मंत्रीपद हा आमचा हक्क तो आम्ही मिळवणारच – बच्चू कडू

वादग्रस्त आमदारांनाही मंत्रीपद मिळाल्याने, मंत्रीपदाची आस लावून बसलेल्या शिंदेगटातील इतर आमदारांबरोबरच प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.

bacchu kadu

सत्तेत आल्यानंतर तब्बल ३९ दिवसांनी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. राजभवनात पार पडलेल्या या सोहळ्यात १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र यात काही वादग्रस्त आमदारांनाही मंत्रीपद मिळाल्याने, मंत्रीपदाची आस लावून बसलेल्या शिंदेगटातील इतर आमदारांबरोबरच प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. मंत्र्याच्या यादीत नाव नसल्याने बच्चू कडू यांनी माझ नावं असलं तरी चांगल आणि नसलं तरी चांगल असे उपहासात्मक विधान केले आहे. एवढेच नाही तर मंत्रीपदाचा अधिकार मिळवणारच असा इशाराच त्यांनी दिला आहे.

गेल्या ३९ दिवसांपासून रखडलेल्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार आणि त्यात मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष होते. यावरून विरोधकांकडून सातत्याने शिंदे फडणवीस सरकारला लक्ष्यही केले जात होते. तसेच मविआ सरकारबरोबर बंडखोरी करून भाजपचा हात धरणाऱ्या शिंदेगटात मंत्रीपदावरून धुसफूस सुरू असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. अखेर सोमवारी रात्री उशिरा राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच ज्या आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती त्यांची नावेही काल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र यात शिंदेगटात सहभागी झालेल्या प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचे नाव नव्हते.तर दुसरीकडे मंत्रीपद मिळवण्यासाठी आमदार संजय राठोड आणि टीईटी प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे जोरदार लॉबिंग सुरू केली होती.

मंगळवारी पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान या दोघाही मंत्र्यांनी शिंदेची भेट घेतली होती. सत्तार यांनी मंत्रीपद मिळवण्यासाठी गेल्या आठवड्यात दिल्लीची वारीही केली होती. तर संजय राठोड सातत्याने शिंदेच्या मागेपुढे करत होते. तर इतर आमदार मात्र शिंदेच्या अपेक्षित फोनची वाट पाहात होते. यात प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचाही समावेश होता. पण सोमवारी रात्री व्हायरल झालेल्या मंत्र्यांच्या यादीत कडू यांचे नाव नव्हते. ठाकरे सरकारने बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद दिले होते. पण तरीही कडू शिंदेगटात गेल्याने ठाकरेंसह सगळ्यांनाच धक्का बसला होता. शिंदेसाठी बच्चू कडू यांनी राज्यमंत्रीपद सोडल्याने त्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण आजच्या विस्ताराच्या पहील्या टप्प्यात त्यांना स्थान देण्यात न आल्याने बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तर यादीत माझं नाव असलं तरी चांगलं आणि नसलं तरी चांगलं असं म्हणत मंत्रीपदापेक्षा शेतकऱ्यांच्या मुद्यावरून चर्चेत यायला हवं. शेतकऱ्यांचे प्रश्नांना माझं प्राधान्य आहे. पण अपक्ष आणि प्रहार हा आमचा पक्षही महत्त्वाचा असू. त्याशिवाय सरकार होऊ शकत नाही. असे त्यांनी म्हटले असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.  मात्र मंत्रीपद हा आमचा हक्क असून तो आम्ही मिळवणारच, असा इशारा बच्चू कडू यांनी  दिला आहे. असे यामुळे मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्याच्या विस्तारात संधी न मिळालेल्या बच्चू कडू यांना दुसऱ्या टप्प्यात तरी मंत्रीपद मिळणार का, याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.