ज्ञानार्जन, अर्थार्जन योजनांद्वारे दिव्यांगांचा मुंबई पालिका करणार सर्वांगिण विकास

दिव्यांग व्यक्ती हा समाजातील महत्वपूर्ण घटक आहे. समाजातील त्यांचे स्थान इतरांप्रमाणेच आहे. महाराष्ट्र शासन आणि मुंबई महापालिका दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना, उपक्रम राबविते. याच पार्श्वभूमीवर येत्या आर्थिक वर्षातही दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ज्ञानार्जनासहित अर्थार्जन होऊ शकेल, अशा योजना राबविणार असल्याचे प्रतिपादन सहायक आयुक्त (नियोजन) प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाद्वारे सामजिक, क्रिडा व इतर क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिव्यांग व्यक्तींचा महापालिकेच्या जी/उत्तर विभागातर्फ़े प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यगृहात मंगळवारी पार पडलेल्या कार्यक्रमात समाज विकास अधिकारी वैदिका साळुंखे-पाटील, सरला राठोड, विभा जाधव आदींच्या हस्ते शाल व श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सत्कारमूर्ती, दिव्यांग व्यक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन आणि महापालिका दिव्यांगांच्या सर्व योजना गरजूंपर्यंत सुरळीतपणे पोहोचाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. यानुषंगाने, कोविड – १९ चा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे संथगती प्राप्त झालेल्या योजनांना उभारी देण्यात येईल. यासाठी दिव्यांगांशी संपर्क वाढवून ज्या योजना दिव्यांगांच्या दृष्टीने लाभदायक आहेत त्या राबविण्या बाबत सूचना मागविण्यात येतील, अशी माहिती प्रशांत सपकाळे यांनी यावेळी दिली.

तसेच, महापालिका दिव्यांगाच्या उत्कर्षासाठी तरतूद केलेल्या निधीपेक्षा कितीतरी जास्त निधी खर्च करुन सर्वपरिने मदत करीत आहे. यापुढील काळातही विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार प्रशिक्षण, उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होईल, अशा योजना दिव्यांगाच्या कल्याणासाठी महापालिका राबविण्यास कटिबध्द असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

‘दिव्यांग अंध बांधवांसाठी चित्रांचे प्रदर्शन’

दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित केलेले चित्रांचे प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. “ऍक्सेसिबल इंडिया – मूलभूत सुविधा सर्वांसाठी” या योजनेच्या पुढे एक पाऊल टाकत कलेच्या माध्यमातून दिव्यांगांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचं महत्वपूर्ण कार्य चित्रकार चिंतामणी हसबनीस करत आहेत. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन रवींद्र नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले होते. यातील ‘द वॉल’, बॉर्डर, पोर्ट्रेट ऑफ अजिंक्य, लता इन पोर्ट्रेट्स इत्यादी निवडक चित्रांवर आधारित विश्लेषण करण्यात आले.


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात ३५ ते ४० कोटींचा खर्च, हे हास्यास्पद… आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल