घरमहाराष्ट्रआगडोंब! वर्सोवात २५ गॅस सिलिंडरचा स्फोट, सातार्‍यात पाच खासगी शिवशाही जळल्या

आगडोंब! वर्सोवात २५ गॅस सिलिंडरचा स्फोट, सातार्‍यात पाच खासगी शिवशाही जळल्या

Subscribe

राज्यात बुधवार हा अग्नीप्रलयाचा दिवस ठरला. मुंबईतील वर्सोवा येथे सकाळी एलपीजी गॅस सिलिंडरच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत २५ गॅस सिलिंडरचे स्फोट होऊन संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. या आगीत चार जण भाजून जखमी झाले आहेत. तर सातार्‍यातील एसटी आगरात पाच खासगी शिवशाही बसला भीषण आग लागली. या आगीत पाचही बस जळून खाक झाल्या आहेत. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.

वर्सोवा येथील एलपीजी गॅस सिलिंडरच्या गोदामाला बुधवारी सकाळी ९.३५ वाजताच्या सुमारास एका गोदामाला आग लागली. हळूहळू ही आग वाढत गेली. त्यानंतर या आगीचा कदाचित लिकेज असलेल्या गॅस सिलिंडरमधील गॅसशी संपर्क आल्याने आगीचा भडका उडाला. नंतर या आगीने भीषण रूप धारण केल्याने त्यामध्ये एका मागून एक गॅस सिलिंडरचे भीषण स्फोट घडत गेले. आगीची बातमी पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली.

- Advertisement -

सदर एलपीजी गॅस सिलिंडरचा साठा केलेले गोदाम हे रहिवाशी परिसरात असल्याने नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या आगीत गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने आजूबाजूच्या बांधकामांना तडे गेले आहेत.

सदर ठिकाणी सकाळी ९.३५ वाजताच्या सुमारास आग लागली. सकाळी १०.०२ वाजता ही आग स्तर १ ची झाली. नंतर आग भडकल्याने सकाळी १०.०६ वाजता आग स्तर -२ ची झाल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले. अग्निशमन दलाने ८ फायर इंजिन, ७ वॉटर टँकर यांच्या सहाय्याने ह्या आगीवर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळवून आग विझविली.

- Advertisement -

चार जण जखमी
या भीषण आगीत मुकेश कुमावत (३०) आणि मनजीत खान (२०) हे दोघेजण ६०टक्के भाजले तर राकेश कडू (३०) आणि लक्ष्मण कुमावत (२४) हे दोघेजण ४०टक्के भाजले असल्याने एकूण चार जण जखमी झाले आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

सुदैवाने शाळा, रुग्णालय वाचले
यारी रोड मंगलनगर, येथे एलपीजी गॅस सिलिंडरचा साठा तळमजला अधिक एकमजली गोदामात साठविण्यात आला होता. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी तेथील घरांना तडे गेले. तर गॅस सिलिंडरचे स्फ़ोट झाल्याने या सिलिंडरचे अवशेष आजूबाजूला उडाले. घटनास्थळापासून नजीकच अंजुमन शाळा असून सुदैवाने ही शाळा बंद असल्याने पुढील अनर्थ टळला. तसेच, जवळच काळसेकर रुग्णालय असून त्याला काही हानी झाली नसल्याने सुटकेचा निःश्वास सोडण्यात आला.

गॅस सिलिंडर फुटून इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर पडला
ज्या ठिकाणी गॅस गोदामाला आग लागली व गॅस सिलिंडरचे स्फोट झाले, त्यापैकी एक सिलिंडर जवळच्या एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर जाऊन पडल्याचे माजी नगरसेवक व विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

शिवशाहीला अचानक आग
सातारा एसटी आगारात उभ्या असलेल्या पाच शिवशाही बसला अचानक आग लागली. आगारात इतर प्रवासीही उपस्थित होते. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही तासांतच आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसला आग लागली की लावली गेली याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पंचनामा सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -