घरदेश-विदेशमोदी-ठाकरे वैयक्तिक भेट, सेना भाजपमधील राजकीय संबंध सुधारणार का?

मोदी-ठाकरे वैयक्तिक भेट, सेना भाजपमधील राजकीय संबंध सुधारणार का?

Subscribe

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासमवेत आज पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यात ३० मिनिटं बैठक झाल्याचं समोर आलं आहे. या बातमीला खुद्द उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधत असताना दुजोरा दिला आहे. या भेटीमुळे भाजप-सेनेचे राजकीय संबंध सुधारणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

मोदी आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ही गोष्ट लपलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही. पण म्हणून आमचं नातं तुटलेलं नाही. मी मोदींना भेटलो म्हणजे काही तरी चूक केलं असं नाही. मी काही नवाब शरीफांना भेटलो नाही. आताही माझ्या सहकाऱ्यांना सांगून मी मोदींना भेटायला जाऊ शकतो, असं सांगतानाच सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे सर्वेसर्वा आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे भाजपचे सर्वोच्च नेते आहेत. यांच्यात वैयक्तिक भेट झाली असेल तर निश्चितपणे राजकीय चर्चा झाली असणार. कारण बऱ्याच वर्षांपासूनची युती तोडत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. भाजपचे आमदार, खासदार, नेते सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करत आहेत. या आरोप-प्रत्यारोपांमुळे या दोन पक्षांमध्ये दुरावा निर्माण झआला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दोन पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये वैयक्तिक भेट झाल्याने या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त होत आहे.

नातं कायमस्वरुपी राहिलं पाहिजे – दरेकर

चांगल्या वातावरणात चर्चा झाली असेल, नातं तुटलं नाही असं उद्धव ठाकरे म्हणत असतील तर हे नातं कायमस्वरुपी असायला हवं. दिल्लीत आले म्हणून पंतप्रधानांबाबत किंवा भाजपबरोबरच्या नात्याबाबतचं वक्तव्य महाराष्ट्राने पाहिलं आहे. मोदींच्या चर्चेवर त्यांना समाधान मिळालं असेल आणि नातं तुटलं नाही असं सांगत असतील तर आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. महाराष्ट्राच्या हितानेही ते चांगलं आहे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -