आहार भान – लिंबाचे गोड, तिखट, आंबट लोणचे

how to make lemon sweet spicy pickle
आहार भान - लिंबाचे गोड, तिखट, आंबट लोणचे

साठवणीचे पदार्थ म्हणजे लोणची, मुरांबे ही उन्हाळ्यातील कामे असे आपल्या डोक्यात पक्क बसलेले असते. पण काही लोणची, मुरांबे हिवाळ्यात करायचे असतात. उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी. लिंबाची गोड/ तिखट लोणची, मोरावळा, आवळ्याचे सरबत, लिंबाचे सरबत अशा काही गोष्टी पुढच्या काही भागात आपण करणार आहोत.

ऑगस्ट ते फेब्रुवारीपर्यंत पिवळी धम्मक रसदार लिंबू बाजारात स्वस्त मिळतात. मार्चमध्ये तापमान चढले की हीच लिंबे काहीच्या काही महाग होतातकैरीचे लोणचे जास्त लोकप्रिय असले तरी आजारपणात तोंडाची गेलेली चव परत आणते ते लिंबाचे लोणचे. लिंबाचे गोड आंबट तिखट लोणचे करायला अगदी सोप्पे पण थोडा वेळ खाणारे. पण आज आपण ते कसे करतात हे पाहणार आहोत.

साहित्य 

 • पिवळी, रसदार लिंबू – १०
 • रेडी लिंबू लोणचे मसाला एक पाकीट
 • गूळ – ४०० ग्रॅम
 • हिंग एक छोटा चमचा
 • हळद एक छोटा चमचा
 • काश्मिरी मिरची पावडर – २-३ चमचे
 • तीळाचे तेल पाव लिटर
 • सैंधव मीठ चवीनुसार

कृती 

 1. लिंबे धुवून प्रत्येक लिंबाच्या ८-१० फोडी करावेत. लिंबाच्या बिया जमतील तितक्या काढाव्यात.
 2. एका काचेच्या बरणीत या लिंबाच्या फोडी थोडे सैंधव मीठ घालून ठेवाव्यात. बरणीचे झाकण घट्ट लावून बरणी चांगली हलवावी म्हणजे फोडींना मीठ चांगले लागते.
 3. सूर्य प्रकाश लागणार नाही अशा कोरड्या जागी ही बरणी ठेवावी.
 4. रोज किमान एकदा दोनदा तरी बरणी चांगली हलवावी .
 5. ७-८ दिवस लिंब अशी ठेवली म्हणजे सालितला कडवट पणा कमी होतो.
 6. लिंबाच्या फोडी नरम पडल्या म्हणजे एका चाळणीत काढाव्यात म्हणजे जादाचे पाणी निघून जाईल.
 7. एका कढईत पाव लिटर तीळाचे तेल घ्यावे. मध्यम आचेवर चांगले कडकडीत तापवावे. अधून मधून चमच्याने ढवळवावे म्हणजे सर्व तेल चांगले तापते आणि नंतर तेलाचा वास येत नाही.
 8. गॅस बंद करावा. तेल थोडे थंड झाले की त्यात एक छोटा चमचा हिंग घालावा.
 9. तेल अजुन थोडे थंड झाले की त्यात एक छोटा चमचा हळद घालावी.
 10. दोन टी स्पून सैंधव मीठ घालावे.
 11. तेल थोडे कोमट असताना बारीक चिरलेला देशी गूळ घालावा.
 12. तेल पूर्णपणे थंड झाले की एक पाकीट रेडी लिंबू लोणचे मसाला घालावा. हवे असल्यास १-२ चमचे काश्मिरी मिरची पावडर घालावी म्हणजे लोणच्याला चांगला लाल भडक रंग येतो पण तिखटपणा येत नाही. चांगले एकजीव करावे.
 13. आता यात लिंबाच्या फोडी घालाव्यात. चांगले मिक्स करून १-२ तास तसेच भांड्यात ठेवावे.
 14. नंतर एका काचेच्या कोरड्या, स्वच्छ बरणीत भरून सूर्य प्रकाश लागणार नाही अशा कोरड्या जागी ठेवावे.
 15. दर २-३ दिवसांनी कोरडा चमचा घेवून वर खाली करावे.
 16. तेलाचा तवंग लोणाच्यावर नेहमी राहायला हवा. तसेच लोणच्याचा खार बरणीला, झाकणाला , कडाना लागायला नको म्हणजे बुरशी येत नाही. बरणीचा वरचा भाग नेहमी टिश्यू पेपर ने स्वच्छ करावा म्हणजे लोणचे खराब होत नाही.

१५ दिवसांनी तुमचे लिंबाचे गोड तिखट आंबट लोणचे तयार. आजारी माणसाच्या तोंडाची चव परत आणणारे गुणकारी लोणचे.

डॉ. ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]