नाशिकमध्ये दोन बाधितांचा मृत्यू; नवे 25 रूग्ण पॉझिटिव्ह

Three positives on the same day in Nandgaon

मालेगावपाठोपाठ नाशिक शहर करोनाचे हॉटस्पॉट बनले असून, दिवसेंदिवस बाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. सोमवारी (दि.८) शहरात पाच नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात प्रशासनास नवीन २५ रूग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये मालेगाव १७, माडसांगवी २, देवळाली कॅम्प २, पंचवटी, जेहान सर्कल, शिंगाडा तलाव, पिंपळगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ६१३ बाधित रूग्ण असून, एकट्या नाशिक शहरातील एकूण संख्या ४३० वर पोहोचली आहे.

जिल्हा प्रशासनास सोमवारी दिवसभरात तीन टप्प्यात अहवाल प्राप्त झाले. पहिल्या टप्प्यात सोमवारी दुपारी १ वाजेदरम्यान ४१ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ४ पॉझिटिव्ह व ३७ निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये पिपळगाव येथील ३४ वर्षीय पुरुष, देवळाली कॅम्प येथील ५५ वर्षीय पुरुष, माडसांगवी येथील ३८ व ५३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर सायंकाळी ६ वाजता खासगी लॅबकडून नवीन ४ रूग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले असून सर्व नाशिक शहरातील आहेत. यामध्ये देवळाली कॅम्प येथील ६५ वर्षीय महिला, रविवार पेठ, पंचवटी येथील १४ वर्षीय मुलगा, जेहान सर्कल येथील २० वर्षीय तरूण, शिंगाडा तलाव येथील ६५ वृद्धाचा समावेश आहे. तिसर्‍या टप्प्यात सायंकाळी ७ वाजता ३३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये मालेगावातील १७ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जेहान सर्कल भागातील तरुण हा स्पेन येथून आलेला आहे.

जिल्ह्यात १ हजार ६१३ पैकी ४३१ बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये नाशिक शहर २६१, मालेगाव ७३, नाशिक ग्रामीण ८३ व जिल्ह्या बाहेरील ७३ रूग्णांचा समावेश आहे. सोमवारी दिवसभरात 219 रुग्ण उपचारार्थ विविध रूग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालय 12, नाशिक महापालिका रुग्णालये 132, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 41, मालेगाव रुग्णालय 8, नाशिक ग्रामीण रुग्णालयामध्ये 26 दाखल झाले आहेत.

१०६६ रूग्ण करोनामुक्त
नाशिक जिल्ह्यात १ हजार ६१३ करोनाबाधित रूग्ण आहेत. बाधित रूग्णांवर वेळेत उपचार झाल्याने ७० टक्के म्हणजे १ हजार ६६ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामध्ये नाशिक शहर १४८, मालेगाव ७००, नाशिक ग्रामीण २६५ व जिल्ह्याबाहेरील ४५ रूग्णांचा समावेश आहे.

२५७ अहवाल प्रलंबित
जिल्ह्यात एकूण १३ हजार ७२४ संशयित रूग्णांचे स्वॅब प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १ हजार ६१३ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, ११ हजार ८७१ रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २५७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ११, नाशिक शहर १३८, मालेगाव १०८ रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रूग्ण -१६१३ (मृत ९९)
नाशिक शहर -४३० (मृत- २१)
मालेगाव -८५० (मृत- ६४)
नाशिक ग्रामीण-२६५ (मृत-९)
अन्य-६४ (मृत-५)