घरमहाराष्ट्र'योग्यता असणाऱ्यांनाच भाजपात प्रवेश आणि नसणाऱ्यांना 'हाऊस फुल'चं बोर्ड'

‘योग्यता असणाऱ्यांनाच भाजपात प्रवेश आणि नसणाऱ्यांना ‘हाऊस फुल’चं बोर्ड’

Subscribe

'सध्या भाजपात येण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत. मात्र, ज्यांची योग्यता आहे त्यांनाच आम्ही घेत आहोत आणि ज्यांची योग्यता नाही अशांना हाऊस फुलचा बोर्ड दाखवत आहोत', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सध्या भाजपात महाभरती सुरु आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षातील नेते भाजपात प्रवेश करत आहेत. या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महाजनादेश यात्रेत सूचक असे वक्तव्य केले आहे. ‘सध्या भाजपात येण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत. मात्र, ज्यांची योग्यता आहे त्यांनाच आम्ही घेत आहोत आणि ज्यांची योग्यता नाही अशांना हाऊस फुलचा बोर्ड दाखवत आहोत’, असे फडणवीस म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची राज्यभरात महाजनादेश यात्रा सुरु झाली आहे. या यात्रेचा अमरावती येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतून शुभारंभ झाला. यात्रेच्या शुभारंभाला केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आले होते. त्यासोबतच राज्यातील भाजपचे बडे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांचे आभार मानले. यासोबतच सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले.

‘तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं याची खुली चर्चा करुया’

जनादेश यात्रेत संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘यात्रेत दोन किलोमीटर पासून आम्हाला लोकच लोक दिसत होते. महाराष्ट्राच्या जनतेचा आदेश या गर्दीतूनच आम्हाला प्राप्त झाला आहे. कुठल्याही यात्रेला एक दैवत असतं तसे आमच्या यात्रेला दैवत ही जनता आहे. आम्ही मालक नाही आम्ही सेवक आहोत. जनता आमची मालक आहे आणि आम्ही त्यांना सांगणार आहोत आम्ही पाच वर्षात काय केले ते आणि पुन्हा एकदा जनतेचे आशीर्वाद घेणार आहोत. पाच वर्षामध्ये सर्व समस्या संपवल्या असे मी कधीच म्हणणार नाही. कारण १५ वर्षात जे झालं नाही त्यापेक्षा आम्ही चांगलं कामं केली. मी विरोधकांना आव्हान देतो, तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं याची खुली चर्चा करुया.’

- Advertisement -

‘विदर्भात चार वर्षांत आपण सिंचनामध्ये तुलनात्मक बदल केला’

यापुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘विदर्भाच्या नावाने यांनी आपलं चांगभलं केलं. पैसा विदर्भाच्या नावाने घ्यायचा आणि स्वतःचे भलं करायचे, हे यांनी इतक्या वर्षात केले. २०१४ आणि २०१८ या चार वर्षांत आपण सिंचनामध्ये तुलनात्मक बदल केला. आज मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक विदर्भात झाली आहे. मागील सरकारच्या पाठीमागे आम्ही सारखे लागलो तरी त्यांनी काही केले नाही. एक इंडियाबुलचा वीज प्रकल्प सोडला तर यांनी काही केलं नाही. पंधरा वर्षात ज्या नांदगाव पेठला यांनी पोरखं केलं होतं तिथे आम्ही industry सुरू केली.’

‘शेतकऱ्यांना आम्ही ५० हजार कोटी दिले’

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या खात्यात या सरकारने ५० हजार कोटी दिले. मागच्या सरकारने १५ वर्षात २० हजार कोटी देखील दिले नाहीत. आम्ही पाच वर्षात ५० हजार कोटी दिले. चार वर्षांत ६० लाख कुटूंबाना शौचालय आम्ही दिले. हागणदारी मुक्त करण्याचे काम या सरकारने केले. ५० हजार किलोमीटर पेक्षा महामार्ग आणि ग्रामीण मार्गाचे काम या सरकारने केले. यांच्या काळात महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा क्रमांक १८ वा होता. मात्र आम्ही तीन वर्षांत देशात महाराष्ट्रचा क्रमांक तिसऱ्या स्थानावर आणला. देशात औद्योगिक गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्र्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे महाराष्ट्र राज्य ठरलं. २५ टक्के रोजगार महाराष्ट्रात तयार झाला. ५० हजार आदिवासी मुलांना शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. आमच्या सरकारच्या काळात २ कोटी लोक बचत गटाच्या माध्यमातून जोडले गेले.’

- Advertisement -

‘आधीचे नेते दिल्लीला जायचे आणि हात हलवत यायचे’

मुंख्यमंत्री म्हणाले, ‘असे एकही क्षेत्र नाही ज्यामध्ये आम्ही काम केले नाही. त्यामुळे आज जनता आम्हाला आशीर्वाद देत आहे. आधीचे नेते दिल्लीला जायचे आणि हात हलवत यायचे. पण मी जेव्हा जेव्हा दिल्लीत गेलो तेव्हा मला मोदींनी भरभरून दिले. एकीकडे आमचे सरकार आहे जे तुमच्यासाठी काम करत आहे आणि दुसरीकडे ज्यांचे १५ वर्ष सरकार होते ज्यांना चिंता होती स्वतःच्या कुटुंबाची आणि त्यांच्या कारखान्यांची. पत्रकार मला विचारतात की तुम्ही विरोधक शिल्लक ठेवणार आहात की नाही? हल्ली अनेक जण भाजपामध्ये येत आहेत. पण ज्यांची योग्यता आहे त्यांना आम्ही घेतो आणि ज्यांची योग्यता नाही त्यांना आम्ही हाऊस फुलचा बोर्ड दाखवतो.’ ‘आता जो आदेश आहे तो दुष्काळ मुक्तीसाठी, आताचा आदेश आहे तो युवकांच्या रोजगारासाठी, नवं महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मला आपला आदेश द्या, आपला आदेश द्या, मला महाराष्ट्राचा महाजनादेश द्या’, असे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण संपवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -