घरठाणेबदलापुरात केमिकल कंपनीला भीषण आग

बदलापुरात केमिकल कंपनीला भीषण आग

Subscribe

बदलापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीत ही केमिकल कंपनी जळून खाक झाली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तीन कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बदलापूर पूर्वेकडील एमआयडीसीतील कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्रासमोर गगनगिरी फार्मा केम प्रा.लि. ही कंपनी आहे. या कंपनीत आयपीए सॉलव्हंट हे केमिकल तयार केले जाते. रविवारी सकाळी 11.22 वा. च्या सुमारास या कंपनीत आग लागल्याचे समजताच लिडींग फायरमन शैलेश जगताप, अजित गुरव, महेश कांबळे, गफुर खान तडवी, रत्नाकर जावळे, विजय ढोक,दिलीप धोत्रे, रवींद्र जाधव आदी अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यावेळी आगीने भीषण स्वरूप धारण केले होते. धुराचे मोठ मोठे लोट पसरले होते. आगीचे भीषण स्वरूप लक्षात घेऊन आनंद नगर एमआयडीसी, अंबरनाथ नगर परिषद, उल्हासनगर महानगर पालिका आदींच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. पाच अग्निशमन वाहने, दहा पाण्याचे टँकर, चार रुग्णवाहिका आदींच्या साहाय्याने आग आटोक्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी 11.20 ते संध्याकाळी 4.20 पर्यंत सलग चार तास अथक प्रयत्न करून आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र तीन कामगार जखमी झाले.

- Advertisement -

या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे निश्चित कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नाही. आगीनंतर धुराचे मोठे लोट हवेत पसरले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यावेळी आगीचे भीषण स्वरुप लक्षात घेता सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी आग लागलेल्या कंपनीपासून ठराविक अंतरावर दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद केली. लगतच्या अन्य कंपन्यांना धोका होऊ नये म्हणून तत्काळ या कंपन्या बंद करून तेथील कामगारांना सुरक्षित स्थळी हलविले. या परिसरातील कॅन्टीनमध्ये असलेले गॅस सिलिंडरीही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पडवळ यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी याठिकाणी तळ ठोकून होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -