आग लागण्यासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी हाच महत्वाचा उपाय – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

Collector K. Manjulakshmi says Precaution is the most important measure to prevent accidents like fire
आग लागण्यासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी हाच महत्वाचा उपाय - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

आगी सारखी दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी हाच महत्वाचा उपाय आहे. त्यासाठी कामाच्या ठिकाणी सतर्क रहावे. दुर्दैवाने एखाद्या ठिकाणी आग लागण्याचा प्रकार घडल्यास उपस्थित असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांनी प्रथम माहिती देणे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी कर्मचारी, अधिकारी यांना अग्निशमन यंत्रणा हाताळण्याची माहिती असणे आवश्यक आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचारी यांना व्हावी यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा रुग्णालय येथील नर्सिंग महाविद्यालयामध्ये अग्नी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सर डॉ. श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते. अग्नी सुरक्षा प्रशिक्षण हे एक महत्वाचे प्रशिक्षण असल्याचे सांगून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, कोविडनंतरच्या काळामध्ये अनेक रुग्णालयांमध्ये आगीसारख्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याची कारणेही अनेक आहेत. त्यामध्ये वीजेच्या सामग्रीवर आलेला ताण, ऑक्सिजनचा वापर यासह अनेक ज्वालाग्रही पदार्थांचा वापर रुग्णालयामध्ये होत असतो. एखाद्या ठिकाणी दुर्दैवाने आग लागलीच तर तिथे उपस्थित असलेल्यांनी पहिल्यांदा प्रतिसाद दिला पाहिजे. अग्निशमन दल दाखल होई पर्यंत आग परसरणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी अग्निशमन यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण प्रत्येकाने घेतले पाहिजे. आजच्या परिस्थितीचा गांभिर्याने विचार करावा आणि सर्वांनी आजच्या या प्रशिक्षणामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा. भविष्यात अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्ह्यातील महत्वाची कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप जिल्हा रुग्णालय आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे म्हणाले, रुग्णालयाच्या ठिकाणी असणारी अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत राखणे महत्वाचे आहे. तसेच दुर्घटनेच्या वेळी योग्य तो प्रतिसाद दिला गेला पाहिजे. याविषयी थोडा सखोल अभ्यासही प्रत्येकाने करावा. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड आणि जिल्हा शल्य चिकित्सक पाटील यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. एम.आय.डी.सी. अग्नी शमन दल, कुडाळचे प्रमुख जे. एम. तडवी यांनी आगीची कारणे, त्याचे प्रकार, आग लागू नये म्हणून घ्यावयाची खबरदारी, आग विझवणे या विषयी माहिती दिली. या दलातील कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना आग विझवण्याचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दिले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हेही वाचा – ११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार