घरमहाराष्ट्रमुंबईत 'ट्रॅश बूम'द्वारे काढला नदी-नाल्यांमधील तब्बल 10 हजार 500 क्‍युबिक मीटर तरंगता...

मुंबईत ‘ट्रॅश बूम’द्वारे काढला नदी-नाल्यांमधील तब्बल 10 हजार 500 क्‍युबिक मीटर तरंगता कचरा!

Subscribe

मुंबई : मुंबईतील नदी, नाल्यांमध्ये वाहून येणारा तरंगता कचरा थेट समुद्रामध्ये जात असल्याने जलप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने अशा आठ ठिकाणी सरकत्या पट्ट्यांसह लावलेल्या ट्रॅश बूमच्या साहाय्याने मागील तीन महिन्यांत तब्बल 10 हजार 500 क्यूबिक मीटर तरंगता कचरा काढला आहे. तसेच, डंपरच्या 750 फेऱ्यांद्वारे हा कचरा वाहून नेत त्याची योग्यरितीने विल्हेवाट लावण्यात आली आहे, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. भविष्यात इतरही ठिकाणी ही ट्रॅश बूमची संकल्पना राबविण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे.

मुंबईतील जलप्रदूषण रोखून अधिकाधिक पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. मुंबईलगतचा समुद्र किनारा स्वच्छ राखणे, जलप्रदूषण रोखणे, मुंबईतील खारफुटीचे क्षेत्र प्‍लास्टिक मुक्‍त राखणे, प्‍लास्टिक आणि इतर तत्सम कचरा समुद्रामध्ये थेट वाहून न जाता त्यापूर्वीच तो संकलित करणे, त्‍याची योग्यरीत्या विल्‍हेवाट लावणे यासाठी महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजनांची चाचपणी करण्यात येत आहे. विदेशांमध्ये ट्रॅशबूम किंवा ट्रॅशनेट या तंत्राचा उपयोग करुन अशा उपाययोजना प्रभावीपणे करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची अंमलबजावणी मुंबईतही करता यावी म्हणून महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला निर्देश दिले होते. त्यानुसार पर्जन्यजल खात्याने मुंबईत एकूण आठ ठिकाणी ट्रॅशबूम व त्याला जोडून सरकते पट्टे असलेली यंत्रणा आता स्थापित केली आहे. त्यामुळे प्रवाहांमधील तरंगता कचरा अडवणे आणि अडवलेला कचरा बाहेर काढणे ही दोन्ही कामे अतिशय वेगाने व सुलभपणे होऊ लागली आहेत.

- Advertisement -

ही यंत्रणा कार्यान्वित झालेल्या आठ ठिकाणांमध्ये, पश्चिम उपनगरात जुहूतील गझधरबंध नाला तसेच मेन अव्‍हेन्‍यू नाला, अंधेरीतील मोगरा नाला, ओशिवरा नदी, पोइसर नदी, दहिसर नदी, वाकोला नदी तर पूर्व उपनगरातील मिठी नदी (वांद्रे-कुर्ला संकूल जोडपूल) येथे ट्रॅशबूम प्रणालीची स्‍थापना करण्यात आली आहे. संयंत्रांची उभारणी केल्यानंतर प्रारंभी चाचणी करण्यात आली. चाचणीअंती सर्व यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 15 जुलैपासून या सर्व आठही ठिकाणची ही यंत्रणा नियमितपणे कार्यान्वित करण्यात आली. तर नवव्या ठिकाणी म्हणजे मिठी नदीवर माहिम निसर्ग उद्यानाला लागून असलेल्या जागी येत्या आठवडाभरात ही यंत्रणा सुरू होणार आहे.

45 कोटी 20 लाख रुपयांचे कंत्राट
मुंबईतील विविध नऊ नदी – नाल्यांच्या ठिकाणी ट्रॅशबूमसह सरकता पट्टा लावून तरंगता कचरा अडवणे, तो संकलित करुन बाहेर काढणे यासाठी आवश्यक यंत्रणेचा पुरवठा, स्‍थापना, चाचणी व कार्यान्वित करणे, संकलित कचऱ्याची विल्‍हेवाट लावणे, तसेच संपूर्ण यंत्रणेचे पुढील तीन वर्षांचे प्रचालन व परीरक्षण करणे अशा एकत्रित कामासाठी निविदा मागविण्‍यात आल्‍या होत्या. त्यानुसार 45 कोटी 20 लाख रुपये किमतीचे कंत्राट देण्यात आले आहे. यामध्ये ट्रॅशबूम प्रणालीच्‍या स्‍थापनेची किंमत 13 कोटी 46 लाख रुपये आहे. तर पुढील तीन वर्षांकरीता या प्रणालीतून कचरा संकलित करणे, बाहेर काढणे, काढलेला कचरा वाहून नेणे, वाहून नेल्यानंतर त्‍याची योग्यरितीने विल्‍हेवाट लावणे, या संपूर्ण कामांचा एकूण खर्च 31 कोटी 73 लाख रुपये इतका आहे. ही ट्रॅशबूम प्रणाली ही डेन्‍मार्कमधील त्याचे मूळ उत्‍पादक मेसर्स डेस्‍मी एन्‍व्‍हारो केअर यांच्याकडून आयात करण्‍यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईचा समुद्रकिनारा, तसेच महानगरातील नदी-नाले स्वच्छ राखण्यासाठी, एकूणच जलप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी प्‍लास्टिक तसेच तत्सम कोणत्‍याही प्रकारचा कचरा नदी, नाल्‍यांमध्‍ये टाकू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -