घरठाणेबदलापूरमध्ये गॅरेजला भीषण आग; सीएनजी वाहनांचे स्फोट

बदलापूरमध्ये गॅरेजला भीषण आग; सीएनजी वाहनांचे स्फोट

Subscribe

बदलापूर : काटई रस्त्यावर मोटार गॅरेजला आज, बुधवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गॅरेजचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बदलापूर काटई रस्त्यावर डी-मार्टलगत कार गॅरेज आहे. या गॅरेजला आज, बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत गॅरेजमधील अंदाजे 12 कार जळून खाक झाल्या. ही आग इतकी भीषण होती की, गॅरेजमध्ये असलेल्या सीएनजी गाड्यांचा स्फोट झाला. तर गॅरेजच्या वरच्या बाजूला असलेली उच्चदाब विद्युत वाहिनी देखील आगीच्या झळांमुळे तुटली. त्यामुळे परिसरातील विद्युतपुरवठा देखील काही काळ ठप्प झाला होता.

- Advertisement -

महामार्गाला खेटून असलेल्या गॅरेजला आग लागल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. अंबरनाथ, बदलापूर आणि अंबरनाथ एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तब्बल अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर तीन अग्निशमन दलाची वाहने आणि दोन खाजगी टँकरच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत वाहनांचे मोठे नुकसान झाले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.

कर्तव्यतत्पर फायर ऑफिसर
ही आग लागल्यानंतर बदलापूर अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनवणे हे नाईट -ड्रेसवरच घटनास्थळी दाखल झाले. भागवत सोनवणे हे त्यांच्या मुलीला शाळेत सोडायला आले होते. त्याचवेळी रस्त्यालगत गॅरेजला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता, त्यांनी कर्मचाऱ्यांना फोन करून तातडीने घटनास्थळी बोलावले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आपल्या सुरक्षेची काळजी न घेता जबाबदारीने त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले.

- Advertisement -

ठाण्यात सोमवारी होलसेल मार्केटमध्ये आग
ठाण्यातील होलसेल मार्केटमधील कागदी व प्लास्टिक पत्रावळ, द्रोण, ग्लास आदी साहित्य असलेल्या दुकानाला सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. मात्र आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी मंगळवारी पहाटेचे साडेतीन वाजले. ही आग तब्बल साडेचार तास धुमसत राहिल्याने परिसरात बराच काळ धूर पसरला होता. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाले नसली तरी, मोठया प्रमाणात नुकसान झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -