घरमहाराष्ट्रस्वतःच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी जाणार्‍या तरुणाचा अपघाती मृत्यू

स्वतःच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी जाणार्‍या तरुणाचा अपघाती मृत्यू

Subscribe

स्वतःच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी मोटारसायकलवरुन जाणार्‍या तरुणाचा सायन-पनवेल मार्गावर अपघातात मृत्यू झाल्याची घटना सीबीडी येथील खिंडीत घडली. प्रतिक दिलीप चेऊलकर (21) असे या तरुणाचे नाव असून येत्या 27 एप्रिल रोजी तो विवाहबद्ध होणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याचे अपघाती निधन झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात प्रतिकच्या डोक्याला जबर मार लागल्याचे आढळून आले आहे. त्याने हेल्मेट घातले असते तर कदाचित तो वाचला असता असे पोलिसांनी सांगितले.

नवीन पनवेल सेक्टर-13 मधील ए टाईपच्या इमारतीत प्रतिक राहात होता. येत्या 27 एप्रिल रोजी त्याचा विवाह असल्याने तो लग्नाची खरेदी आणि लग्नाच्या पत्रिका वाटण्याच्या गडबडीत होता. रविवारी सायंकाळी नवीन पनवेल येथून मोटारसायकलने ऐरोली येथे पत्रिका वाटण्यासाठी जात होता. 4.30 वाजण्याच्या सुमारास त्याची मोटारसायकल सायन-पनवेल मार्गावरील सीबीडी-बेलापूर येथील खिंडीत आली असताना अज्ञात वाहनाची त्याला धडक लागली. त्यामुळे प्रतिक मोटारसायकलसह खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने काही वेळात त्याचा मृत्यू झाला. सीबीडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रतिकचा मृतदेह ताब्यात घेतला. प्रतिकला कुठल्या वाहनाने धडक दिली हे समजू न शकल्याने पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -