घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला अजित पवारांची अनुपस्थिती? पण पुण्यातील कार्यक्रमांना हजेरी

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला अजित पवारांची अनुपस्थिती? पण पुण्यातील कार्यक्रमांना हजेरी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील बेबनाव असल्याच्या चर्चा एकीकडे रंगत असतानाच, दुसरीकडे अशा काही घटना घडत आहेत, ज्यामुळे या चर्चांना पुष्टी मिळत आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील बेबनाव असल्याच्या चर्चा एकीकडे रंगत असतानाच, दुसरीकडे अशा काही घटना घडत आहेत, ज्यामुळे या चर्चांना पुष्टी मिळत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी मुंबईत एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकात खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर नेत्यांची नावे आहेत. पण राष्ट्रवादीचे प्रमुख नेते तसेच महाविकास आघाडीचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांचे नाव वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा रंगली होती. अचानकपणे अजित पवार यांचे नॉट रिचेबल होणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणे, शिंदे-फडणवीस सरकार कशा पद्धतीने स्थिर राहील याबाबत माहिती देणे, ईव्हीएमचे समर्थन करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची प्रशंसा करणे अशा विविध कारणास्तव ते भाजपामध्ये जाणार असल्याचे ठोकताळे बांधण्यात आले होते. मात्र अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ही शक्यता फेटाळत, या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांच्या मदतीने केलेल्या कोंडीमुळे अजित पवार यांचे भाजपाप्रवेशाचे मनसुबे धुळीस मिळाल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

सोमवारी, 17 एप्रिलला पुण्यात एका कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार होते. पत्रिकेवरही अजित पवार यांचे नाव होते. मात्र आपण उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी कळविले. त्यामुळे ऐनवेळी शरद पवार यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मंगळवारी इफ्तार पार्टीसाठी एकाच व्यासपीठावर येऊन सुद्धा अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कोणताही संवाद न झाल्याचे सर्वांनी पाहिले. आता उद्या, शुक्रवारी अजित पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार नाहीत. विशेष म्हणजे, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा कार्यक्रम होत असून त्याला राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांची उपस्थिती आवश्यक होती. पण तेच अनुपस्थित राहणार आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. पण, पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यानंतर पुण्यातील त्यांच्या नियोजित कार्यक्रमाला अजित पवार जाऊ शकले असते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पण राष्ट्रवादीमधील हा कथित अंतर्गत कलह कोणत्या वळणावर जाऊन पोहोचतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मतदानाच्या दिवशीही काँग्रेसचे निवडणूक व्यवस्थापन…; दिग्विजय सिंहांची काँग्रेस पक्षावर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -