केंद्राने इंधनावरील कर कमी करावेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

MINISTER ajit pawar said will make bill on obc reservation for upcoming elections with reservations

राज्याला पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याचा सल्ला देण्याएवजी केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे केले. राज्य सरकारने सीएनजी आणि घरगुती पाईप गॅसवर आकारण्यात येणार व्हॅट एक हजार कोटी रुपयांनी कमी केल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

अभिनेत्री आसावरी जोशी यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अजित पवार यांनी राज्यात पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्यास नकार दिला.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा विषय आम्ही आमच्या लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना सांगितला आहे. तसेच मेट्रो प्रशासनाशीही चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याची आमची तयारी आहे, असे पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

एसटी कामगारांचा प्रश्नावर सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काल काही अंशी न्यायालयाने त्यावर निर्णय दिला आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय हा सर्वांनीच मान्य करायचा असतो, असेही पवार म्हणाले. ओबीसी आरक्षणासंदर्भात जोपर्यंत सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सूतोवाच करणे योग्य नाही. जो काही निकाल लागेल त्यावर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आम्ही सर्व एकत्र बसून चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना प्रादुर्भावामुळे आमदारांच्या निधी वाटपास मर्यादा होत्या. उपलब्ध निधीतून राज्य विकासाला आपल्याला खीळ बसू द्यायची नव्हती. कुठच्याही विकास निधींमध्ये आम्ही घट केली नाही. यावर्षी आपण रस्ते आणि विकास महामंडळाला विक्रमी असा २१ हजार कोटींचा निधी दिला. आपण यावर्षी राज्यामध्ये कुठचाही नवीन कर लावलेला नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा : पोलीस आयुक्त दीपक पांडेंनी महसूल विभागासंदर्भात लिहिलेलं पत्र वादाच्या भोवऱ्यात, गृह विभागाची नोटीस