घरमहाराष्ट्रसरकार पाडण्यासाठीच मंत्री आणि कुटुंबियांच्या पाठीमागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा - भुजबळ

सरकार पाडण्यासाठीच मंत्री आणि कुटुंबियांच्या पाठीमागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा – भुजबळ

Subscribe

राज्यभरात सुरु असलेल्या ईडी आणि सीबीआयच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना सरकार पाडण्यासाठीच मंत्री आणि कुटुंबियांच्या पाठीमागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप भाजपवर केला. या कारवायांचा भाजपवर विपरित परिणाम होईल असं म्हणत जनता सब कुछ जानती है, असं छगन भुजबळ म्हणाले. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आमच्यावर सतरा ते अठरावेळा धाडी पडल्या. आत गेलो तेव्हा पण धाडी पडत होत्या. त्यांचा कार्यक्रम चालू आहे असं म्हणत माझं एवढंच म्हणणं आहे जनता सब जानती है, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या सुरु असलेल्या कारवाया या चुकीच्या आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांच्या पाठीमागे तपास यंत्रणा लावल्या जात आहेत. मंत्री जर तयार नसतील तर मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मागे यंत्रणांचा ससेमिरा लावायचा. हे अत्यंत चुकीचं आहे. यामुळे भाजपची प्रतिमा महाराष्ट्रात उंचावेल की कमी होईल याचा त्यांनी विचार करावा, असं छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

भुजबळ यांनी पुढे बोलताना देशाने असं कधी पाहिलं नाही, याआधी दोन तीन दिवस आयकर विभाग छापा मारायचे. आता छोट्याश्या घरात जाऊन १५-१६ लोक आठवडाभर थांबतात. याचा अर्थ काय? हे भाजपवर उलटणार आहे. सत्तेत येण्यासाठी हे करत आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.

ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही –  पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध दंड थोपटले आहेत. तुम्ही कितीही ईडी लावा, सीबीआय लावा काहीही झालं तरी राज्यातलं हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

केंद्र सरकार महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागानं अन्य लोकांना त्रास दिला. आता अजित पवार आणि त्यांच्या बहिणींना त्रास दिला जात असल्याचं शरद पवार म्हणाले. केंद्राच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत असून राज्य सरकारमधल्या अनेकांना त्रास दिला गेला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकल्या जात आहे. पण ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही, असा विश्वास पुन्हा एकदा शरद पवार यांनी बोलून दाखवला. आता सत्ता त्याच्या हातात आहे म्हणून ते काही करत आहेत. हे फार दिवस चालत नाही. देशावर भाजप म्हणून जे संकट आलं आहे ते दूर करायचं आहे, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -