घरदेश-विदेशनिधी संकलनाची मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली

निधी संकलनाची मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली

Subscribe

बाबरी मस्जिद प्रकरणात सेना रस्त्यावर,आता पैशांसाठी भाजप रस्त्यावर

अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी भाजपने हाती घेतलेल्या निधी संकलनावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. रामाचे नाव घेत काही लोक घरोघरी पोहोचत आहेत; पण पैसै मागण्यासाठी. आपल्याला तसे करायचे नाही. राज्यातील तळागाळातला माणूस हा तुमच्यामार्फत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेना नेते आणि पदाधिकार्‍यांना केली आहे.

मुंबईतील वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची पॉवरफुल बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे बडे मंत्री, आमदार, खासदार, राज्यातील सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच मोठी बैठक होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. बाबरी मस्जिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती; पण आता भाजप पैसे मागण्यासाठी रस्त्यावर आली असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. राम मंदिराच्या निधी संकलनाच्या भाजपच्या कार्यक्रमाबाबत बोलताना ‘देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय.

- Advertisement -

नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपच्या विस्तार करण्याच्या मनसुब्यांची मुख्यमंत्र्यांनी टेर उडवली. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या वक्तव्याचा धागा पकडत उध्दव यांनी भाजपवर शरसंधान साधलेय. नेपाळ आणि श्रीलंकेत सत्ता स्थापन करण्याऐवजी हिम्मत असेल तर पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा. मग आम्ही तुमचे स्वागत करू, असे आव्हान ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. शिवसेनेची ताकद महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांमध्ये होती; पण तेव्हा शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिवसेनेचे अनेक लोक भाजपमध्ये गेले. त्या राज्यांमध्येही निवडणूक लढवली असती तर आज वेगळी परिस्थिती असती, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

शिवसंपर्क अभियान राबवणार
राज्यात सत्तेवर आल्यावर शिवसेनेने राज्यभर ‘शिवसंपर्क’ अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली. गावोगावी शिवसेना पोहोचवण्याच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे अभियान राबवले जाणार असल्याचे आढळराव म्हणाले. 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान शिवसेनेचे हे ‘शिवसंपर्क’ अभियान राबवले जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -