कांजूरमार्गला मेट्रो कारशेड म्हणजे २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी, आशिष शेलार यांचा आरोप

खासगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो.

Ashish Shelar alleges Metro car shed on Kanjur Marg is Rs 25,000 crore scam
कांजूरमार्गला मेट्रो कारशेड म्हणजे २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी, आशिष शेलार यांचा आरोप

मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. आरेमध्ये करण्यात येणारं मेट्रो कारशेड आता कांजूरमार्ग येथे करण्यात येणार आहे. परंतु कांजूरमार्ग येथील जमीनीच्या मालकी हक्कावरुन वाद सुरु आहे. उच्च न्यायालयात या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली आहे. यावेळी एमएमआरडीएने न्यायालयात मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने 3 हजार कोटी द्यायला तयार आहोत असे सांगितले आहे. यावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आरेमध्ये मेट्रो कारशेड तयार करण्यात येत होतं परंतु आरेमध्ये बांधकाम करण्याच्या निर्णयाला प्रचंड विरोध झाल्याने राज्य सरकारने मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे स्थलांतरित केलं आहे. कांजूरमार्गमधील जागेच्या मालकीवरुन वाद सुरु झाल्याने काम प्रलंबित राहिले आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करताना एमएमआरडीएनं दिलेल्या माहितीवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या भ्रष्टाचाराचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केला आहे. कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी, खासगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो. हळूहळू सत्य समोर येतेय. जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे? चेहरा भोळा अन् भानगडी सोळा अशी खरमरीत टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

तसेच मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने ३ हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले. सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही? मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव? कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले? अशी बेमालूमपणे बनवाबनवी? असा सवालही भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.