राज्यपालांनी शाहांना लिहिलेलं पत्र आज कसं काय बाहेर आलं?, अमोल कोल्हेंचा सवाल

Amol Kolhe

मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे त्यांच्या विधानामुळे सातत्याने चर्चेत आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे राज्यभर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना या सर्व प्रकरणावर पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी ६ डिसेंबर रोजी अमित शाहांना लिहिलं आहे. परंतु अवघ्या ६ दिवसांनंतर हे पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर आलं आहे. हे पत्र १२ डिसेंबर रोजी बाहेर आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

अमोल कोल्हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलेलं पत्र नेमकं आजच का बाहेर आलं? त्यावरची तारीख जुनी असताना आजच ते कसं उघड झालं? असा प्रश्न खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

राज्यपाल यांनी पत्रात लिहिलं आहे की, त्यांच्या मनात कोणाचा अनादर करण्याची अशी कोणतीही भावना नाही. असं असेल तर वारंवार तसी वक्तव्यं का येतात?, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. चंद्र-सूर्य आकाशात आहेत, तोपर्यंत त्यांचं तेच स्थान असेल. त्यामुळे शिवरायांविषयी वारंवार अपमानास्पद वक्तव्य का होत आहेत, याचंही उत्तर मिळणं अपेक्षित आहे, असं कोल्हे म्हणाले.

राज्यपालांनी पत्रात काय म्हटलंय?

माझ्या भाषणातला लहानसा अंश काढून काही लोकांनी त्याचं भांडवलं केलंय. मी म्हणालो होतो- मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस आदींना आदर्श मानलं जात होतं. हे सगळे आदर्शच आहेत. पण युवापिढी नवे आदर्श शोधत असते. म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी, शरद पवार हेही आदर्श असू शकतात, असं माझं वक्तव्य होतं. माझ्याकडून अनवधानाने चूक झाली तर तत्काळ पश्चाताप करण्यास मी संकोच करत नाही, असं पत्रात म्हटलं आहे.


हेही वाचा : उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लिहिली चिठ्ठी अन् चर्चेला उधाण