Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र युवकांसाठी स्पर्धा-परीक्षा मार्गदर्शन ते गौतमीचा ‘तमाशा’; मनसेच्या इंजिनाची भरकटली दिशा

युवकांसाठी स्पर्धा-परीक्षा मार्गदर्शन ते गौतमीचा ‘तमाशा’; मनसेच्या इंजिनाची भरकटली दिशा

Subscribe

नाशिक : दशकभरापूर्वी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे, रोजगार मेळावे, दिव्यांग बांधवांसाठी उपकरणे वाटप असे महत्वाकांक्षी उपक्रम राबवून तरुणांना दिशा दाखवणार्‍या मनसैनिकांचीच ‘दिशा’ अचानकपणे भरकटल्याचे गौतमी पाटीलच्या नृत्य कार्यक्रमातून दिसून आले. हा कार्यक्रम मनसेच्या पदाधिकार्‍यांनीच आयोजित केला होता.

राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये अनेक चांगले सहकारी लाभले. त्यांच्या माध्यमातून नाशिकसाठी अनेक चांगले उपक्रम राबवले गेले. या उपक्रमांच्या माध्यमातून शेकडो युवकांसाठी शासकीय अधिकारी होण्याची कवाडे उघडली. तसेच हजारो युवकांना आयुष्याची योग्य दिशा मिळाली. युवककेंद्री असलेल्या मनसे पक्षाची वाटचाल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनापासून झाली खरी; मात्र काळाच्या ओघात थेट गौतमी पाटीलच्या वादग्रस्त कार्यक्रमापर्यंत हा प्रवास झाला आहे.

- Advertisement -

मंगळवारी (दि.१६) मनसेच्या एका विद्यार्थी पदाधिकार्‍याच्या ‘नवनिर्माण’ नामक संस्थेच्या माध्यमातून शहरातील ठक्कर डोम याठिकाणी गौतमी पाटीलच्या नृत्याचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी तब्बल २ हजार रुपयांपासून ३०० रुपये असे तिकिटे ठेवण्यात आली होती. संपूर्ण शहरात त्यासाठी मोठी बॅनरबाजी करून आयोजकांच्या फोटोसह मोठी जाहिरातही केली गेली. या कार्यक्रमाचा उद्देश जरी रुग्णवाहिका घेण्यासाठी निधी संकलन करणे हा सांगितला असला तरी रुग्णवाहिकेसाठी निधी जमा करण्यासाठी इतरही अनेक मार्ग होतेच. जसे राज ठाकरे यांनी महानगरपालिकेचा एक रुपयाही खर्च न करता ‘सीएसआर’च्या माध्यमातून शहरात अनेक प्रकल्प उभारले. तसाच आदर्श त्यांच्या कार्यकर्त्यांनी का नाही घेतला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमात महाराष्ट्रभर हूल्लडबाजी, मारामारी, गोंधळ, मद्यधुंद चाहत्यांची उपस्थिती यामुळे रोजच वाद निर्माण होत आहेत. तसेच, त्या कार्यक्रमात होणारे अश्लीलतेच दर्शन यातून युवा पिढी भरकटत असल्याचे मत व्यक्त केल जात आहे. अशात युवककेंद्री असलेल्या मनसे पक्षाशी संबंधितांनी असा कार्यक्रम आयोजित करणे कितपत योग्य होते? गौतमीच्या प्रसिद्धीच्या आडून स्वत:ला चमकवून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास होता का असाही प्रश्न नाशिककर उपस्थित करत आहेत.

गर्दी कमी तरी नियंत्रण ठेवण्यात अपयश

- Advertisement -

ठरल्याप्रमाणे मंगळवारी (दि.१६) गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू झाला पण संपूर्ण महाराष्ट्रात जे घडत नाही ते नाशिककरांनी करून दाखवले. महाराष्ट्रात कुठेही हाऊसफुल्ल होणारा गौतमीच्या तमाशाच्या कार्यक्रमाकडे नाशिककरांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र होते. मात्र, अंदाजे ७० टक्क्याहून अधिक खुर्च्या रिकाम्याच होत्या. गर्दी अपेक्षेपेक्षा कमी असतानाही आयोजकांना त्या चाहत्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चाहत्यांनी गोंधळ घातला. त्याचवेळी कार्यक्रमाचे वृत्ताकन करणार्‍या फोटोग्राफर व कॅमेरामन यांच्या कामात व्यत्यय येऊ लागल्याने त्यांनी त्या मद्यधुंद चाहत्यांना विनंती केली. मात्र, त्या टोळक्याने विनंती एकण्याऐवजी ते थेट पत्रकारांवर चाल करून गेले. या घटनेत फोटोग्राफर अशोक गवळी व कॅमेरामन आकाश येवले गंभीर जखमी झाले.

पक्षाकडून कार्यकर्त्यांना कार्यक्रम नसल्याने

मनसे पक्ष हा युवककेंद्री पक्ष आहे. पक्षातील कार्यकर्त्यांचे सरासरी वय २० ते २५ आहे असे बोलले जाते. युवकांमध्ये मोठी ऊर्जा असते. त्या उर्जेला योग्य दिशा मिळाली नाही तर त्यांची दिशा भरकटते. मनसे पक्षाच्या वतीने सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जावेत, त्यातून कार्यकर्ता सातत्याने सक्रिय राहील असे अनेकदा बोलले गेले. मात्र, त्याबाबत कधीच पक्षाकडून सकारात्मकता दाखवण्यात आली नाही. म्हणूनच ज्यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ झाला त्यावेळी थट्टेने चर्चा घडून आली की ’पक्ष काही कार्यक्रम देत नसल्याने कार्यकर्त्यांना असे कार्यक्रम घ्यावे लागत आहेत’ ही वाक्य जरी थट्टेचे असले तरी त्यात सत्यताही आहेच, असे एकूणच पक्षाच्या वाटचालीतून दिसून येते.

..तरी स्टेजवर सत्कार सुरूच

पत्रकारांना मारहाण झाल्याची बाब आयोजकांना निदर्शनास आणून दिल्यानंतरही रुग्णवाहिका घेण्यासाठी आयोजित केलेल्या आयोजकांनी तसेच पोलीस प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल न घेता गौतमीचा नाच सुरूच ठेवला. तसेच त्यानंतर उपस्थितांचे सत्कार सोहळेही सुरूच राहिले. अखेर इतर पत्रकारांनीच जखमी गवळी आणि येवले यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

यामुळे निर्माण झालेले काही प्रश्न

  • गोंधळ होण्याची दाट शक्यता असताना आयोजकांनी खबरदारी का नाही घेतली?
  • महाराष्ट्रभर वादाचा विषय ठरलेल्या गौतमीच्या कार्यक्रमाला मनाई आदेश लागू असताना परवानगी कशी मिळाली?
  • गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पुरेसा पोलीस बंदोबस्त का तैनात नव्हता?
  • पत्रकारांना मारहाण झाल्यावर त्या युवकांना लगेच अटक का केली नाही?
  • ते हुल्लडबाज सुरूवातीपासून गोंधळ करत होते तर त्यांना पायबंद का घातला नाही?
  • सामाजिक संस्थेंतर्गत घेतलेल्या कार्यक्रमाला धर्मादाय आयुक्तांची परवानगी होती का?
  • तिकीट विक्री करून कार्यक्रम घेतला होता तर त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात करमणूक कर भरला होता का?
- Advertisment -