पंतप्रधानांच्या ताफ्यातील जवानाचा सिन्नर येथे कालव्यात बुडून मृत्यु

शिर्डी येथून दर्शन घेउन चोंडीकडे येत असतांना घडली घटना

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एसपीजी कमांडो गणेश सुखदेव गीते हे सिन्नर तालुक्यातील चोंढी या आपल्या गावी सुट्टीनिमित्ताने आले असता कालव्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी आपली पत्नी, लहान मुलगा आणि मुलीसह ते शिर्डीला साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते आणि सायंकाळी घरी परतत असताना ही घटना घडली. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाला तब्बल वीस तासांच्या तपासानंतर मृतदेह सापडला. तर गीते यांच्या पत्नी आणि मुलाला वाचविण्यात पथकाला यश आले.

सिन्नर परिसरात राहणारे गणेश गीते हे कुटुंबासह शिर्डी येथून घरी परतत असताना चोंढी शिवारात गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी गोदावरी उजव्या कालव्यात पडली. यावेळी जवानासह स्थानिक नागरिकांनी त्यांची पत्नी व मुलांना वाचवले. मात्र गणेश गिते हे पाटाच्या पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकासह स्थानिक नागरिकांनी शोध मोहीम सुरु केली होती. मात्र शोध काही लागत नव्हता. गणेश गीते हे पंतप्रधानांच्या विशेष पथकात तैनात असल्याची माहिती आहे. गिते हे 24 फेब्रुवारीपासून सुट्टीवर आले होते. गुरुवारी गणेश पत्नी रुपाली, मुलगी कस्तुरी आणि मुलगा अभिराज यांच्यासह शिर्डी येथे दर्शनासाठी गाडीवर गेले होते.

शिर्डीहून परतत असताना नांदूरमाधमेश्वर धरणातून गेलेल्या उजव्या कालव्याच्या बाजूने चोंढी शिवारात असलेल्या घराकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. मेंढी-ब्राह्मणवाडे रस्त्यावर तवंग परिसरात ही घटना घडली होती. गणेश यांच्या बाईक ताबा सुटल्याने उजव्या कालव्यात पडली. आवाज झाल्याने आजूबाजूला असलेले काहीजण धावत घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी गणेशची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांना सुखरुप बाहेर काढले. मात्र पाण्याच्या प्रवाहात गणेश वाहून गेले. या घटनेनंतर कुंटुबियांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी पालकमंत्री भुसे यांनी देखील घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. मात्र संतप्त गावकर्‍यांनी त्यांना घेराव घातला. कॅनॉलचं पाणी रात्रीच का बंद केले नाही? कॅनॉलचे पाणी रात्रीच बंद केले असते, तर आतापर्यंत जवानाचा शोध लागला असता, असे म्हणत गावकर्‍यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास जवान गणेश गीते यांचा मृतदेह शोधण्यास बचाव पथकास यश आले आहे.

पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी

दरम्यान गुरुवारी घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांसह बचाव पथकाने जवान गणेश गीते यांचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र तब्बल वीस तास बचावकार्य सुरु होते. त्यांनतर आज सकाळी पालकमंत्री दादा भुसे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नाफेडची बैठक स्थगित करून सिन्नर गाठले. आपण मागच्या सरकारमध्ये सैनिक कल्याण विभाग सांभाळला आहे. सैनिकांप्रती असणार्‍या आदरभावामुळेच सर्व बैठका रद्द करून परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः आलो असल्याचे त्यांनी सांगितले.