नितेश राणे म्हणतात, ‘या’साठी वरुण सरदेसाईंना संरक्षणाची खरी गरज आहे

वरुण सरदेसाई यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरुन ठाकरे सरकारला नितेश राणेंनी काढला चिमटा.

bjp mla nitesh rane says varun sardesai needs protection
नितेश राणे म्हणतात, ‘या’साठी वरुण सरदेसाईंना संरक्षणाची खरी गरज आहे

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार प्रसाद लाड, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. सत्ताधारी राजकारण करुन विरोधकांची सुरक्षा कमी करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर  सुरक्षा देण्याच्या यादीत शिवसेना युवासेनेचे वरुण सरदेसाई यांचे नाव असल्याने भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरुन ठाकरे सरकारला पुन्हा एकदा टार्गेट केले आहे. सरदेसाई  मंत्रालयात फिरणाऱ्या फाईल्सवर कंट्रोल करतात. यामुळे त्यांना सुरक्षेची गरज असल्याचे  ट्विट करत नितेश राणेंनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की,‘महाराष्ट्र सरकारने वरुण सरदेसाईंना सुरक्षा देण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण वरुणला सुरक्षेची खरी गरज आहे. वरुण सरदेसाईचा मंत्रालयात फिरणाऱ्या फाईल्सवर जेव्हापासून अंकुश आला आहे. तेव्हापासून प्रशासनातील काही अधिकारी त्याच्यावर नाराज आहेत. तसेच त्यांच्या मनात राग आहे, असे ऐकण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षेची नितांत गरज आहे’, असा टोला नितेश राणेंनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

आमचा आवाज बुलंद राहणार

विरोधक सुरक्षा कमी करण्याचा घाट घालत आहेत. मात्र, असे असले तरी देखील आमचा आवाज बुलंद राहणार, असल्याचे विरोधकांकडून बोले जात आहे. तसेच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीस राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला जातो. त्यावेळी कोणाला सुरक्षा द्यायची? कोणाची सुरक्षा काढून घ्यायची यावर निर्णय घेतले जातात, असा पवित्रा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची घेतला आहे.

कोण आहे वरुण सरदेसाई?

वरुण सरदेसाई हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचा मुलगा आहे. त्यांच्याकडे युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वरुण सरदेसाई यांचा वावर मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर वाढला आहे. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेंना विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी पहिल्यांदा वरुण सरदेसाई यांनीच केली होती. तसेच वरुण हे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे स्टार प्रचारक होते.


हेही वाचा – देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंसह ‘या’ बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात