ग्रीन झोनमध्ये वाईन शॉप सुरू होणार

wines shop
प्रातिनिधिक छायाचित्र

भारतातील असंख्य नागरिक ज्या निर्णयाची वाट पाहत होते. तो निर्णय अखेर सरकारने घेतला आहे. वाईन शॉप कधी सुरु करणार? हा एकच प्रश्न देशातल्या तळीरामांना भेडसावत होता. तर आता वाईन शॉप्स सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रीन झोनमध्ये वाईन शॉप्स आणि पान टपर्‍या सुरु करण्यात येणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार वाईन शॉप्सना परवानगी देण्यात आली आहे. मात्र ग्रीन झोनमध्येच ही परवानगी असणार आहे. तसेच वाईनमधून खरेदी करण्यासाठी काही नियमावली घालून दिली आहे. दुकानात एकावेळी फक्त ५ लोकांनाच उभे राहण्याची परवानगी असेल. तसेच दोन गिर्‍हाईकांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे लागणार आहे.

दरम्यान, मॉल्स आणि मार्केटिंग कॉम्प्लेक्स मधील वाईन शॉप्सना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या व्यतिरीक्त इतर ठिकाणी असलेल्या दुकांना परवानगी देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन आता १७ मे पर्यंत वाढवले असले तरी यादरम्यान ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी ही दुकाने चालू करता येणार आहेत.

मात्र, केंद्र सरकारने ग्रीन झोनमध्ये वाईन शॉप्स, पान टपर्‍या सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी अंतिम निर्णय राज्य सरकारांचा आहे. राज्य सरकारने जर वाईन शॉप्स आणि पान टपर्‍या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तर त्या बंदच राहणार आहेत. महाराष्ट्र सरकारने वाईन शॉप्स आणि पान टपर्‍यांबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. लवकरच तो निर्णय होण्याची शक्यता आहे.