अजितदादांचा खळबळजनक दावा: पुण्यातील काही भाजप नगरसेवक आपल्या संपर्कात

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक स्वतःच्याच नेतृत्वात लढली जाणार असल्याचं केलं जाहीर

ajit pawar

औरंगाबादमधील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेचे वादळ उठलेले असतानाच आता उपमुख्यमंत्र्यांनीही भाजप नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केलाय. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वाखाली लढली जाणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं. याशिवाय पुण्यातले भाजपचे काही नगरसेवकदेखील आपल्या संपर्कात असल्याचा दावादेखील अजित पवारांनी केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळातील घडामोडींना मात्र चांगलाच वेग आलाय.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वात लढली जाणार आहे. पुण्यातील काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मात्र, मी खालच्या पातळीचं राजकारण करत नाही, असं स्पष्ट करतानाच भाजपच्या अनेक नगरसेवकांना आम्ही संधी दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये युतीबाबत केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं. आम्ही एकत्रित काम करत असताना आजपर्यंत तरी चांगलं सुरु आहे. त्यामुळे या वक्तव्याकडे फारसं गांभीर्यानं पाहत नाही. राज्याचे प्रमुख असल्याने ते तसं बोलू शकतात, असंही पवार म्हणाले.