राष्ट्रपतीपदाची निवडणूक : महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मूंना मिळाली १८१ मते

draupadi murmu

मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्या. त्यांना ७१.२९ टक्के मते मिळाली आहेत. एकूण १०,५८,९८० मूल्यांच्या ४७०१ वैध मतांपैकी त्यांना ६,७६,८०३ मूल्याची २८२४ मते मिळाली. महाराष्ट्रातून त्यांना ३१,६७५ मूल्यांची मते मिळाली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार, १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाले तर, आज, २१ जुलै रोजी मतमोजणी झाली. पहिल्या फेरीत खासदारांच्या मतांची मोजणी झाली. एकूण वैध मतांपैकी ३,७८,००० मूल्यांसह ५४० मते द्रौपदी मुर्मू यांना तर, १,४५,६०० मूल्यांसह २०८ मते विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मिळाली. १५ मते अवैध ठरली, अशी माहिती राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांनी दिली.

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये मतमोजणी झाली. कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओदिसा आणि पंजाब या राज्यांत एकूण १ लाख ६५ हजार ६६४ मतमूल्यांची १ हजार ३३३ मते होती. त्यापैकी द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मते मिळाली. तर, यशवंत सिन्हा यांना ५२१ मते मिळाली. महाराष्ट्राचा विचार करता, २८७पैकी २८३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील ४ मते अवैध ठरली. तर, उर्वरित २७९ आमदारांपैकी १८१ मते द्रौपदी मुर्मू यांना तर, ९८ मते यशवंत सिन्हा यांना मिळाली. द्रौपदी मुर्मू यांना मिळालेल्या मतांचे मूल्य ३१,६७५ आणि यशवंत सिन्हा यांना मिळालेल्या मतांचे मूल्य १७,१५० आहे. राज्यात प्रत्येक मताचे मूल्य १७५ होते. लोकसंख्येनुसार हे मतमूल्य निश्चित केले जाते.