राज्याच्या विकासाला उंचीवर पोहोचवण्यासाठी बळ मिळावे, वाढदिवसानिमित्त फडणवीसांना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं. तसेच त्यांना दीर्घायुष्य मिळून राज्याच्या विकासाला उंचीवर पोहोचवण्यासाठी बळ मिळावे, असे शुभचिंतनही शिंदेंनी फडणवीसांना दिले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आज देशाचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोपासाठी पीएम नरेंद्र मोदींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

दिल्लीतील हॉटेल अशोकामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून देशातील सर्वच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही आजच वाढदिवस असल्याने राजकीय वर्तुळातून या दोन्ही नेत्यांचे वाढदिवस असल्याने सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अमृता फडणवीसांचं ट्विट

जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’, अशा शब्दांत फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा : अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी काँग्रेसचा राज्य सरकारकडे पाठपुरावा