मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उद्या जाणार दिल्ली दौऱ्यावर, सीमावादावर तोडगा निघणार?

CM DCM Delhi Visit | गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सीमावादाप्रश्नी या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. तसंच, या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईसुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमकं काय ठरतंय याकडे दोन्ही राज्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.

shinde and bjp

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत त्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सीमावादाप्रश्नी या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. तसंच, या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईसुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमकं काय ठरतंय याकडे दोन्ही राज्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणतात युतीचा चेंडू…

सोलापुरातील जत तालुक्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला होता. तेव्हापासून पुन्हा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद उफाळून आला. दोन्ही राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. सीमेवर तणाव निर्माण झाला. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावातील दौरा रद्द करावा लागला. यावरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर तुफान टीका केली. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनी कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळत गेले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने दोन्ही राज्ये निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे केंद्राने यात मध्यस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, मविआच्या खासदारांनीही अमित शाहांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. त्यानुसार, १४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली जाईल, असं आश्वासन अमित शाहांनी दिलं होतं. त्यानुसार, उद्या सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट होण्याची शक्यता आहे. तसंच, या बैठकीत बसवराज बोम्मईही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – जलयुक्तशिवार अभियान २.० होणार सुरु ; राज्यमंत्रिमंडळ बैठकीत 16 महत्त्वाचे निर्णय

तसेच, अमित शाहांनी या प्रकरणात मध्यस्ती केली तरीही कर्नाटकची एक इंच जमीनही महाराष्ट्राला देणार नाही, असा इशारा बसवराज बोम्मई यांनी दिला होता. त्यांनी अनेकदा महाराष्ट्राला अशाप्रकारचे डिवचलं आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमका काय फैसला होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.