मुंबईतून गुजराती, राजस्थानी गेल्यास ही आर्थिक राजधानी राहणार नाही; राज्यपालांचे वादग्रस्त विधान; विरोधक आक्रमक

bhagat singh koshyari controversial statement about mumbai maharashtra

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या वक्तव्यातून राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्या म्हणत विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारींनी केले आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील स्थानिक चौकाला काल दिवंगत  शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी बोलताना राज्यपालांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. यातून त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असून त्यांचा राजीनामा घ्या अषी मागणी आता विरोधक करत आहेत. अनेक  विरोधी पक्षांनी राज्यपालांच्या विधानाचा जाहीर निषेध केला आहे.

“थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा”

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील ट्विटवर राज्यपालांच्या विधानाचा जाहीर निषेध केला आहे. आता तरी.. ऊठ मराठ्या ऊठ.. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे.. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत.. मराठ्या तुलाच उठावे लागेल.. असे एक ट्विट राऊतांनी केले आहे.

थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे… 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता.. मुख्यमंत्री शिंदे …ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे.. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय? असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे.

“काय ती झाडी.. काय तो डोंगर.. काय नदी.. आणि आता…”

काय हा मराठी माणूस ..महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत.. जय महाराष्ट्र… अशा शब्दात राऊतांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे.. ऐका .. ऐका… अस देखील राऊतांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

“राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो”

दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील ट्विट करत राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला आहे. राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

 

“मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात”

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील ट्विट करत म्हटले की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, अशी मागणी त्यांनी केले.


शिंदे गटातून 40 आमदार गेले तरी सरकारला धोका नाही; आमदार बच्चू कडू यांचे विधान