Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करा; कामांचा दैनदिन आढावा घेण्याचे निर्देश

रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करा; कामांचा दैनदिन आढावा घेण्याचे निर्देश

Subscribe

ठाणे | ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांचा दैनंदिन आढावा घेवून, ३१ मेच्या आधी ही कामे पूर्ण होतील यांची काळजी सर्व कार्यकारी अभियंत्यांनी घ्यावी, असे निर्देश शनिवारी ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. ठाण्यातील रस्त्यांच्या कामांची (Road Works) आयुक्तांनी शनिवारी पाहणी केली.

ज्ञानसाधना महाविद्यालय येथे महामार्गाखाली नाल्याचे काम सुरू आहे. हे काम जलद पूर्ण करून रस्ता ताबडतोब एमएमआरडीएच्या ताब्यात द्यायचा आहे. त्यादृष्टीने आयुक्त बांगर यांनी कामाची पाहणी केली. हे काम ३१ मे पूर्वी होणे अपेक्षित आहे. परंतु, सध्या टप्प्याटप्प्याने महापालिकेने हा पट्टा कामासाठी खुला करून द्यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच, कोपरी आणि भास्कर कॉलनीकडे येणारा मार्ग लवकर उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्याला वाहतूक पोलिसांचीही मदत घ्यावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

गांधीनगर पुलाची एक मार्गिका खुली होणार

वोल्टास कंपनी शेजारील गांधीनगर पुलाच्या रखडलेल्या कामास आयुक्त बांगर यांनी भेट दिली. ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मूळ रस्त्याशी ती मार्गिका जोडून घेण्यासाठी रस्त्याची उंची वाढवणे, पुलावर डांबरीकरण करणे ही कामे बाकी आहेत. ती तात्काळ करून १५ दिवसात ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यास आयुक्त  बांगर यांनी सांगितले. तर, दुसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यासाठी वीज वाहिन्या हटवणे, रेमंड कंपनीचे प्रवेशद्वार हलवणे, वोल्टास कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरील जागा ताब्यात घेणे तसेच पोखरण दिशेकडील अतिक्रमणे हटविणे ही कामे योग्य रीतीने मार्गी लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. या कामासाठी नेमकी किती मुदत लागले त्याचा आराखडा सादर करण्याचे आदेशही दिले.

- Advertisement -

मॉडेल नाका जंक्शनची दुरुस्ती वेगाने

सर्वाधिक वर्दळीच्या मॉडेला नाका जंक्शनचे कामही सध्या सुरू आहे. त्याला गती देण्याची सूचना आयुक्त बांगर यांनी केली. मध्यवर्ती रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करून उर्वरित कामे तीन ऐवजी दोन टप्प्यात पूर्ण करावीत, काँक्रीटीकरण पूर्ण झालेल्या रस्त्याचा पृष्ठभाग काम सुरू असलेल्या रस्त्याशी समान पातळीवर जोडावा, जेणेकरून इतर कामे सुरू असताना वाहतूक सुरळीत राहू शकेल, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले.

जंक्शनवर वाहनाचे पार्किंग नको

शहरातील बहुतेक रस्त्यावर सिग्नल जवळ गाड्या, बसेस उभ्या केल्याचे निदर्शनास येते. वास्तविक जंक्शन परिसर हा पूर्णपणे पार्किंग मुक्त असावा. त्यामुळे, तिथे उभ्या राहिलेल्या वाहनावर कारवाई केली जावी. त्याचप्रमाणे या भागात वाहने उभी राहणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या.

काम पूर्ण झाल्यावर खोदलेले रस्ते नीट करावेत

विविध कारणांसाठी शहरातील रस्ते, साईड पट्टी येथे खोदकाम केले जाते. ही कामे पूर्ण झाल्यावर भराव टाकून तो भाग कसाही भरला जातो. यापुढे तसे ना करता, काम पूर्ण झाले की जेवढा भाग खोदला आहे तो त्याभोवती चौरस करून तो रस्ता व्यवस्थित करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांची राहील. काम झाले की रस्ता थोड्याच काळात पूर्वपदावर यायला पाहिजे. एकसमान दिसला पाहिजे. त्या रस्त्यावर खड्डे, असमान पद्धतीचे भराव काम असता कामा नये, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. टोयोटा शोरुम, पोखरण नंबर २ च्या सुरुवातीचा चौक यांची पाहणी केल्यावर आयुक्तांनी उपरोक्त निर्देश दिले.

पासपोर्ट कार्यालयातील प्रवेश दिव्यांग स्नेही करावा

पासपोर्ट कार्यालयालगतच्या पदपथाची उंची अधिक असल्याने तिथे दोन पायऱ्या करण्यात आल्या आहेत. त्या पायऱ्या नीट करून, त्याच्या बाजूला दिव्यांग स्नेही उतार (रॅम्प) करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच, शेजारील नवीन बस थांब्याची पातळी पदपथाशी समान ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.

पार्किंगची शिस्त

इंदिरा नगर येथे रोड क्रमांक ३३ येथे रस्त्याची कामे पूर्ण होत आली आहेत. तिथे आता पार्किंगला शिस्त लावून अधिकाधिक रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यास आयुक्तांनी सांगितले. दुभाजकचे काम काही ठिकाणी राहिले असून ते पूर्ण करून रंगरंगोटीची कामे पूर्ण केली जावीत, असेही आयुक्तांनी नमूद केले. त्याचप्रमाणे, नितीन कंपनी जंक्शन येथील रस्त्याची पाहणी आयुक्तांनी केली. तसेच, आराधना सिनेमा ते हरिनिवास जंक्शन येथील वाहतूक कोंडीवर उपाय काढण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.

टेंभी नाका रस्ता रुंदीकरण

टेंभी नाका परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सर्व बाजूंचा विचार करून रस्ता रुंदीकरणाचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी रस्ते विभागास दिले. उपलब्ध जागा, इमारती यांचा अभ्यास करून हे रस्ता रुंदीकरण केले जाईल, असे बांगर यांनी स्पष्ट केले. त्याच प्रमाणे, आनंदाश्रम परिसर ते जांभळी नाका येथील रस्ते पट्टी, दुभाजक, रेलिंग यांची पुनर्रचना करून ती कामे जलद करण्यासही आयुक्त बांगर यांनी सांगितले.

स्टेशन परिसर सुशोभीकरण

ठाणे स्टेशन परिसरातील सुशोभीकरणासाठी स्वतंत्र निविदा काढावी. तसेच, हा भाग अधिकाधिक चांगला, प्रकाशमान राहील यावर लक्ष द्यावे असे आयुक्त म्हणाले. आयुक्तांनी स्टेशन परिसर, प्लॅटफॉर्म क्रमांक दोन, रिक्षा व टॅक्सी स्टँड, परिवहनचा बस थांबा, परिसरातील स्वच्छता यांचीही पाहणी केली.

- Advertisment -