व्यक्तींची ही आकडेवारी फारच चिंताजनक आहे. सन १९७९ मध्ये आणि त्यानंतर राज्यात अंधत्व निवारण आणि दृष्टिहिनांच्या मदतीसाठी विविध नेत्रशिबिर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

- Advertisement -

नेत्रदानाविषयी लोकांमध्ये कमालीचे समज गैरसमज असल्याचे आपण पाहतो. त्यामुळे नेत्रदान, नेत्रपेढी, तिचे कार्य याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. १ वर्षांवरील व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीने जिवंतपणी नेत्रदानाची लेखी इच्छा व्यक्त करणे गरजेचे आहे. त्यानंतर व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याचे नातेवाईक, मित्रमंडळींनी त्याच्या इच्छेचा मान राखत त्या व्यक्तीचे नेत्रदान करणे महत्त्वाचे आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६ तासांच्या कालावधीत नेत्रदान होणे गरजेचे आहे. तेव्हा व्यक्तीच्या नातेवाईकांनी तात्काळ नेत्र पेढीत संपर्क साधून नेत्रदानाविषयी कळवले पाहिजे. त्यानंतर दृष्टिहिनांना मागणीनुसार या नेत्रपेढीतून नेत्रदान करण्यात येते. विशेष म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मा वापरत असलेल्या व्यक्तीही नेत्रदानास पात्र ठरतात.

नेत्रदानाची प्रक्रिया फारशी गुंतागुंतीची नसून मृत्यूनंतर अवघ्या अर्धा तासात नेत्रदानाची प्रक्रिया पार पडते. नेत्रदानात संपूर्ण डोळ्याचे रोपण न करता केवळ डोळ्याच्या बाहुलीच्या पडद्याचे रोपण केले जाते. त्यामुळे डोळ्याच्या बाहुलीच्या पडद्यात दोष असणार्‍या व्यक्तींना या शस्त्रक्रियेचा खूप लाभ होतो. त्यामुळे दृष्टिहिनांच्या जीवनाला नवी दृष्टी प्राप्त होते. आपण नेहमीच अन्नदान, रक्तदान आणि विविध प्रकारचे दान करून समाजाच्या प्रति आपले कर्तव्य पार पाडत असतो. मात्र, अवयवदानाबाबत आपण तेवढे जागरुक दिसत नाही. नेत्रदान, अवयवदानाने आपण गरजूला जीवनदान देऊ शकतो. तेव्हा आजच्या नेत्रदानाच्या निमित्ताने आपण सर्वांनी नेत्रदान करण्याविषयी प्रतिज्ञा करूया.

- Advertisement -