घरमहाराष्ट्रअवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे त्वरित करा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे त्वरित करा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Subscribe

मुंबई : राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, मंगळवारी सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

राज्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. विशेष म्हणजे ठाणे, कल्याण-डोंबिवली, धुळे, जळगाव या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे, यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत, असेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

- Advertisement -

ठाणे, पालघरसह राज्यातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशिम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यांत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई, ठाण्यासह उत्तर – मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.

हवामान खात्याचा इशारा
देशाच्या राजधानी दिल्लीसह अनेक शहरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या असून पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरातसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत मध्य आणि पश्चिम भारतात वादळासह पाऊसाची शक्यता वर्तवली आहे.

- Advertisement -

येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही, हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. याशिवाय, महाराष्ट्रात येत्या दोन-तीन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 3 अंशाची घट होण्याची शक्यता असून त्यानंतर पुन्हा 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात कमाल तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 ते 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -