घरफिचर्सभावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ!

भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ!

Subscribe

मी पाच वर्षांपूर्वी एका कंपनीत काम करत होतो. आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगा नव्याने जॉईन झाला होता. कुणालाही कुठलीही मदत करायला नेहमी तत्पर असल्यामुळे तो अल्पावधीत सगळ्यांमध्ये प्रिय झाला. त्याचे बोलणे आणि वागणे प्रवाहाविरुद्ध आणि हटके असल्यामुळे तो आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधून घेत असे. एकदा तो मला म्हणाला, सर, मला उद्या सुट्टी हवी आहे. माझ्या गर्लफ्रेंडचे लग्न ठरले आहे. मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यावर तो फारसा विचलित न होता म्हणाला, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ.

आमच्या ऑफिसमध्ये एक तरूण मुलगा जॉईन झाला. नुकतेच त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. फ्रेशर होता. पण अतिशय हरहुन्नरी आणि चुणचुणीत होता. कुठलेही काम करायला तो सदैव तत्पर असे. त्यामुळे ते ऑफिसमध्ये अल्पावधीतच सगळ्यांमध्ये प्रिय झाला. त्याचे विशेष म्हणजे कुठल्याही विषयावर त्याचे स्वत:चे असे वेगळे मत आणि तत्त्वज्ञान असे. कुणी एखादा मुद्दा मांडला की, त्यावर तो सहजासहजी सहमत होत नसे. त्याची वेगळी मते तो ठामपणे मांडत असे. काही वेळा तो अती करतो असे वाटायचे. पण त्याचे मुद्दे पटवून देण्यासाठी त्याची जी धडपड सुरू असायची, ती पाहिल्यावर त्याच्यासमोर आम्हाला हात जोडण्याशिवाय गत्यंतर उरत नसे. त्याचे मुख्य नाव वेगळे होते. ऑफिसमध्ये तो सगळ्यांमध्ये रोनाल्डो या नावाने फेमस झाला. त्याला फुटबॉल प्रचंड आवडत असे. सर्वसाधारणपणे आपल्याकडे क्रिकेट लोकप्रिय आहे. त्यामुळे लोक त्याच्यावर चर्चा करत असतात, पण रॉनी मात्र फुटबॉलच्या विचारांमध्ये नेहमी दंग असे. ‘आपली फुटबॉलची मानसिकताच नाही, त्यामुळे आपला देश फुटबॉलमध्ये जागतिक स्पर्धांमध्ये झळकू शकत नाही.

आपण फक्त क्रिकेट क्रिकेट करत राहतो, असे तो टेबलावर हात आपटत म्हणत असे. थोडक्यात काय तर आपण प्रवाहाविरुद्ध पोहले पाहिजे. आपण हटके असले पाहिजे, असा त्याचा नेहमीच कल असे. त्याचे एक एक किस्से ऐकले की, आम्ही थक्क होऊन जात असू. मी त्याच्यापेक्षा ऑफिसमध्ये वयाने आणि अनुभवाने बराच सिनियर होतो. रोनाल्डोचे एक एक फण्डे पाहिले की, आपल्याला अजून बरेच काही शिकण्याची गरज आहे, असे प्रकर्षाने जाणवू लागे. बरेच वेळा तो आपल्याच तंद्रीत वावरत असे. एकाच वेळी तो वेगवेगळ्या विषयांवर विचार करतो की काय, असे वाटू लागत असे.

- Advertisement -

त्याला त्या विषयी काही विचारण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वीरित्या बगल देत असे आणि आमच्या ट्रॅपमधून झटकन सटकत असे. तो आमच्या ऑफिसमध्ये नोकरी करत असला तरी त्याला पुढे एक मोठा उद्योगपती व्हायचे आहे, असे तो कधी कधी बोलून दाखवत असे. टाटा, बिर्ला, अंबानी, बिलगेट्स, स्टिव्ह जॉब्स हे त्याचे आदर्श होते. त्याचे हे बोलणे ऐकूण आम्ही त्याची टर उडवत असू. त्याला टाटा, बिर्ला अशा टोपण नावाने काही वेळा हाक मारत असू, पण तो त्यावर ज्यास्त काही न बोलता तो एक कुत्सित कटाक्ष आमच्यावर फेकत असे. त्याला त्याच्या नजरेतून असे सांगायचे असे की, लेकांनो आता करा माझी मस्करी. काही वर्षे जाऊदेत, मग तुम्ही माझी शान बघाल. माझा ऑटोग्राफ घेण्यासाठी धडपडाल.

रोनाल्डो एका दिवशी छान मूडमध्ये होता. पण त्याच्या मनात काय होते ते काही कळायला मार्ग नव्हता. कारण कधी तो म्हणायचा, मला ओरिजिनल रत्नागिरी हापूस आंबे अमेरिकेला एक्सपोर्ट करायचे आहेत. कारण अलीकडे ओरिजिनल आंबा मिळत नाही. काही वेळा म्हणायचा, मला मसाला किंग व्हायचे आहे. दुबईतला भारतीय मसाला किंग धनंजय दातार यांची मी भेट घेतली आहे. त्यांच्यासारखा मला बिझिनेस करायचा आहे. त्याला आम्ही विचारत असू हे सगळे करण्यासाठी भांडवल लागते. ते तू कुठून आणणार ? तर तो म्हणायचा. व्यवसायात पुढे यायला हिंमत लागते. बिलगेट्स आणि स्टिव्ह जॉब्स यांच्याकडे सुरुवातीला कुठे होते भांडवल? आयुष्यात कुठलीही गोष्ट सेट करायला हिंमत लागते. एकदा दुपारनंतर मला म्हणाला, सर आज मी थोडं लवकर निघालं तर चालेल का ? गाडी आज जरा जास्तच रंगात होती, म्हणून मी उत्सुकतेनेच विचारले, काय रे, काही काम आहे का ? त्यावर तो झटकन म्हणाला, मला गर्लफ्रेंडला भेटायला जायचं आहे. तिला आज मी वेळ दिला आहे. मी विचारले तुला गर्लफ्रेंड आहे ? त्यावर तो म्हणाला, हो आहे. बोलताना त्याच्या डोळ्यांमध्ये आत्मविश्वास आणि उत्सुकता यांचे बेमालूम मिश्रण मला दिसले. मी म्हणालो, ठिक आहे जा. त्यानंतर त्याने झटकन आपली सॅक खांद्याला मारली आणि आजूबाजूला न बघता तडक निघाला.

- Advertisement -

आमच्या ऑफिसमध्ये त्यानंतर रोनाल्डोची गर्लफ्रेंड आणि त्याचे प्रेमप्रकरण याविषयी हलक्या आवाज नेहमीच चर्चा रंगू लागली. रोनाल्डोला हे सगळे ऐकू जात असे. पण तो त्यात काय विशेष, अशाच भावनेतून एखादा कटाक्ष टाकून आपल्या कामामध्ये गुंतून जात असे. त्याचा मोबाईल वाजला की, त्याच्यापेक्षा आजूबाजूच्या सहकार्‍यांचेच कान जास्त उत्सुकतेने टवकारले जात असत. रोनाल्डो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पुढे लग्न करेल, असेच आम्हा सगळ्यांना वाटत होते. ऑफिसमधलेे नेहमीचे काम आणि मधे मधे लोणच्यासारखा चवीला रोनाल्डोचा विषय असे सगळे चालले होते. एक दिवस रोनाल्डो मला म्हणाला, सर, उद्या मला सुट्टी हवी आहे. त्यावर मी कुतूहलाने त्याला विचारले, ‘काय, वाटचाल अंतिम टप्प्यावर आलेली दिसते’. त्यावर तो शांत राहिला. त्यावर मी विचारले, ‘काय झालं रे ?’ त्यावर म्हणाला, ‘माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न ठरलं आहे. तिच्या लग्नाच्या परचेसिंगसाठी तिच्यासोबत जायचे आहे’. ते ऐकूण मला धक्काच बसला. पण त्याच्यावर त्याचा काही विशेष परिणाम झालेला दिसला नाही. मी म्हणालो, आम्हाला वाटले की, गर्लफ्रेंडसोबतच तुझं लग्न होईल. त्यावर त्याच्या नेहमीच्या झटकन उत्तर देण्याच्या सवयीनुसार तो म्हणाला, तुमचे विचार जुने आहेत. मुलगा आणि मुलगी एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकतात. मी म्हणालो, भावना वगैरे. त्यावर त्याच्या नेहमीच्या आत्मविश्वासाने तो म्हणाला, सर, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -