घरमहाराष्ट्रमातोश्रीच्या अनिच्छेनंतरही आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री!

मातोश्रीच्या अनिच्छेनंतरही आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री!

Subscribe

राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलेल्या मंत्र्यांना मंत्रिपदावर विराजमान होण्यासाठी एकतर ‘मातोश्री’ ची इच्छा हवी किंवा ‘सिल्व्हर ओक’चा आशीर्वाद. याव्यतिरिक्त कुणी मंत्रिमंडळात स्थान मिळवू शकलेले नाहीत. मात्र ‘मातोश्री’ची तीव्र अनिच्छा असतानाही एका महोदयांनी चक्क कॅबिनेट मंत्रिपदी स्वत:ची वर्णी लावून घेतली आहे. त्या व्यक्तिचं नाव आहे आदित्य उध्दव ठाकरे.

ठाकरे सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळात ठाकरे आणि पवार यांच्या इच्छेनुसारच नेत्यांची वर्णी लागली आहे. या दोघांच्या अनिच्छेने कुणाला मंत्रिपदाचा टिळा लागलेला नाही. किंबहुना पवारांना दुखावून त्यांची साथ सोडणार्‍यांना एकतर मंत्रिपद मिळालेले नाही किंवा उदय सामंत सारख्यांना ज्यांचे पवारांशी वडिलोपार्जित चांगले संबंध आहेत त्यांना तुलनेने कमी महत्त्वाची खाती मिळाली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या ४३ जणांच्या यादीत पहिल्यांदाच वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार्‍या आणि कोणताही संसदीय प्रक्रियेचा अनुभव नसलेल्या आदित्य ठाकरे यांनी स्थान मिळवले आहे.

- Advertisement -

उध्दव ठाकरे यांना स्वत:हून मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, मात्र शरद पवार आणि रश्मी ठाकरे यांच्या आग्रहामुळे उध्दव यांना मुख्यमंत्रिपदाचे शिवधनुष्य पेलावे लागत आहे. तेव्हा आदित्य यांनी मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून संसदीय कामकाज शिकावे तसेच पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करून पक्षावर आपली मांड घट्ट करावी अशी त्यांचे वडील उध्दव आणि आई रश्मी यांची इच्छा होती. मात्र आदित्य ठाकरेंच्या शेवटच्या क्षणी केलेल्या अतिव हट्टापुढे ‘मातोश्री’चे काहीच चालले नाही.

आदित्य यांच्या अत्यंत निकटवर्तीय वर्तुळातील युवा उद्योगपतीने ‘महानगरला’ दिलेल्या माहितीनुसार, ‘आदित्य यांचे वडील मुख्यमंत्री आहेत. त्यांचे कोणतेही काम अडले नसते. त्यांनी व्यस्त वडिलांच्या पक्षसंघटनेतला भार स्वत:च्या खांद्यावर घ्यावा, असे मोठ्या साहेबांना वाटत होते. दादासाहेब (आदित्य) मंत्री न होता बरंच काही करू शकले असते हे जरी खरे असले तरी त्यांना स्वत: निर्मिती केलेल्या गोष्टी आवडतात’. हा युवा नेता पुढे म्हणाला, ‘भारतीय विद्यार्थी सेना असतानाही आदित्यसाहेबांनी युवासेना बनवून तिची वेगळी ओळख ठेवून काम केले. त्यांना स्वत:चा वेगळा ठसा उमटवायचा आहे. म्हणून त्यांनी पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचारसारखे विभाग निवडलेत. या विभागावर आदित्यसाहेब स्वत:ची आणि युवासेनेची छाप सोडतील’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

वडील आणि मुलगा एकाच मंत्रिमंडळात असण्याची याआधीची उदाहरणे असली तरी उध्दव-आदित्य हे दोघंही मंत्रिमंडळात गेल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी संघटनात्मक पातळीवर भाजपला रान मोकळे करून दिल्याची भीती पालिकेतील वजनदार नेत्याने बोलून दाखवली आहे. एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अनिल देसाई यांच्यासारखे संघटना आणि संसदीय पातळीवर काम करणारे नेते पक्षासाठी प्रचंड घाम गाळतात. तसे कष्ट करण्यात आदित्य ठाकरे कमी पडणार नाहीत, याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. या आव्हानात त्यांना ‘त्यांची’ युवासेना किती साथ देते यावर त्यांचे यशापयश अवलंबून असेल, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -