घरमहाराष्ट्रराज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले होतायत, सरकार, पोलीस यंत्रणा झोपली का? अजित पवारांचा...

राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले होतायत, सरकार, पोलीस यंत्रणा झोपली का? अजित पवारांचा संताप

Subscribe

रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. याप्रकरणी कार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विरोधकांनी या मुद्द्यावरून आता शिंदे – फडणवीस सरकारला जबाबदार धरलं आहे. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर संताप व्यक्त केला आहे. राज्यातील महत्वाच्या नेत्यांवर हल्ले होत असताना सरकार आणि पोलीस यंत्रणा झोपली आहे का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार आज औरंगाबादच्या पैठण दौऱ्यावर असून ते आज माध्यमांशी बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, छत्रपत शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडत आहेत, हे सरकार आल्यापासून अशाप्रकारे घटना घडत आहे. मात्र अशाप्रकारचे भ्याड हल्ले कोणीही सहन करणार नाही. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाला, त्यानंतर प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, त्याच पद्धतीने कोकणातील एका पत्रकारावर हल्ला करून, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे यामागचा मास्टर माईंड कोण आहे समोर आलं पाहिजे. अशा घटना घडत असताना सरकार काय करत आहे, पोलीस काय करत आहेत, हे सर्वजण झोप काढतायत का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यातील महत्त्वाच्या लोकांवर हल्ले होत असतील तर सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे पाहावे. कायदा सुव्यवस्था कशी कायम राहणार, त्यामुळे या घटनेचा तपास झाला पाहिजे, यासाठी 27 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

पिंपरी चिंचवडच्या बंडखोरीमागील सूत्रधार तिसराचं दिसतोय

ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी पिंपरी-चिंचवड पोट निवडणुकीत उमेदवारी अर्ज कायम ठेवत केलेल्या बंडखोरीवरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची बंडखोरी करण्यामागचा सूत्राधार कोणतरी तिसराच दिसतोय. मतांचे विभाजन करण्यासाठी हे केल्याचं दिसून येतेय. यापार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे सोमवारी तिथे जाणार आहेत. सचिन अहिर यांनी बंडखोरी मागे घेण्यासाठी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे तिन्ही पक्षांचा मिळून महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे आहेत. त्यामुळे त्यांनाच मतदान करावं असं ते सांगतील असा मला ठाम विश्वास आहे. त्यांच्या मतदारांना आवाहन करतील.

- Advertisement -

मविआ अडचणीत येईल असं वक्तव्य करणार नाही

संजय राऊतांकडे कोणती माहिती आहे हे मला माहित नाही. पण कुणाला कोणी धमकावत असेल आणि सातत्याने अशा घटना घडत असतील तर हे सरकारचे अपयश आहे. महाविकास आघाडीतले नेते काही बोलले तर आम्ही त्यावर बैठकीत बसून चर्चा करु, मात्र महाविकास आघाडीला अडचणीत येईल असं वक्तव्य मी करणार नाही. आमचं काय म्हणणं आहे त्यावर आम्ही एकत्र बसून आमची भूमिका मांडू, असंही अजित पवार म्हणाले.


शशिकांतचा खुनी कोणाबरोबर? राऊतांनी ट्विटरवर शेअर केला ‘या’ नेत्याचा फोटो


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -