गुजरात जिंकणारे पाटील ग्रामपंचायत हरले, भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या मुलीच्या पॅनलला तीनच जागा

Grampanchayat Eletion | लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळाले आहे. महत्त्वाचं म्हणजे गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्ष असलेल्या सी.आर. पाटलांच्या मुलीच्या पॅनलला मात्र जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता.

bhavini patil

जामनेर – गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी गुजरात विधानसभा निवडणूक काबिज केली. पण त्यांच्या मुलीच्या पॅनलला मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत सपाटून मार खावा लागला आहे. मोहाडी ग्रामपंचायत सदस्यपदी सी.आर पाटील यांची कन्या भाविनी पाटील जिंकून आल्या. मात्र, त्यांच्या ग्रामविकास पॅनलला १० पैकी फक्त तीनच जागा मिळवता आल्या आहेत. त्यामुळे गुजरात जिंकणाऱ्या सी. आर. पाटलांना ग्रामपंचायत राखता आली नाही, असं म्हटलं जातंय.

जळगावातील मोहाडी ग्रामपंचायतीत भाविनी पाटील आणि शरद पाटील यांच्यात लढत होती. या लढतीत भाविनी पाटील यांनी दहापैकी तीन तर, शरद पाटील यांना दहापैकी सात जागा मिळाल्या आहेत. तसेच, लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळाले आहे. महत्त्वाचं म्हणजे गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्ष असलेल्या सी.आर. पाटलांच्या मुलीच्या पॅनलला मात्र जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता.

सी.आर. पाटील हे मुळचे जळगावचे आहेत. मात्र, वडिल गुजरातमध्ये स्थायिक झाल्याने ते सी.आर.पाटीलही तिथेच राहिले. त्यामुळे त्यांच्या राजकीय करिअरला गुजरातमधून सुरुवात झाली. परंतु, त्यांची मुलगी भाविनी पाटील जळगाव येथे राहत असल्याने त्यांनी तिथून निवडणूक लढवली.

राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी रविवारी ( 18 डिसेंबर) मतदान पार पडले. यात 74 टक्के मतदान झाले आहे. सदस्यांसह थेट जनतेतून सरपंचांची निवड करणाऱ्या या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होईल. आज सकाळी 10 वाजल्यापासून या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. (gram panchayat election result 2022)

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान होईल असे जाहीर केले, मात्र यातील काही ठिकाणी सरपंच पदच्या तर काही ठिकाणी सदस्य पदांच्या निवडणुका या बिनविरोधात झाल्या. राज्यातील जवळपास 590 ग्रामपंचायती बिनविरोधात झाल्याचे म्हटले जाते. यात रायगड जिल्ह्यातील एकूण 240 ग्रामपंचयतींपैकी 50 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील 447 ग्रामपंचायतींमधील 28 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर चंदगड तालुक्यातील 40 पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा, पिंगुळी, माणगाव, कलमट, नांदगाव या महत्वाच्या ग्रामपंचायती आहेत, कारण या ग्रामपंचायतींवर राणेंचे वर्चस्व आहे.