घरमहाराष्ट्रमलिक यांचा राजीनामा घेणार नाही!

मलिक यांचा राजीनामा घेणार नाही!

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती , राजकीय आरोप-प्रत्यारोप अशोभनीय

राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा की नाही याबाबतचा अंतिम अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही, याबाबत महाविकास आघाडी ठाम आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी भाजपची मागणी फेटाळून लावली.पश्चिम बंगालमध्ये काही काही मंत्र्यांना अटक झाली आहे. मात्र ते मंत्रिपदावर कायम आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला जी राजकीय संस्कृती शिकवली ती पाहता सध्या होणारे राजकीय आरोप-प्रत्यारोप हे या संस्कृतीला शोभणारे नाहीत. याचे तारतम्य सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ठेवले पाहिजे. विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी आघाडी सरकारने केली असून सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये असल्याचेही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी महाविकास आघाडीच्या वतीने सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान आयोजित करण्यात आले होते. विरोधी पक्ष भाजपने या चहापानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष यांची बैठक पार पडली. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

चहापानानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी विरोधी पक्षाच्या टीकेचा समाचार घेतला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याशिवाय अधिवेशनाचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही या भूमिकेवर महाविकास आघाडी ठाम आहे. परंतु मलिक यांचे प्रकरण गुरुवारी सुनावणीसाठी उच्च न्यायालयात येणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्याला एक वेगळी संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला एक सुसंस्कृत अशी राजकीय संस्कृती दिली. मात्र, सध्या जे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे ते सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही शोभा देणारे नाही. यामुळे राज्याच्या दृष्टीने महत्वाचे विषय बाजूलाच राहतात, असेही पवार म्हणाले.

एसटीबाबतचा अहवाल सभागृहात सादर होणार
एसटीच्या विलीनीकरण संदर्भातील अहवाल तयार झाला असून परिवहन मंत्री अनिल परब हे हा अहवाल विधिमंडळात सादर करतील. त्यानंतर तो चर्चेसाठी सगळ्यांनाच प्राप्त होईल, असे अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही? याविषयी विचारले असता, आज संध्याकाळी रामटेक येथे महाविकास आघाडीची बैठक आहे. त्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्यापासून सुरू होणार्‍या विधिमंडळ अधिवेशनाला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शंभर टक्के उपस्थित राहतील. देशातील अनेक मोठे नेते पत्रकार परिषदा घेत नाहीत, असा टोलाही पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता भाजपला लगावला.

राज्यपालांना प्रश्न विचारू
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने राज्यातील वातावरण तापले आहे. त्याबाबत विचारले असता, राज्यपालांना आम्ही फोनवरून थेट विचारू शकत नाही. त्यामुळे कधीतरी चहा पिता पिता याबाबतचा प्रश्न त्यांना विचारू, असे पवार म्हणाले.

विधिमंडळाचे मागील हिवाळी अधिवेशन फक्त पाच दिवस होते.त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. मात्र, आता जास्त दिवसांचे अधिवेशन आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीसाठीचे पत्र राज्यपालांना पाठविले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -