सत्तासंघर्षावरून भास्कर जाधव यांची राज्य सरकारवर सडकून टीका; म्हणाले..

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सत्तासंघर्षाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

mla bhaskar jadhav
bhaskar jadhav

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधिमंडळाच्या प्रांगणातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्तासंघर्षाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर सडकून टीका केली. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना बजावलेल्या व्हिपला भीक घालत नसल्याचे म्हणत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आजपर्यंत आमच्यासोबत अनेक घटना घडल्या. त्या कोणत्याच घटनांना आम्ही घाबरलो नाही. व्हिप दिला असे सांगून कोणी आम्हाला घाबरवू पाहात असेल तर त्याला आम्ही भीक घालत नाही, असेही यावेळी आमदार भास्कर जाधव यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारवर हल्लाबोल करताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, वारंवार आम्हाला व्हिप दिला, व्हिप दिला, असे सांगून घाबरवू पाहत असेल तर अशा गोष्टीला आमच्या ग्रामीण भाषेत कोंबडीहुल असे म्हणतात आणि तुमच्या या हुलला आम्ही भीक घालत नाही, से म्हणत प्रत्युत्तर देत नाही. शिंदे गटाच्या लोकांना शेड्यूल १० चा अधिकार तरी आहे का? शेड्युल १० हा पक्षांतर्गत बंदीविरोधी कायदा आहे. या कायद्याचं सरकारला भान आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कै. अटलबिहारी वाजपेयी यांनी हा कायदा आणला होता. बंडखोरांनी एखाद्या पक्षात सामील व्हावं किंवा नवीन पक्ष स्थापन करावा. व्हिपने कुणी घाबरवत असेल तर मी भीक घालत नाही. आमचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमचं संरक्षण काढलं तरी आम्ही डगमगलो नाही तर व्हिपचं काय घेऊन बसलात, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.

हेही वाचा – महाराष्ट्र गद्दारीला जन्म देणारा प्रदेश नाही, जितेंद्र आव्हाडांची गुलाबराव पाटलांवर टीका

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला व्हिप बजावण्यास आणि कारवाई करण्यास मनाई केलेली आहे. तरी देखील काल (ता. २६ फेब्रुवारी) शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप बजावण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि नाव दिल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परवा न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवत शिवसेनेला व्हिप बजावता येणार नाही, असं म्हणत पुढची सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे.

दरम्यान, हे सरकार सत्तापिपासू आहे. सत्ता मिळविण्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. शेतकरी हवालदिल झाला आहे. सत्तेत येताच सर्व प्रश्न मार्गी लावू असे या सरकारकडून सांगण्यात आले होते. पण असे झालेले नाही. पैसा, कायदा आणि इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता निवडणूक जिंकणे हेच यांना माहित आहे. हि प्रकारची विकृती झाली आहे, असा टोला देखील भास्कर जाधव यांनी यावेळी लगावला आहे.