घरदेश-विदेशकेंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर देशाच्या अखंडतेला धक्का; अजित पवारांचं टीकास्त्र

केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर देशाच्या अखंडतेला धक्का; अजित पवारांचं टीकास्त्र

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपवर जोरदार बरसले. केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर देशाच्या अखंडतेला धक्का बसला अशा शब्दांत अजित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं. सध्या लोकशाहीला धक्का पोहचत आहे. लोकशाहीविरोधी पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी ठामपणे उभी राहणार असं आश्वासन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिलं.

भाजपच्या काळात देशात दमणशाहीचा कारभार सुरु असून लोकशाही मोडून काढण्याचा प्रकार सुरु आहे. पत्रकारांवर निरनिराळे निर्बंध आणून त्यांना सरकारच्या बाजूनेच बोलायला भाग पाडले जात आहे. आपण सर्वांनी लोकशाही अबाधित राखण्यासाठी काम करायचे आहे, असं अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी वाढत्या महागाईवरून देखील भाजपवर टीका केली. पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठत आहेत. घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. विमान-रेल्वेचा प्रवास महागला आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या सर्व प्रश्नांवर देखील आपल्याला काम करायचे आहे, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्नांवर देखील काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना महाविकास आघाडी सरकारतर्फे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेऊन आरक्षण, जीएसटी, पिक विमा, १४ व्या वित्त आयोगाचे पैसे मिळावे. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशा प्रकारच्या आग्रही मागण्या त्यांच्यासमोर मांडल्याचं सांगितलं.

सुदैवाने आज राज्यात राष्ट्रवादीचा सहभाग असलेले महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जनतेवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय आम्ही होऊ देणार नाही. संकटे कितीही येवोत हा महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही. संकटावर मात करुन हा महाराष्ट्र सर्वांच्या पुढेच राहील, अशी ग्वाही वर्धापन दिनाच्या निमित्ताने देतो, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

तीनही पक्षांच्या एकजुटीच्या ताकदीने आपण कोरोनाच्या संकटावर मात केलेली आहे. पुढेही असेच काम आपल्याला करत राहायचे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लागेल तेवढा निधी देण्याचे काम अर्थ मंत्रालय देत आहे. पुढेही देत राहील. आरोग्य खात्याने प्रस्ताव दिल्यावर त्याला लगेच वित्तविभागाकडून मंजूरी दिली जाते.

रासायनिक खतांच्या किंमती वाढविल्यानंतर शेतकरी प्रचंड नाराज होते. मात्र आदरणीय शरद पवार साहेबांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिले. ते पत्र हातात पडल्यानंतर तात्काळ दरवाढ मागे घेण्यात आली. केंद्रात आपल्या विचारांचे सरकार नसले तरी आपल्या मागण्या मान्य करुन घेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.

कार्यकर्त्यांची मेहनत आणि त्यागावर पक्ष उभा आहे. राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांचे आभारही मानतो. कार्यकर्ता हाच खरा पक्षाचा कणा असतो. त्यांच्याशिवाय कोणताही पक्ष काम करु शकत नाही. ज्याप्रकारे महाराष्ट्र राज्याची सुरुवात संघर्षातून झाली होती. तशाच प्रकारच्या संघर्षातून राष्ट्रवादीचीही स्थापना झाली.

२०१४ चा अपवाद वगळला तर राज्यातील लोकांनी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला विश्वास व्यक्त केलेला आहे. जनतेच्या प्रेमाच्या बळावर पक्षाने राज्यातील प्रत्येकाच्या मनामनात जागा मिळवली. सर्व घटकांना सोबत घेऊन पक्ष वाटचाल करत आहे, पुढेही अशीच वाटचाल सुरु राहील.

हृद्यात राष्ट्र आणि नजरेसमोर महाराष्ट्र… असा विचार घेऊन पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. प्रत्येक क्षेत्रातल्या जाणकार, अभ्यासू लोकांना सोबत घेऊन राष्ट्रवादीची वाटचाल सुरु झाली होती. त्या सर्वांनी आपापल्यापरिने मागच्या २२ वर्षात योगदान दिले.

संघर्षाशी आणि आव्हानांशी लढणे हाच राष्ट्रवादीचा गुणधर्म आहे. कोरोना काळ असो की वादळ आणि अतिवृष्टीचे संकट असो. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक ठिकाणी संघर्ष केला. केंद्राचे सहकार्य मिळवण्यात सरकार म्हणून आम्ही प्रयत्न केला. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी कोरोना काळात लोकांना मदत देण्याची भूमिका घेतली. आपल्याला पुढचे आणखी काही दिवस ही मदत करावी लागणार आहे. महाविकास आघाडीकडून घेतले जाणारे लोककल्याणाचे निर्णय तळागाळात पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -