घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीत काहीतरी शिजतंय!

राष्ट्रवादीत काहीतरी शिजतंय!

Subscribe

अजित पवारांच्या नाकदुर्‍या काढण्याचा आटापीटा

आपला नातू पार्थ पवार हे अपरिपक्व असून त्यांच्या मताला आपण कवडीची किंमत देत नसल्याचे शरद पवार यांनी जाहीरपणे सुनावणे अजित पवार यांच्या जिव्हारी लागले आहे. सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवार यांच्या समोर गुरुवारी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला गेला खरा; पण अजूनही अजितदादांचा राग शांत झालेला नाही. विशेष म्हणजे त्यांना समजावण्यासाठी स्वतःप्रफल्लल पटेल दिल्लीहून येऊनही त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.

पटेल यांची मात्रा लागू पडत नसल्याने शुक्रवारी पुन्हा एकदा अजितदादांच्या नाकदुर्‍या काढण्यासाठी काय करता येईल, यासाठी बैठक बोलावण्यात आली. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीला सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, अदिती तटकरे आणि धनंजय मुंडे हजर होते. पक्ष पातळीवर अजित पवार यांची नाराजी दूर होत नसल्यामुळे शनिवार तसेच रविवारी घरगुती पद्धतीने हा तिढा सुटावा यासाठी प्रयत्न केले जातील. अजितदादांचे ज्येष्ठ बंधू श्रीनिवास पवार यांच्या बारामतीच्या घरी पवार कुटुंबिय भेटणार आहेत. राष्ट्रवादीमध्ये काहीतरी शिजतंय त्यामुळे मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे.

- Advertisement -

अजित पवार हे पुन्हा एकदा बंडाच्या तयारीत असल्याचे वृत्त ‘ दै. आपलं महानगर’ने दिले होते. पार्थ पवार प्रकरणाचे निमित्त करून अजितदादांच्या बंडाला जोर मिळाला असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये घेऊन जाण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत होती. नारायण राणे यांच्यासह भाजपचे अनेक नेते ठाकरे सरकार दोन महिन्यात कोसळणार असल्याचे ठामपणे सांगत आहेत. त्यामागे अजित पवार यांच्या बंडाची तयारी असल्याचे चित्र आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले असून हे बंड थंड व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जोरात कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनावर मान टाकून कारभार करण्याच्या पद्धतीने आधीच अजित पवार नाराज आहेत. त्यातच शरद पवार महाविकास आघाडीच्या कारभारावर नको तितका भरवसा दाखवत आहेत, याची निराशा आणि त्यातच पार्थ यांच्यावर जाहीरपणे केलेली टीका या सार्‍याचा भडका होऊन अजितदादा भाजपला जाऊन मिळतील असे दिसत आहे. यामुळेच पक्ष, घरगुती पातळीवर दादांच्या नाकदुर्‍या काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली. त्यानंतर आता पार्थ पवार आपले काका श्रीनिवास पवार, अभिजित पवार, जयंत पवार तसेच सर्व आत्यांशी बोलून आपली भूमिका आणि निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे, आदित्य तटकरे, धनंजय मुंडे यांनी वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पार्थ पवार गुरुवारी सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. परंतु यावेळी पार्थ आणि सुप्रिया सुळे यांच्यातच चर्चा झाली. मात्र शरद पवार आणि पार्थ यांची भेट झाली नसल्याचे कळते. त्यानंतर आता कुटुंबातील इतर सदस्यांसोबत बोलण्याचा निर्णय पार्थ पवार यांनी घेतला आहे. अजित पवार आणि पार्थ पवार हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चेवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पडदा टाकला आहे.

- Advertisement -

अजित पवारांचे मौन
सिल्व्हर ओकवरील रात्रीच्या घडामोडीनंतर गुरुवारी दिवसभर पार्थ पवारच्या गोटात सामसूम होती. तर अजित पवारांनी देखील या विषयावरील आपले मौन सोडलेले नाही. शुक्रवारी दिवसभराच्या बैठका आटोपून ते तडक पुण्याला निघून गेले आहेत.

हा आमच्या कुटुंबातील विषय-रोहित पवार
पार्थ पवार हा विषय आमच्या कुटुंबातील आहे. त्यात अन्य कुणी यात पडण्याचे कारण नाही. त्यावर बोलण्यापेक्षा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून जे राजकारण सुरू आहे त्यावर बोला. याप्रकरणी राजकारण सुरू असल्याचे मी सुरुवातीपासूनच बोलत आलो आहे आणि आता ते म्हणणे हळूहळू खरे होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या एका खूप मोठ्या नेत्याला बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रभारी म्हणून सूत्रे दिली जाणार आहेत, अशी बातमी आहे. त्यामुळे भाजप सुशांत प्रकरणावर इतका आवाज का उठवत आहे, हे सुद्धा स्पष्ट होऊ लागले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

पार्थच्या ट्विटची दिवसभर चर्चा
कोरोनाच्या लढ्यात आपण सगळे कष्ट करत आहोत, यातून चांगलेच काहीतरी निघेल. महाराष्ट्राचे हे स्पिरिट आहे. आपण हार मानत नाही असे ट्विट केले. सोबत त्याने गणरायाची मूर्तीही जोडली होती. मात्र ट्विटमधील आपण हार मानत नाही या वाक्याचे अनेक अर्थ काढले जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -