घरमहाराष्ट्रमाझ्यावरील खोट्या आरोपांचा उलगडा करण्यासाठी ईडी कार्यालयात हजर झालो - अनिल देशमुख

माझ्यावरील खोट्या आरोपांचा उलगडा करण्यासाठी ईडी कार्यालयात हजर झालो – अनिल देशमुख

Subscribe

नॉट रिचेबल असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज त्यांच्यावर असलेल्या मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. दरम्यान, ईडी कार्यालयात का हजर झालो यासंदर्भात अनिल देशमुख यांनी एक पत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांचा उलगडा करण्यासाठी ईडी कार्यालयात हजर झालो, असं म्हणाले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप करुन राज्यात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करत असताना यात मनी लाँड्रिंग झाल्याचा दावा ईडीने करत या प्रकरणाची चौकशी सुरु केली.

- Advertisement -

ईडीने अनिल देशमुख यांना पाचवेळा समन्स बजावलं आहे. मात्र, एकदाही अनिल देशमुख ईडी कार्यालयात झाले नव्हते. दरम्यान, शुक्रवारी अनिल देशमुख यांची ईडीचा समन्स रद्द करणारी मागणी फेटाळत जर अनिल देशमुख चौकशीला समोरे जातील तेव्हा त्यांच्यासोबत वकील राहण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर आज सोमवारी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. दरम्यान, आपण ईडी कार्यालयात का हजर झालो याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

मी सार्वजनिक ठिकाणी वावरणारा व्यक्ती असून माझे आयुष्य माझ्या लोकांच्या सेवेत घालवल्यामुळे, मी प्रामाणिकपणे कायद्याचं पालन केलं आहे. माझे जीवन एक खुलं पुस्तक आहे आणि माझ्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही. मात्र काहींनी माझ्यावर खोटे आरोप केले. आरोप करणारी व्यक्ती खंडणी, फसवणूक आणि अगदी खुनाच्या अशा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळणारी प्रमुख व्यक्ती आता वाँटेड फरार गुन्हेगार आहेत, असं अनिल देशमुख यांनी त्यांच्या जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

- Advertisement -

मी ईडी कार्यालयासमोर जाणं टाळत आहे, अशा बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या. मी कधीही न घाबरता पारदर्शक, निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ चौकशीची मागणी केली आहे जेणेकरून सत्याला धक्का लागू नये. अशा निःपक्षपाती अधिकार्‍यांसमोर हजर होऊन माझ्यावर लावलेल्या आरोपांचा खोटारडेपणा उघड करायला मी तयार आहे. अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी प्रसंगावधान राखून योग्य रीतीने काम करतील आणि तपासात माझ्या सहकार्याबाबत असलेल्या कोणत्याही गैरसमजांना दूर करण्यासाठी मी आज मुंबईत अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झालो. सत्याचा विजय होईल, असं अनिल देशमुख म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -