घरमहाराष्ट्र१५ दिवसांत मिळेल जातवैधता प्रमाणपत्र; 'या' कागदपत्रासह या ठिकाणी करू शकता अर्ज

१५ दिवसांत मिळेल जातवैधता प्रमाणपत्र; ‘या’ कागदपत्रासह या ठिकाणी करू शकता अर्ज

Subscribe

सोलापूर : दहावी-बारावी परीक्षेनंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दिसतात. यात प्रामुख्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जात पडताळणी समितीकडून आता १० ते १५ दिवसांत जातवैधता प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक असते, मात्र जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी लागणार वेळ विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेताना त्रासदायक होत होता. यामुळे जात पडताळणी समितीकडून आता १० ते १५ दिवसांत जातवैधता प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जातवैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना www.bartyvalidity.gov.in आणि www.ccvis.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. यासाठी अर्जासोबत लागणारे आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून दिलेल्या साईजमध्ये अपलोड करावी लागणार आहेत.

- Advertisement -

अर्ज भरून पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी प्रिंट काढावी आणि सर्व मूळ कागदपत्रांसह सोलापुरातील सात रस्ता परिसरातील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात ऑफलाईन अर्ज जमा करावा. समितीच्या माध्यमातून त्या अर्जांची पडताळणी होईल. परिपूर्ण प्रस्ताव असल्यास संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या ‘ई-मेल’वर ऑनलाइन जातवैधता प्रमाणपत्र पाठवण्यात येते.

दरम्यान, विद्यार्थ्यांकडे वडील, आजोबा, पणजोबाचे १९५०-६० वर्षांपूर्वीचे शैक्षणिक काहीच कागदपत्रे नसल्यास या कालावधीतील कोणतेही खरेदी दस्तऐवज, फेरफार किंवा ‘देवी’ची लस टोचल्याचे कागदपत्र तथा जन्म-मृत्यूची ग्रामपंचायतीतील नोंद, यापैकी एक कागदपत्र ऑनलाइन अर्जासोबत जोडावे लागणार आहे. पण, त्यावर जातीची नोंद असणे आवश्यक आहे.

- Advertisement -

ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे किंवा घेतला आहे. या महाविद्यालयातील प्राचार्यांनी भरून दिलेला ‘१५-अ’चा अर्ज आणि त्यासोबत संबंधित विद्यार्थ्यांची जात पडताळणी करून मिळावी, असा एक अर्ज ऑनलाइन अर्जासोबत जोडून प्रस्ताव सादर करावा, असे जात पडताळणी समितीने सांगितले आहे.

प्रस्तावासोबत ‘ही’ कागदपत्रे जोडणे
1. स्वत:चा, वडिलांचा, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला.
2. शैक्षणिक कागदपत्रे नसल्यास १९६० पूर्वीचा खरेदी दस्ताऐवज, सातबारा, फेरफार किंवा अन्य कागदपत्रे
3. विद्यार्थ्यांचे बोनाफाईड व प्राचार्यांकडून भरलेला (१५-अ) अर्ज किंवा प्राचार्यांचे पत्र
4. स्वत:बरोबरच वडिलांचे आधारकार्ड, रेशनकार्ड
5. वंशावळ व कागदपत्रे खरी असल्यासंबंधी तहसील कार्यालयातील दोन प्रतिज्ञापत्र
6. १९५० पूर्वीचा पुरावा बंधनकारक

‘एससी व एसटी’ संवर्गातील विद्यार्थ्यांनी जातवैधता प्रमाणपत्रासाठी त्यांच्या पूर्वजांचा १९५० पूर्वीचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. तसेच ‘ओबीसी व एसबीसी’संवर्गासाठी १९६७ पूर्वीचा आणि ‘एनटी’साठी १९६१ पूर्वीचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे. त्या कागदपत्रांवरून जात पडताळणीवेळी संबंधित विद्यार्थ्याची जात निश्चित होते.

परिपूर्ण प्रस्तावांवर किमान १५ दिवसांत निर्णय
शासनाच्या निर्णयानुसार जात पडताळणीसाठी अर्ज केल्यानंतर तीन महिन्यात वैधता प्रमाणपत्र दिले जाते, मात्र त्रुटी असल्यास वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांचा अवधी लागतो. पण काही वेळेला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या विचार करून परिपूर्ण प्रस्तावावर किमान १५ दिवसांत निर्णय घेतला जातो, असे सोलापूर जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव सचिन कवले यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -