घरमहाराष्ट्रबुलेट ट्रेनचे भूसंपादन महिनाभरात मार्गी लावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

बुलेट ट्रेनचे भूसंपादन महिनाभरात मार्गी लावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Subscribe

मुंबई – तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात गेली अडीच वर्ष रखडलेल्या अहमदाबाद -मुंबई बुलेट ट्रेनच्या कामाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, बुलेट ट्रेनशी संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतरण हे विषय येत्या महिनाभरात म्हणजे ३० सप्टेंबर पूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. पुणे-नाशिक सेमी हायस्पिड रेल्वे  मार्गाला निती आयोगाने मान्यता दिली असून केंद्राच्या अर्थविषयक व्यवहार मंत्रिमंडळ समितीची मान्यता बाकी आहे.  या प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन, शासकीय आणि  वन जमिनीचे हस्तांरण या बाबींना गती देण्याची सूचनाही त्यांनी केली. (CM Eknath shinde order to complete Land acquisition in one month)

हेही वाचा – सत्तांतरानंतर राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग, भूसंपादन प्रक्रिया जवळपास पूर्ण

- Advertisement -

राज्यातील रेल्वे, मेट्रो, मल्टीमोडल कॉरिडॉर, तुळजापूर, पंढरपूर अशा काही पायाभूत सुविधा प्रकल्पांचा  एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी, आवश्यक परवानग्या या तातडीने मिळवून घ्याव्यात.प्रकल्प रेंगाळल्यास त्याचा खर्चही वाढतो, त्याचप्रमाणे लोकांना सुविधा देखील मिळण्यास उशीर होतो. केंद्र सरकार विविध प्रकल्पांना मान्यता देत असून राज्याने देखील याचा फायदा करून घेतला पाहिजे आणि पाठपुरावा करून योजना मार्गी लावल्या पाहिजेत यावर मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत भर दिला.

मुंबई ते अहमदाबाद अशी ५०८ .१७  कि.मी. लांबीचा बुलेट ट्रेन प्रकल्प  असून यासाठी १ लाख ८ हजार कोटी रुपये खर्च आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात मिळून एकूण १२  स्थानके असून महाराष्ट्रात त्यातील ४  स्थानके आहेत. मुंबईतील एक  स्थानक वगळून उर्वरित तीनही स्थानके उन्नत प्रकारातील आहेत. यासाठी जपान सरकारने कर्ज दिले असून ५०  टक्के खर्चाचा वाटा केंद्र सरकार तर २५  टक्के वाटा प्रत्येकी  महाराष्ट्र आणि  गुजरात सरकार उचलणार आहे.  यासाठी एमएमआरडीए मधील ४.८  हेक्टर जागा भूमिगत स्थानकासाठी ३०  सप्टेंबर पर्यंत उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही एमएमआरडीएने करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी  दिले.

- Advertisement -

हेही वाचा – समृध्दी महामार्गावरून धावणार बुलेट ट्रेन

आजच्या बैठकीमध्ये बुलेट ट्रेन व्यतिरिक्त मुंबई मेट्रो मार्ग-३ , ४ ,५ ,६ ,९  आणि ११  तसेच  मेट्रो मार्ग २  ए (दहिसर पूर्व ते डीएन नगर), मेट्रो मार्ग-७  (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व),  यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.  वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो मार्ग-४  तसेच ठाणे ते कल्याण व्हाया भिवंडी हा मेट्रो मार्ग-५  या मार्गांसाठी भूसंपादन तसेच  हस्तांतरणाचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी सूचना शिंदे यांनी दिली.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम पुढील वर्षी पूर्ण होणार

शिवडी-वरळी जोड रस्ता तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प वेगाने पूर्ण करावा. या प्रकल्पाचे  काम ८४  टक्के पूर्ण झाले असून पुढच्या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हे काम संपेल. अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.
सूर्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होत आली असून पुढच्या वर्षीपासून नागरिकांना पाणी पुरवठा करणे शक्य होईल.  मात्र यासाठी वसई-विरार महानगरपालिका तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिकेने तातडीने जलवाहिन्या  टाकण्यासाठी निविदा व इतर प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी  दिल्या.

या बैठकीला  मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मध्य रेल्वे, हाय स्पीड रेल कार्पोरेशनचे अधिकारी तसेच एमएमआरडीए आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते. पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीच्या सद्यस्थितीचे सादरीकरण  वॉर रूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -