घरमहाराष्ट्रइंदिरा गांधींसारखे आपण सक्षम नसल्याचे भाजपला शल्य

इंदिरा गांधींसारखे आपण सक्षम नसल्याचे भाजपला शल्य

Subscribe

इंदिरा गांधी यांनी आणीबाणीचा निर्णय घेतला होता, भाजपने त्याविरोधात आज 'काळा दिवस' साजरा केला. काँग्रेसनेही यावर प्रत्युत्तर दिले आहे. इंदिरा गांधीसारखे सक्षम नेतृत्व भाजपात नसल्यानेच असे काळे दिवस साजरे करण्याची त्यांच्यावर वेळ आल्याची टीका केली आहे.

भाजपकडून ४३ वर्षापूर्वीच्या आणीबाणीचा संदर्भ देऊन आज काळा दिवस साजरा केला जात आहे. यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात पाकिस्तानचे एक घावात दोन तुकडे करण्यात आले. बांग्लादेशची निर्मिती करून भारताची पूर्व सीमा सुरक्षित करण्यात आली. आपल्याला इंदिरा गांधी यांच्यासारखे कणखर निर्णय घेता येत नाहीत, याचे शल्य भाजपला आहे. विखे पाटील यांनी भाजपचे नाव घेऊन ही टीका केली असली तरी अप्रत्यक्षरित्या त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यांवरच निशाणा साधला आहे.

- Advertisement -

भाजप सरकारने पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. पण त्याचे परिणाम कुठेच दिसून येत नाहीत. आता काश्मीरचा प्रश्न इतका चिघळला की, तेथील सरकारमधून भाजपला अक्षरशः पळ काढावा लागला आहे.

- Advertisement -

आता या सर्व प्रश्नांवर लोक भाजपला जाब विचारू लागले आहेत. भाजपकडे त्यावर कोणतेही उत्तर नाही. आपण चार वर्षात काय केले, याबद्दल काहीही सांगता येत नसल्याने भाजपने चार दशकांपूर्वी काय घडले, यावर बोलायला सुरूवात केली आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी, देशातील ज्वलंत समस्यांवरून लोकांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी केलेली ही एक खेळी आहे. पण देशातील जनता सूज्ञ आहे आणि या नकारात्मक राजकारणाची भाजपला मोठी किंमत सरकारला चुकवावी लागेल, असा इशाराही विखे पाटील यांनी यावेळी दिला.

मागच्या चार वर्षात देशात अघोषित आणीबाणी – अशोक चव्हाण

मोदींच्या कार्यकाळात मागच्या चार वर्षांपासून देशातली जनता काळे दिवस भोगते आहे. भाजपने सत्ताकाळात देशात अघोषीत आणीबाणी लादली आणि आज ते लोकशाहीच्या गप्पा मारत असल्याची जळजळीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

चव्हाण यांनी यावेळी दलित, अल्पसंख्यांक आणि आदिवासी यांच्यावर मागच्या चार वर्षात झालेल्या अत्याचारांचे उदाहरण देत सांगितले की, या घटकांना वेठीस धरण्याचे काम भाजपने मागच्या चार वर्षांत केले आहे. भाजप सत्तेत आल्यापासून देशाची अर्थव्यवस्था डबघाईला गेली, बेरोजगारीत बेसुमार वाढ झाली, त्याउपर कोणी काय खायचे, काय घालावे यावर दबाव गटांकडून नियंत्रणे आणली जात आहेत. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून हत्या केल्या जात आहेत. आतापर्यंत सार्वभौम असलेल्या न्यायव्यवस्थेवरही सरकारकडून दबाब आणल्याची उदाहरणे घडत आहेत. एकंदरीतच देशात आणीबाणीची परिस्थिती असल्यामुळे जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भाजपकडून काळा दिवस साजरा करण्यासारखा इव्हेंट केला जात असल्याचे सांगितले.

संविधान दिन साजरा करण्यावरुन काँग्रेस-भाजप जुंपली

मुंबईमध्ये भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी भाजपनेच सर्वप्रथम संविधान दिवस साजरा केला असल्याचे सांगितले. परंतु चव्हाण यांनी वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे सांगितले. महाराष्ट्र सरकारने २००८ साली संविधान दिवस सर्वत्र साजरा करण्याचे परिपत्रक काढले असल्याचे सांगितले. २४ नोव्हेंबर २००८ रोजी काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जारी करून सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा-महाविद्यालयांमध्ये संविधान दिन साजरा करण्याचे आदेश दिले होते.

Congress-NCP Govt GR about Constitution Day
संविधान दिन साजरा करण्याबाबतचा आघाडी सरकारचा शासन निर्णय
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -