नाशकात ठाकरे गटाला धक्का, बबन घोलप यांची कन्या भाजपात

नाशिक : माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत आपल्या वडिलांसहित उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. हा धक्का ताजा असतांनाच उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले माजी मंत्री बबन घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनीही मंगळवारी भाजपात पवेश केला. काही दिवसांपूर्वी तनुजा घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर तनुजा घोलप या कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः मी माझ्या कामानिमित्त त्यांची भेट घेतली प्रवेश करण्याचे कारण नाही म्हणून स्पष्ट केले होते. त्यामुळे तनुजा घोलप या आपल्या वडिलांसहित उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देऊन कोणत्या पक्षात जाणार याबाबत नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती. आता या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तनुजा घोलप यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आदी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

तनुजा घोलप यांचे वडील माजी मंत्री बबन घोलप आणि बंधू योगेश घोलप हे यापूर्वी या मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून आमदार म्हणून निवडून आले होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी घोलप यांचा पराभव करून घोलप यांचा गड खेचून आणला होता. त्यामुळेच आता तनुजा घोलप यांच्याही आमदार होण्याच्या अशा पल्लवीत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे आणि त्यामुळेच तनुजा घोलप यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे घोलप यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.