घरमहाराष्ट्रमुख्यमंत्रीपदाचा निर्णय योग्यवेळी - फडणवीस

मुख्यमंत्रीपदाचा निर्णय योग्यवेळी – फडणवीस

Subscribe

शिवसेनेच्या मेळाव्यात फडणवीस यांचे सुतोवाच

राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल हा मुद्दा गौण आहे. त्याबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघ आणि सिंह जेव्हा एकत्र येतात तेव्हा जंगलाचा राजा कोण हे ठरलेलेच असते, असे ठामपणे सांगितले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात आज मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, पक्षप्रमुख आणि माझे ज्येष्ठ बंधू उद्धव ठाकरे यांचे प्रेम आणि शिवसैनिकांची ऊर्जा घेण्यासाठी आलो आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेचा ५३वा वर्धापन दिन बुधवारी किंगसर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. शिवसेनेच्या या मेळाव्यात राज्याचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख अतिथी होते. त्यामुळे सेनेच्या या मेळाव्यातील तेच प्रमुख आकर्षण होते. लोकसभेला युती केली तेव्हाच मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं आहे आणि ठरलेले योग्यवेळी सर्वांना कळेल.

- Advertisement -

भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी, उद्धव ठाकरे यांना आपले मोठे बंधू असल्याचे सांगत शिवसेनेच्या कोणत्याही मेळाव्यात जाताना मला परके वाटत नाही, तर घरात आल्यासारखे वाटते,असे स्पष्ट केले.

देशातील अनंत काळ टिकणारी शिवसेना आणि भाजपची युती असून महाराष्ट्र आणि भारतात आम्ही एकत्र आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला अभूतपूर्व यश मिळवले आहे. आम्ही भगव्यासाठी लढणारे आहोत, आमचे हिंदुत्व संकुचित नाही. बाळासाहेबांनी जे राष्ट्रीयत्वाचे बीजारोपण केले आहे, त्याच जोरावर महाराष्ट्राला मोठे करायचे आहे,असे त्यांनी सांगितले. महायुतीमुळे ‘राज्यात न भूतो..’ असा विजय विधान सभेत मिळणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा सत्तेवर येवून पुढील पिढीला दुष्काळ पाहता येणार नाही, असे काम करायचे आहे. आम्ही खुर्चीसाठी युती केलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कोण याची चर्चा शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी करू नये, ती चर्चा माध्यमांना चखळू द्या, असे सांगत आपले एकच ध्येय आहे ते म्हणजे हे राज्य सुजलाम आणि सुफलाम करायचे आहे. शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक असून बाळासाहेबांचा आशिर्वाद घेवून पुढे जायचे आहे. बाळासाहेबांना स्वर्गातही अभिमान वाटावा, असे अभूतपूर्व काम आपल्याला करायचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्रीपदाबाबत आमचं ठरलंय-उद्धव

शिवसेना-भाजपची युती भावनिक असल्यामुळे ती २५ वर्षे टिकून आहे, असे सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीत सर्व समसमान असलं पाहिले, असे सुचक वक्तव्य केले. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपशी युती करताना भविष्यात गोंधळ नको म्हणून काही गोष्टीबाबत आमचं ठरलंय. ही युतीची खरीखुरी गोष्टी आहे. हे सगळं खरं नाटक आहे, आणि त्याचे नाव ‘एका युतीची दुसरी गोष्ट’ असल्याचा उच्चारही त्यांनी केला. मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. उद्धव पुढे म्हणाले की, शिवसेना भाजपातहीमधल्या काळात वाद झाला होता. अनेकवेळा तुझे, माझे झाले, पण हा वाद मूलभूत विषयांसाठी होता. अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून हा वाद केवळ मिटवला नाही तर आगामी काळातील निर्णयांसाठी वाट मोकळी करून दिली.

आता वाद संपला आहे, आता भांडत कशाला करत बसायचे. आम्ही याआधी विरोधकाच्या भुमिकेत होतो, पण आता विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी सत्ताधार्‍यांमध्ये घेतले आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांना उद्देशून उद्धव यांनी लगावला. युती झाल्यावर आमचे टार्गेट बदलले आहे. विरोधकांना टार्गेट करणार असे निश्चित केले होेते. पण आता विरोधक उरलेच कुठे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. पवार कुटुंबीयांना भाजपात घेऊ नका याचाही पुनरूच्चार त्यांनी यावेळी केला.

पहिल्यांदा पराभवानंतर आनंद झाला. दुसर्‍याच्या पराभवावर आनंद साजरा नाही करायचा ही बाळासाहेबांची शिकवण आहे. पण सावरकरांना डरपोक म्हणणारे, काश्मीरचे ३७० कलम न काढण्याचे आश्वासन देणारे आपटले याचा आनंद झाल्याचे उद्धव म्हणाले. ओवेसी भारताचा भाडेकरू आहे. पण स्वत:ला भागीदार म्हणतो तेव्हा स्वातंत्र्य किती मिळत हे लक्षात ठेवायला हवे. पाकिस्तानात जाऊन असे बोलायची त्यांची हिंमत आहे का? राम मंदिर होणार आणि झालेच पाहिजे, असे ते म्हणाले. साहेब आठवतात पण संघर्षाचा आणि कसोटीच्या काळात आठवत नाहीत, तर अशा आनंदाच्या क्षणी बाळासाहेब नक्कीच आठवतात असे उद्धव ठाकरे यांनी सांगत बाळासाहेबांच्या आठवणी ताज्या केल्या.

बाळासाहेबही भाजपच्या अधिवेशनात भाषणासाठी गेले होते. तर शिवसेनेच्या मेळाव्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आहे. मधल्या काळात या परंपरेत खंड पडला होता, पण आता नवीन पिढी, नवीन नेतृत्वानुसार याला सुरूवात झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसैनिक प्रेम केले तर भरभरून करेल, आणि लढ म्हटलात तर विचारू नका असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -