घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रफसव्या कॉलव्दारे १.१० कोटींना गंडा

फसव्या कॉलव्दारे १.१० कोटींना गंडा

Subscribe

सायबर पोलिसांकडे वर्षभरात २० हून अधिक तक्रारी, सावधगिरी बाळगण्याचे नाशिक पोलिसांचे आवाहन

नाशिकशहरात सायबर क्राईममध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सायबर चोरटे लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन फंडे वापरत आहेत. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा असे सांगितले जात असले तरीही अनेक सुसिक्षित नागरिकच फसवणुकीला बळी पडत असून, आयुष्याची कमाई अवघ्या काही मिनिटांमध्ये गमावत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत नाशिक शहरात २० हून अधिक नागरिक फसव्या कॉलला बळी पडले आहेत. बँक खात्याची गोपनीय माहिती मिळताच चोरट्यांनी तब्बल २० हून अधिक नागरिकांना १ कोटी १० लाख ७ हजार ९३८ रुपयांना गंडा घातला आहे.

नाशिक पोलिसांत दाखल गुन्ह्यांनुसार नोकरीच्या आमिषाने उच्चशिक्षितांना फसविल्याचे प्रमाण अधिक आहे. लाखो रुपयांच्या पॅकेजसह ’वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाला फिर्यादी बळी पडले आहेत. त्यामध्ये आयटी, इंजिनिअर, डॉक्टर यांच्यासह पदव्युत्तर पदवीधारकांचा समावेश आहे. अनेकांनी या स्वरूपाच्या नोकरीसाठी इतरांकडून व्याजाने पैसे घेतले. तर काहींनी स्वत:च्या बँक खात्यातील सर्व रक्कम संशयितांच्या बँक खात्यात जमा केल्याची उदाहरणे आहेत. विविध मोबाईल क्रमांक, खासगी बँक खाते क्रमांकाचा वापर करून सायबर चोरटे फसवणूक करत आहे. एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित रक्कम मिळाल्यावर संबंधित मोबाईल क्रमांक, ई-मेल अथवा सोशल मीडियावर खाते त्वरीत बंद केले जाते. विशिष्ट स्वरूपाचे वाय-फाय नेटवर्क किंवा चौदापेक्षा जास्त आकडी मोबाइल क्रमांकाचा वापर करून ही फसवणूक केली जात आहे. त्यामुळे या स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल करणे किंवा त्यातील मुद्देमाल परत मिळविणे हे पोलिसांच्या तपासाच्या दृष्टीने सद्य:स्थितीत अतिशय अवघड झाले आहे.

- Advertisement -

फसव्या कॉलपासून नागरिकांनी सावध रहावे. गूगलवर अनेक फसवे क्रमांक व संकेतस्थळ आहेत. अधिकृत संकेतस्थळाचा वापर नागरिकांनी करावा. कोणालाही बँक खात्याची गोपनीय माहिती देवू नये. आधारकार्ड व केवायसी अपडेट, एमएसईबी व बँकेतून बोलत असल्याचे भासवून फसविले जात असल्याचे समोर आले आहे. अनोळखी लिंक, संकेतस्थळावर खासगी माहिती व फोटो अपलोड करू नये.
– प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, नाशिक

हॅकर्स व गुन्हेगार स्वतःची ओळख लपवण्यासाठी मृत व्यक्तींचे आधार कार्ड, पॅन कार्डचा वापर करून मोबाईल कंपन्यांकडून सीम मिळवतात. त्यावरून नागरिकांना गंडा घालत. सावधगिरीसाठी मोबाईल फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा यावर टिकली किंवा शटर लावावे. त्यामुळे ब्लॅकमेल करता येणार नाही. कोणीही बँक खात्याची माहिती देवू नये.
तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

अशी घ्या खबरदारी 

  1. सोशल मीडियावर कोणत्याही लिंकवर क्लिक करणे टाळा
  2. नोकरीसाठी एखाद्या कंपनीत, संस्थेत स्वतः जा; मोबाईलवरून संपर्क टाळा, आधार, पॅन कार्डचे क्रमांक कोणालाही सांगू नका
  3. ई-स्वरूपात मिळालेल्या आमिषाला, प्रलोभनाला बळी पडू नका. अनोळखी व्यक्तिशी ई-आर्थिक व्यवहार करू नकामोबाईल अ‍ॅक्सेस इतरांना देवू नका.
  4. सायबर गुन्ह्याची शक्यता वाटल्यास त्वरित पोलिसांत संपर्क साधा.
  5. https://cybercrime.gov.in/ येथे तक्रार नोंदवा. तात्काळ मदतीसाठी १९३० वर कॉल करा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -