घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशकात ५ वर्षांत १० हजार "घटस्फोट"

नाशकात ५ वर्षांत १० हजार “घटस्फोट”

Subscribe

सुशांत किर्वे । नाशिक

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र, त्या सुटायला किंवा तुटायला क्षुल्लक वाटावे, असे एखादे कारणही पुरेसे होते. याचा प्रत्यय गेल्या पाच वर्षांमध्ये नाशिक शहरात झालेल्या घटस्फोटांच्या वाढत्या संख्येने दिसून येत आहे. शहर कौटुंबिक न्यायालयात गेल्या पाच वर्षांमध्ये दाखल दाव्यांची माहिती घेतली असता तब्बल 10 हजार 14 दाव्यांमध्ये जोडप्यांचे घटस्फोट झाल्याची धक्कादायक तितकीच गंभीर बाब पुढे आली आहे. या दाव्यांची आकडेवारी पाहता घटस्फोट मिळवण्यासाठीचे दररोज सुमारे 10 दावे दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

‘हल्ली घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे’ असे सहजपणे बोलले जाते. आज जे उंची विवाहसोहळे पार पडत आहेत, त्यातील बर्‍याचशा विवाहितांचे एक ते दीड वर्षात घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते, असेही सांगितले जाते. याबाबीची शहानिशा करण्यासाठी ‘आपलं महानगर’ने नाशिकरोड येथील कौटुंबिक न्यायालयाशी संपर्क साधून माहिती घेतली असता गंभीर बाबी पुढे आल्या. त्यानुसार या न्यायालयात २०१८ ते ऑक्टोबर २०२२ या पाच वर्षांमध्ये तब्बल 6 हजार 638 इतके घटस्फोटाचे दावे दाखल झाले. त्यापैकी 5 हजार 460 दावे न्यायालयात निकाली निघाले.

या निकाली निघालेल्या दाव्यांतील 10 हजार 14 दाव्यांतील जोडप्यांचे घटस्फोट झाले. निकाली निघालेल्या दाव्यात अवघ्या एक हजार ९७४ जोडप्यांची मने पुन्हा जुळली असून, त्यांचे संसार सुरळीत सुरू झाले. दाखल दाव्यांमुळे प्रलंबित दाव्यांची संख्या २०१८ ते २०२२ या कालवधीत दरवर्षी वाढली आहे. कौटुंबिक वादात तडजोड होण्याचे प्रमाण घटस्फोटांच्या तुलनेत कमी असल्याचे कौटुंबिक न्यायालय, नाशिकच्या आकडेवारीतून समोर आले आहे. घटस्फोटाचे दावे दाखल झाल्यानंतर कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशकांकडून दाम्पत्याचे समुपदेशन केले जाते. काही प्रकरणांमध्ये दाम्पत्यात वाद मिटवून पुन्हा संसाराची गाडी रुळावर आणण्यात यश आले आहे. कोरोनाकाळात अनेकांची वेतन कपात झाली तसेच काही जणांना नोकरीही सोडवावी लागली. अशा परिस्थितीला अनेक दाम्पत्य धैर्याने सामोरे गेली. मात्र, याच काळात काही दाम्पत्यांमधील वाद देखील वाढल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -
  • नाशिक शहरात कोरोनाच्या लॉकडाऊन काळात न्यायालयाचे कामकाज बंद होते. निर्बंध शिथिल झाल्याने कोरोना नियमावलीनुसार कामकाज सुरू झाले. मात्र, या काळात जी जोडपी बाहेरगावची होती ती न्यायालयात येऊ शकत नव्हती. त्यातच एकतर्फी बाजूने घटस्फोट हवा असेल तर पुढे जाता येत नव्हते. त्यामुळे कोरोनाकाळानंतर घटस्फोटाच्या निकाली निघालेल्या दाव्यांची संख्या अधिक दिसते.

व्हा व्यक्त, मांडा आपली मते

 घटस्फोटांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. ही समस्या केवळ नाशिकमध्येच नव्हे तर मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, जळगाव यांसारख्या शहरांतदेखील वाढलेली आहे. एवढेच नाही तर आजकाल ग्रामीण भागातही घटस्फोट वाढले आहेत. त्याचा दूरगामी परिणाम मनोसामाजिक घटकांवर होत आहे. या पार्श्वभूमीवर घटस्फोटांमागील कारणे नेमकी कोणती, त्याचा वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर होणारे परिणाम आणि हे प्रमाण कमी होण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवल्या जाऊ शकतात यावर सखोल प्रकाश टाकणारी ‘आपलं महानगर’ आजपासून ‘तुझं माझं जमेना’ ही विशेष वृत्तमालिका सुरू करत आहे. या संदर्भात आपली काही मते असल्यास ती ९०२२५५७३२६ या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर पाठवावीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -