घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसीबीएस : हुतात्म्यांच्या नावाने मंतरलेला चौक

सीबीएस : हुतात्म्यांच्या नावाने मंतरलेला चौक

Subscribe

नाशिकला पौराणिक, ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर असा इतिहास आहे. नाशिक अर्थात गुलशनाबाद शहराच्या इतिहासाचा हा वैभवशाली खजिना आजपासून सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास या पुस्तकातील लेखांद्वारे प्रसिद्ध करत आहोत. शहराच्या चौकांतील धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन नाशिकला वैभवाप्रत नेण्यासाठी या चौकातील काही मान्यवरांची माहितीही या मालिकेतून दिली जाणार आहे.

नाशिकमध्ये सी.बी.एस. होण्यापूर्वी या जागी तलावासारखा मोठा खड्डा होता. शेजारी टेकडीवजा भाग होता. खड्डा बुजवून सपाट केलेल्या भागात भारतातील अनेक नामवंत सर्कशी तंबू ठोकून कार्यक्रम व्हायचे. येथून पुढे शरणपूरकडे जाताना रामरक्षा पाठांतराची सक्ती न करता विद्यार्थी रामरक्षा म्हणत. आज गजबजलेल्या, रात्रंदिवस वर्दळीच्या सीबीएसची परिस्थिती एकेकाळी अशीच होती. आताच्या सीबीएस चौकात दामोदर चित्रभवन आणि एच.डी.एफ.सी.चा फलक आहे. त्या जागेवरील छोट्या उंचवट्याच्या ठिकाणी विटामातीचे बांधकाम केलेले तत्कालीन नाशिक नगरपालिकेचे जकात वसुली नाके होते. त्याचे नाव बडे विहीर नाका. कसबे नाशिकची हद्द त्यानजीकच संपत असे.

१८१८ मध्ये इंग्रजी राजवट सुरू झाली. त्या सुमारास नाशिकमध्ये प्लेगची साथ आली. १८२६ मध्ये रेव्हरंड गार्डन या नाशिकमध्ये आलेल्या अमेरिकी ख्रिस्ती मिशनरीने प्लेगच्या साथीत रूग्णसेवेसोबत धर्मप्रसारासही सुरुवात केली. त्याच्या मदतीला रेव्हरंड डिकसन व फयासर दाम्पत्य आले. त्यांनी रूग्णसेवेबरोबर मुलामुलींना शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला व ख्रिस्ती धर्मप्रसाराची मुहूर्तमेढ रोवली. त्याचबरोबरच त्यांनी बेघर नागरिकांना रोटी- पाव देण्यास सुरूवात केली. ख्रिस्ती धर्माचे उपदेश ऐकणे, त्यांचे अन्नभक्षण करणे हा गुन्हा मानून असे वर्तन करणार्‍या व्यक्ती धर्मविरोधी आहेत असे कर्मठ मंडळींनी ठरवून अनेकांना जातीबाहेर काढले. या परिस्थितीत ख्रिश्चन झालेल्या नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांच्या निवासव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तो सोडविण्यासाठी या चौकापासून दीड ते दोन मैलांवर वसाहत निर्माण केली गेली. त्या वसाहतीचे नाव म्हणजे आताचे शरणपूर. तेव्हा लोकसंख्या अवघी १२१ होती.

- Advertisement -

या चौकातील शरणपूर रस्ता काळाच्या ओघात अस्तित्त्वात आला. या भागात कॅनडा हॉस्पिटल बांधण्यात आले. मुंबई-आग्रा रस्त्यावर या चौकाजवळच बालपूर व नवापूरा (आत्ताच्या शिवाजी रस्त्याच्या खडकाळीसमोर) १८४० मध्ये हॅरिस हॉस्पिटल बांधण्यात आले. त्यानंतर आताचे सिव्हील हॉस्पिटल बांधण्यात आले. म्हणून या चौकासमोरील रस्त्याला सिव्हील हॉस्पिटल रोड म्हटले जात.

१९११ मध्ये ई.एस. (ईस) मॅकोनव्ही या इंग्रज अधिकार्‍याने इंग्रज मंडळींना खेळण्यासाठी श्रीमंत राजेबहाद्दर यांचीच जमीन खरेदी केली. त्या जागेत जिमखाना अस्तित्वात आला. त्याचे नाव क्रिस एडवर्ड जिमखाना. १९४७ पासून नाशिक जिमखाना अशा नावाने नावारूपाला आला. म्हणून या चौकाकडून जिमखान्याकडे जाणारा रस्ता जिमखाना रस्ता नावाने ओळखला जाऊ लागला. याच चौकातील खड्ड्यालगतच्या मैदानात १९०८ मध्ये कोर्टाची इमारत उभी राहिली. शेजारी लष्करासाठी १९१४ मध्ये इमारत व समोरील सध्याच्या हुतात्मा स्मारक हायस्कूल मैदान परिसरात लष्कराचा वाहनतळ (डेपो) बांधला गेला. त्याच्या शेजारी मुस्लिम बोर्डिंग सुरू झाले.

- Advertisement -

सी.बी.एस.समोरील मेघदूत शॉपिंग सेंटरची जागा रावबहादूर हर्डीकर यांची होती. त्या जागेत त्यांचा बंगला आणि सेंट्रल एक्साईजचे कार्यालय होते. कान्हेरे यांनी कर्वे, देशपांडे यांच्या सहाय्याने विजयानंद नाट्यगृहात कलेक्टर जॅक्सनचा वध केला. त्यानंतर दुखवटा म्हणून जॅक्सन यांच्या विधवेला एका दानशूराने आग्रारोड ते शालिमारपर्यंतची काही जागा दिली. श्रीमती जॅक्सन म्हणाल्या, या जागेचा मला काय उपयोग. मी ती जागा नगरपालिकेस देते. तेथे बाग तयार करा. बागेस जॅक्सन साहेबाचे नाव द्या. नगरपालिकेने बाग तयार केली. त्याचे नाव जॅक्सन गार्डन. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५३-५४ च्या सुमारास स्वातंत्र्यवीर सावरकर बंधमुक्त झाले. त्यांना बागेच्या उद्घाटनाची विनंती केली. दरम्यान, नगरपालिकेने उद्यानास शिवाजी उद्यान नाव द्यावे, असा ठराव मंजूर केला. १९५५-५६ मध्ये रामकृष्ण मिरजकर नगराध्यक्ष असताना जॅक्सन बागेचे शिवाजी उद्यान नामकरण, शेजारील प्रवेशद्वाराला कान्हेरे यांचे नाव आणि छत्रपती शिवाजी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण हे कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हस्ते झाले. त्यावेळी सीबीएस चौकातील खड्डा बुजवून व्यावसायिक दृष्टीने या जागेचा सर्कशीसाठी वापर सुरू झाला.

१९५० मध्ये स्टेट ट्रान्सपोर्टचा (एस. टी. महामंडळ) विभाग नाशिकला सुरू झाला. प्रवासी गाड्यांसाठी मध्यवर्ती बसस्थानक (सी.बी.एस) या मैदानावर बांधण्यात आले. या चौकातील कै. ग. ह. हर्डीकर १९०९ व १९१३ मध्ये नगराध्यक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीत नळाद्वारे पाणी ही योजना अंमलात येण्याची प्रक्रिया सुरू झाली. सरदार विंचूरकर यांचा बंगला याच चौकात आहे. सुरुवातीला समर-हाऊस म्हणून तो बांधला व त्यांच्या मालकीच्या म्हणजे सध्याच्या कालिदास कलामंदिराची जागा कान्हेरेवाडीची जागा फार्म हाऊस म्हणून वापरली जात असे. १९०० च्या सुमारास विंचूरकरांनी बंगल्याचा मुख्यत्त्वे वापर सुरू केला. महाराष्ट्रातील जमीनदारांची संघटना त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकला स्थापन झाली. १९१५-१६ मध्ये नाशिकचे नगराध्यक्षपद त्यांनी भूषविले.

कवयित्री बहिणाबाई व सोपानदेव चौधरींचे निवासस्थान शिवाजी उद्यानालगत कान्हेरेवाडीत होते. बहिणाबाईंची गाणी मराठी भावविश्वात अजरामर आहेत. त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी काव्यलेखन केले. त्यांच्या पत्नी लीलावती चौधरी नगरसेविका होत्या. कै. प्रभाकर तामणे यांचा प्रभाकर बंगला (आता सायंतारा) कान्हेरेवाडीत उद्यानास खेटून आहे. त्यांच्या ‘एक धागा सुखाचा’ व इतर कथेवर चित्रपट निघाले. रा. फ. गायकवाड यांचा गेल्या ५० वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारा गायकवाड क्लास याच कान्हेरेवाडीत आहे. कायदेतज्ज्ञ दळवी वकील, नाशिकच्या औद्योगिक बँकिंग व्यवसायातील अग्रणी करसल्लागार मर्चंट बँकेचे संस्थापक सदस्य, शहरातील पहिल्या को-ऑपरेटिव्ह (माणिकनगर) सोसायटीचे अध्यक्ष अण्णासाहेब कुलकर्णी यांचे वास्तव्य याच कान्हेरेवाडीत होते. रा. ब. वंडेकर हे क्रीडाक्षेत्रातले प्रोत्साहन देणारे समाजसेवक व खेळाडू, उद्योगपती मणिलालजी शिंदोरे, ना. का. जोशी, गोपाळराव सौंदाणकर, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. सी. गायकवाड हेदेखील याच चौकात राहत. देशातील प्रसिद्ध चहाचे उत्पादक जोशी, क्रिकेटिअर जयंत सपट यांचे निवासस्थान याच चौकात आहे. अशा या गुणीजनांच्या ज्ञात अज्ञात वास्तव्याने पुलकित झालेल्या याच चौकात निवृत्तीनाथांची पंढरीला जाणारी पालखी विसाव्यासाठी क्षत्रियांच्या भिकुसा बंगल्यात येते व भागवत धर्माची पताका उंचवित मार्गस्थ होते. असा हा मंतरलेला चौक हुतात्मा अनंत कान्हेरे चौक नावाने ओळखला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -